
>> जयेश अर्जुन माधव
संत तुकाराम महाराज हे मराठी संतपरंपरेतील एक अत्युच्च शिखर! त्यांची ओळख बहुतेक वेळा भक्त, वारकरी आणि विठ्ठलभक्त अशीच करून दिली जाते. मात्र `शुद्ध बुद्ध काया… तुकोबाराया’ या पुस्तकातून लेखक किरण माने यांनी तुकोबारायांची ही पारंपरिक चौकट मोडून काढीत त्यांना एका वेगळ्या विचारशील, समाजशील आणि प्रश्नकर्त्या रूपात वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक किरण माने हे प्रायोगिक, व्यावसायिक, रंगभूमी, मालिका, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात अभिनेता म्हणून कार्यरत आहेत. `शुद्ध बुद्ध काया…तुकोबाराया’ हे पुस्तक म्हणजे चिंतनात्मक आणि दर्शनात्मक लेखन आहे. `मार्मिक’मध्ये प्रकाशित झालेल्या 18 लेखांचा हा संग्रह आहे. तुकोबारायांचे अभंग केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विचारांचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या शोधात गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ घेत बुद्ध आणि तुकोबाराया यांच्यातील अंतर्गत साधर्म्य अधोरेखित केले आहे. `शुद्ध बुद्ध काया’ ही संकल्पना केवळ आध्यात्मिक नसून ती विवेक, करुणा, समता, सत्यशोध आणि आत्मपरीक्षण यांची एकत्रित मांडणी करते.
लेखकाची भूमिका भक्तिभावापेक्षा विवेकशील आणि प्रश्नार्थक आहे. तुकोबाराया येथे केवळ ईश्वरभक्त संत म्हणून उरत नाहीत, तर समाजातील अन्याय, ढोंग, कर्मकांड आणि विषमता यावर स्पष्टपणे प्रश्न उपस्थित करणारे विचारवंत म्हणून उभे राहतात. लेखकाने अभंगाचा वापर उपदेशासाठी न करता संवादासाठी केला आहे, ही या पुस्तकाची मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. लेखनाची शैली साधीसोपी असली तरी आशय गंभीर आहे. त्यामुळे वाचकाला सतत विचार करायला लावणारे मुद्दे पुस्तकात सतत येत राहतात. काही ठिकाणी तत्त्वज्ञानाची घनता अधिक जाणवते. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला ते भाग थोडे जड वाटू शकतात. मात्र हा दोष नसून या पुस्तकाच्या स्वभावधर्माचा भाग आहे. कारण हे पुस्तक केवळ भावनेत रमण्यासाठी नसून विचारांना चालना देण्यासाठी लिहिलेले आहे.
आजचा काळ हा सुरक्षित तटस्थतेचा आहे. स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी दोन्ही बाजू बरोबर म्हणत स्वतला वाचवण्यासाठी चलाखी कलावंतांपासून विचारवंतांपर्यंत सर्वत्र पसरली आहे. अन्यायावर बोलण्याची जबाबदारी टाळून सौजन्य, समतोल आणि सौम्यपणा यांचा मुलामा देत लाचारपणा प्रतिष्ठेचा भाग बनवला जात आहे. अशा काळात ठामपणे उभे राहणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि त्याची किंमत मोजण्याची तयारी ठेवणे हे दुर्मिळ झाले आहे. मराठी सांस्कृतिक अवकाशात किरण माने यांची भूमिका म्हणूनच वेगळी ठरते. त्यांच्या लेखनातला संताप हा वैयक्तिक नसून व्यवस्थात्मक आहे. तो अन्याय दांभिकता आणि खोटय़ा अध्यात्मावर प्रहार करणारा आहे. त्यामुळेच त्यांची वैचारिक नाळ थेट तुकोबारायांशी जुळलेली दिसते.
`शुद्ध बुद्ध काया…तुकोबाराया’ या पुस्तकातून लेखक किरण माने तुकोबांकडे पाहण्याची पारंपरिक, सोयिस्कर चौकट मोडतात. परमार्थाच्या नावाखाली संतांना निष्प्रभ, निपिय आणि भक्तीपुरते मर्यादित करणाऱया पोटार्थी परंपरेला ते थेट आव्हान देतात. शब्दांना शस्त्र बनवून समाजातील विषमता, ढोंग आणि सत्ताकेंद्रे उघडी पाडणारे तुकोबा हे विद्रोही `अँग्री यंग मॅन’ ठरतात.
तुकोबारायांच्या काळात सत्तापिपासू, धर्मद्वेष्टे, धर्मांध, कर्मठ अशी सगळ्या प्रकारची माणसे होती. बहुजन समाजाला ही अशा वृत्तीची माणसे अनेक प्रकारे घाबरवून स्वतच्या दबावाखाली ठेवत असत, पण अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी आणि गरीब बहुजन समाजाला शहाणे करण्यासाठी तुकोबाराया आपल्या अभंगांतून थेट प्रहार करत होते. काळ बदलला, पण तुकोबारायांचे अभंग आजही तितकेच लागू पडतात. सत्तापिपासू, धर्मांध आजही आहेत. त्यामुळे तुकोबारायांचे अभंग आजही तितकेच प्रभावी आहेत हे लेखक किरण माने यांनी अनेक उदाहरणांतून दाखवून दिले आहे. हे पुस्तक म्हणजे अभंगांचे धार्मिक पठण नव्हे, तर त्यांचे सामाजिक पुनर्वाचन आहे. तुकोबांच्या शब्दांमधील धग, अस्वस्थता आणि प्रश्नांची धार आजच्या काळात पुन्हा प्रखरपणे समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे `शुद्ध बुद्ध काया…’ ही केवळ संतसाहित्याची मांडणी न राहता वर्तमानाला आरसा दाखवणारी, वाचकाला विचार करायला भाग पाडणारी आणि तुकोबारायांची नव्याने भेट घडवून आणणारी एक महत्त्वाची वैचारिक कृती ठरते.
सत्तेसाठी सतत असलेली चढाओढ, राजकारणाचा झालेला चिखल, सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे लोक, धर्माच्या नावाने अवडंबर करणारे लोकही आपल्या अवतीभोवती दिसत असतात. आपल्या अवतीभोवती समाजात वावरताना काहीतरी चुकतंय असं ज्यांना वाटतं त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
शुद्ध बुद्ध काया… तुकोबाराया
लेखक : किरण माने
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पृष्ठे ः 143 ह मूल्य ः 250 रुपये


























































