
>> वर्णिका काकडे
कोल्हापूर ही करवीरनगरी आदिशक्ती महालक्ष्मीचे अधिष्ठान. दैवी माहात्म्य लाभलेल्या या शहराची ओळख असलेला दागिना म्हणजे कोल्हापुरी साज आणि ठुशी. दागिन्यांचा हा वारसा चांदीच्या कलाकुसर केलेल्या दागिन्यांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहरालगत असलेला हुपरी परिसर ‘चांदीचे गाव’ किंवा ‘रजत नगरी’ म्हणून ओळखले जातो. या गावातल्या घरोघरी चांदीचे दागिने घडविले जातात. या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागे मोठा इतिहास आहे.
इसवी सन 1300 पासून इथे चांदीच्या दागिने घडविण्याचा इतिहास असल्याचे पुरावे सापडले आहेत. तेव्हाचे देवगीरीचे राजे श्री रामचंद्रराव यादव याच काळात कर्नाटकातील विजापूरहून महाराष्ट्रतील कोकण भागात व्यापारासाठी जायचे. प्रवासादरम्यान विसावा म्हणून हुपरीत त्यांचा मुक्काम असायचा. त्या काळात इथले कारागीर हत्ती-घोडे यांना घालण्यासाठी दागिने तयार करत असत. इसवी सन 1800 मध्ये निपाणीकर देसाई यांनी हल्ला करुन हुपरी गाव किल्ल्यासह ताब्यात घेतले. पुढे कोल्हापूरच्या छत्रपतींनी हे गाव काबीज केले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थान काळापासून इथे बदल होत गेले. या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागेसुद्धा मोठा इतिहास आहे. शाहू महाराज फिरण्यासाठी आणि शिकारीसाठी हुपरीत यायचे. तेव्हा त्यांच्या घोडय़ाचा दागिना खराब झाला व हुपरीतील कृष्णाजी पोतदारांनी त्याची दुरुस्ती करुन दिली.
हुपरीत तयार केलेले चांदीचे दागिने त्यावरील हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे एकाच प्रकारचे काम पिढय़ानपिढय़ा करणारी कुटुंबे आहेत. कौशल्यांना अनुसरून कामे इथल्या आजुबाजुच्या गावांमध्ये केली जातात. तंत्रज्ञानामुळे हस्तकला मागे पडत असली तरी सध्या इथे चांदी हस्तकला उद्योगांची संख्या जास्त आहे. यात महिलांचा सहभागही आहे. चांदीची जोडणी करुन देण्याच्या त्यांच्य या कामाला या भागात ‘भरणी’ म्हणून ओळखले जाते. हुपरी आणि परिसरातल्या घराघरातून बायका हे काम करतात. कच्च्या मालापासून पैंजण-जोडवी असे वेगवेगळे डिझाईन तयार केले जातात. पैंजण, जोडवी, करदोडे, बिंदली, मासोळ्या, बाजूपट्टा, ब्रेसलेट, भांडी यापासून ते अगदी घागरी, शोपीस, कळस इतकंच काय, तर चांदीचे नक्षीकाम केलेले सुबक दरवाजेही घडवले जातात.