
>> वैश्विक
येत्या 6 तारखेची रात्र पाऊस नसला तर लख्ख चंद्रप्रकाशाने उजळलेली असेल. आश्विन महिन्यातील ही पौर्णिमा कोजागिरी किंवा नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी होते. पाऊस संपल्यानंतरचं स्वच्छ वातावरण आणि नवं धान्य घेऊन तरारलेली पिकं असा परंपरेने येणारा अनुभव. त्यामुळे शेतीप्रधान देशात नवान्न पौर्णिमेचा ‘सण’ होणे साहजिकच. असेच ‘नवान्ना’चे सण जपान आणि चीनमध्येही त्यांच्या ‘हार्वेस्ट’ किंवा सुगीच्या काळात होतात. त्या वेळी मोठय़ा ड्रगनची ते मिरवणूक काढतात.
आपल्या पावसाळी देशात तर चार महिन्यांची मेघमाला अस्तंगत झाल्यानंतर येणारा पूर्णचंद्र विलोभनीय वाटणारच. 6 तारखेला हवामान अनुकूल असेल तर ठिकठिकाणी कोजागिरी साजरी होईल. ‘को जागर्ति’ म्हणजे कोण जागृत आहे? याविषयीच्या पारंपरिक कथेचीही आठवण होईल. असे सण कष्टकरी समाजासाठीचा विरंगुळा असतो. आपल्या चांद्रमासात चंद्राला महत्त्व अधिक. आपले सारे सणवार ‘चंद्र आहे साक्षीला’ म्हणतच साजरे होणारे. मग कधी बीजेची कोर, कधी चतुर्थी, तर कधी अष्टमी आणि पौर्णिमेसह चंद्राचा विलोप असणारी अमावास्यासुद्धा ‘सणा’चं रूप घेऊन येते.
पृथ्वीपासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असलेला चंद्र. लहान मुलांचा चांदोबा किंवा ‘चंदामामा’ व्हावा असं त्याचं पृथ्वीशी जडलेलं नातं. पृथ्वीचा हा ‘भाऊ’ त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे कधी पृथ्वीच्या जवळ येतो, तर कधी दूर जातो. तो ‘पेरिजी’ किंवा ‘उपभू’ स्थानी असतो तेव्हा किंचित मोठा दिसतो. कारण त्या वेळी पृथ्वी-चंद्रामधलं अंतर 3 लाख 84 हजारांवरून कमी होत 3 लाख 63 हजार 300 किलोमीटरवर येतं. या 20 हजार किलोमीटरच्या जवळीकीने चंद्र ‘सुपरमून’ दिसतो असं पाश्चात्य म्हणतात.
मात्र तो पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा हे अंतर 4 लाख 5 हजार 500 किलोमीटर इतपं होतं. त्यामुळे अशा स्थितीला ‘अॅपो-जी’ किंवा अप-भू स्थिती म्हणतात. ‘जी’ (उाा) म्हणजे भाषेत चंद्र. पेरि म्हणजे जवळ आणि अॅपो म्हणजे लांब. चंद्राची आणखी एक गंमत अशी की, आपला चंद्र पृथ्वीपासून हळूहळू लांब जातोय. किती तर प्रतिवर्षी 3.8 सेंटिमीटर. हे वाढतं अंतर नजरेला दिसणं तसं कठीणच, पण त्याचे परिणाम मात्र कालांतराने जाणवतील.
खूप म्हणजे काही लाख वर्षांनी या ‘दूर’गामी चांद्रप्रवासामुळे पृथ्वीवरील सागरांच्या भरती-ओहोटीवर परिणार तर होईलच, पण पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गतीही काहीशी मंदावेल. त्यामुळे दिवस ‘मोठा’ होईल.
वैज्ञानिकांनी ‘लेझर बाऊन्स’ तंत्राचा वापर करून म्हणजे लेझर किरणांचं चंद्राच्या पृष्ठभागावरून होणारं परावर्तन अचूक मोजून अंतर निश्चित केलंय. त्यासाठी त्यांनी ल्युनार रिट्रोरिफ्लेक्टर वापरले. त्यातून या वार्षिक 3.8 सेंटिमीटर दुराव्याची माहिती मिळाली.
चंद्र आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याला भरती-ओहोटी येते. ‘टायडल बल्ज’ तयार होऊन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीतून निर्माण झालेली ऊर्जा चांद्रकक्षेवर परिणाम करते. त्यामुळे चंद्र किंचित ‘ढकलला’ जातो. वरच्या कक्षेत जाताना त्याचं पृथ्वीसोबतचं अंतर वाढतं. या साऱ्या क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टीचा माणसाच्या जीवनावर लगेच काही परिणाम होणार नाही, परंतु दोनेक कोटी वर्षांनी दिवस 25 तासांचा होऊ शकेल.
आपल्याकडे या वेळच्या कोजागिरीला पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत किंवा उप-भू (पेरिजी) स्थानी आलेला चंद्र छान दर्शन देईल. त्यानंतर पुन्हा 4 आणि 5 नोव्हेंबरला जगाच्या पूर्व-पश्चिम गोलार्धात ‘मोठय़ा’ चंद्राचं दर्शन होईल. त्या वेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, तेव्हा चंद्र-पृथ्वी अंतर 3 लाख 56 हजार 980 किलोमीटर असणार आहे. हे ‘सुपरमून’ पाहण्याची संधी दवडू नका.
या वर्षी ‘ब्लू-मून’ किंवा नीलचंद्र मात्र दिसणार नाही. तो योग 31 मे 2026 रोजी होणाऱ्या पौर्णिमेला येईल. यंदा ‘ब्लू-मून’ नसण्याचं कारण म्हणजे एका इंग्लिश महिन्यामध्ये काही वेळा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेचा चंद्र ‘ब्लू मून’ असतो. 2025 मध्ये कोणत्याच इंग्लिश महिन्यात दोन पौर्णिमा नाही. सबब ‘नील चंद्र’ दिसणार नाही. ‘ब्लू मून’चा अर्थ क्वचित घडणारी गोष्ट. त्या पौर्णिमेलाही चंद्र निळा वगैरे दिसत नसतो. तो नेहमीसारखाच दिसतो. एका वर्षात जास्तीत जास्त चार ‘सुपरमून’ दिसू शकतात, तर एखाद्या वर्षी केवळ दोन वेळाच ‘ब्लू मून’ दिसू शकतात. चंद्राची ही ‘साक्ष’ लक्षात ठेवून त्यानुसार त्याचं निरीक्षण केलं तर आनंद मिळेल. परवाच्या कोजागिरीचा ‘सुपरमून’ जरूर पहा.