
>> सुनीता टिल्लू
80च्या दशकात उदयाला आलेले समकालीन वास्तवाचे उत्तम भान असणारे अत्यंत संवेदनशील मनाचे कवी महेश केळुसकर यांचा ‘जहरमाया’ हा कवितासंग्रह. जहराची माया जाणून घेताना मनात उमटलेले प्रतिसाद प्रस्तुत आस्वाद लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या जगात भरलेले, वर्तमानाला वेटाळून असलेले भयाचे जहर केळुसकरांनी संग्रहातील अनेक कवितांमधून खेळवले आहे. सामाजिक विसंगती, विषमता, राजकीय सत्तापिपासेतून आलेली उन्मत्तता, तथाकथित आध्यात्मिक बुवाबाजीतून सामान्य माणसाला आलेली लाचारी, प्रेमातील साशंकता, नात्यांच्या बदलत्या स्वरूपातील भेडसावणारी बेचैनी असे भयमूलक भावनांचे कितीतरी आविष्कार संग्रहातील कवितांमधून प्रत्ययाला येतात.
भय स्वप्नांच्या रात्रीमागून रात्री येती
चंद्र लटकतो फास घेऊनी झाडावरती
पाणी बघते सुजलेल्या डोळ्यांनी रोखून
वर्तमान हा असा भयंकर भूत होऊनी
या ओळींमधून वर्तमानाची भयग्रस्तता तीव्रतेने व्यक्त झालेली आहे. आल्हाद देणारा वाराही इथे काळाकभिन्न असून काळी कुळकुळीत तलवार घेऊन काळ्याकिट्ट अंधारावर सपासप वार करतो आहे. या भयाला केळुसकरांनी ‘मनभुलई’ असे यथार्थ नाव दिले आहे.
दूर गेलेल्या प्रेमासंबंधी स्मरणे सुगंधी असली तरी आजच्या वर्तमानात सुकून गेली आहेत. काळाच्या पात्रात गोठून गेली आहेत. नात्यांमधले अनमोल असे काहीतरी काळाच्या ओघात हरवून, निसटून गेले आहे, हे जाणून केळुसकर म्हणतात-
डगमगणारी तहान माझी आज पोरकी
या उसवलेल्या प्रेम संबंधांना केळुसकरांनी अतिशय यथार्थ असा ‘फुलटाका’ हा शब्द योजला आहे.
तो निघून गेलेला दूर
त्याच्या मागे काळीज चक्काचूर
‘हलाहल’ या कवितेतील या ओळी तिचे व्याकुळपण अधोरेखित करतात.
शहरीकरणाच्या धबडग्यात जगाचा चेहरा मोहरा बदलत असताना, जगाचा रंग उडत चाललेला असताना निरागसपणे निळे डोंगर, हिरवाई, स्वप्निल मेघपुंज चितारणाऱया चित्रकाराचे केळुसकरांना अतिशय मोल वाटते. कवीच्या आयुष्यातील कवितेचे अनन्यसाधारण स्थान व्यक्त करणाऱया अनेक कविता संग्रहात आहेत. ते कवीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.
ही कविता माझ्या सोबत असते जेव्हा
मी जिवंत असतो तेव्हा
असे केळुसकरांनी घोषित केले आहे. झऱयातून खळखळ झरणाऱया पाण्याची, सहज दुःखालाही नवता देणारी, एकांताच्या वाटेवरती भेटणारी, निराकार आत्मप्रचितीकडे नेणारी, नियतीच्या वणव्यातही शांत ज्योतीप्रमाणे तेवणारी ही कविता.
अंधाराच्या गुहेत गेले विश्व तरीही
कवितेचा हा उजेड राहील चराचरावर
असा अगम्य विश्वास केळुसकर व्यक्त करतात आणि कवितेचा प्राण उराशी घट्ट धरून ठेवतात. खोल सलणाऱया, जीव लावणाऱया ताज्या कवितेचे जिवंतपण व्यक्त करताना ‘जीविता’ हा किती सुंदर अर्थपूर्ण शब्द कवीला सुचला आहे!
एकंदर आजचे भयग्रस्त विस्कटलेले, चिडलेले वर्तमान केळुसकरांच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी आहे. जहर म्हटले की नागाची आठवण अपरिहार्यपणे होतेच. अन्वर हुसैन यांची मुखपृष्ठावरील व आतील रेषांच्या वेटोळ्यांची रेखाचित्रे कवितासंग्रहाच्या मध्यवर्ती आशयाशी अन्वर्थक ठरतात.
संग्रहात प्रामुख्याने छंदोबद्ध काही गझल किंवा गझलसदृश रचना अधिक आहेत. पण ‘दचकलास’ किंवा ‘तुझ्या ओठांवर’ अशा मुक्तछंदातील रचनाही आशयाची अंतर्गत लय घट्ट धरून ठेवतात.
‘तुझ्या ओठांवर’ या कवितेतील
आत्मउजेडात उजळतो आहे वनगर्द अंधार
दूरवरून तरंगत येतो आहे कोमल गंधार
अशा शरीरापलीकडचा अनुभव अभिव्यक्त करणाऱया ओळी आशयाचे कवितापण अबाधित राखतात.
भयकंपित वर्तमानात जगत असले तरी केळुसकरांची भूमिका भाबडय़ा आक्रंदनाची, तक्रारीची किंवा भावविवशतेची नाही. भयाचे विविध अंगांनी काव्यात्मक सौंदर्यपूर्ण दर्शन त्यांनी घडवले आहे आणि सौंदर्यबोध हे कवितेचे प्रयोजन साधले आहे. केळुसकरांनी हायकू, क्षणिका असे काव्यप्रकारही समर्थपणे हाताळले आहेत. कवितेचे सत्त्व आणि स्वत्व सांभाळणाऱया, तरल संवेदनेच्या वर्तमानाशी आतडय़ाच्या मायेने जोडलेल्या या प्रगल्भ कविता आहेत.
जहरमाया
कवी ः महेश केळुसकर
प्रकाशक ः सृजन संवाद प्रकाशन
पृष्ठे ः 80, ??मूल्य ः 200 रुपये