
>> प्रसाद ताम्हनकर
ब्रिटनच्या संशोधकांनी एका थक्क करणाऱया प्रयोगाला यशस्वी करून दाखवले आहे. ब्रिटनमध्ये नुकतीच आठ बाळे जन्माला आली आणि विशेष म्हणजे तीन लोकांच्या शरीरातील घटकांचा (डीएनए) वापर करून या मुलांचा जन्म झाला आहे. ही सर्व बाळे माइटोकॉन्ड्रियल या आनुवंशिक आजारापासून पूर्णपणे मुक्त असल्याचे समोर आले आहे. या प्रयोगामुळे लहान मुलांचा माइटोकॉन्ड्रियलसारख्या कोणताही इलाज नसलेल्या आनुवंशिक आजारापासून बचाव करणे आता शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माइटोकॉन्ड्रियल हा एक अत्यंत घातक आजार मानला जातो. या आजारावर आजच्या आधुनिक आणि प्रगत वैद्यकीय काळातदेखील कोणताही इलाज उपलब्ध नाही. आईपासून हा आजार नवजात बाळाला मिळतो. माइटोकॉन्ड्रियाला पेशींचे पॉवर हाऊस मानले जाते. आपल्या शरीरातील पेशींमध्ये अनेक छोटी-छोटी अंगे असतात, ही ऑक्सिजनचा वापर करून अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. या ऊर्जेचा वापर आपले शरीर इंधन म्हणून करते. माइटोकॉन्ड्रिया जर व्यवस्थित काम करणे बंद झाले तर शरीरात हृदयाचे ठोके नियमित चालू ठेवण्याएवढी ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही. तसेच दृष्टी क्षीण होणे, अवयव निकामी होणे, स्नायू कमकुवत होणे, झटके येणे हे आजार उद्भवतात आणि मेंदूचेदेखील नुकसान होऊ शकते.
ब्रिटिश संशोधकांच्या प्रयोगातून जन्माला आलेल्या या बाळांच्या माता-पित्याची ओळख उघड करण्यात आलेली नसली तरी या सर्व पालकांनी एक निनावी संयुक्त निवेदन जारी करून संशोधकांचे आभार मानले आहेत आणि असाध्य अशा या रोगापासून मुक्त बाळांमुळे आपले जीवन आता अधिक आनंदी व काळजीमुक्त असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दहा वर्षांपूर्वी न्यूकॅसल विद्यापीठ आणि न्यूकॅसल अपॉन टायन हॉस्पिटल्स एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले होते. यामध्ये आई आणि वडिलांच्या अंडय़ांना (एग) व वीर्याला (स्पर्म) दात्या महिलेच्या अंडय़ाशी मिसळले जाते. तीन व्यक्तींच्या डिएनएपासून जन्मलेल्या या मुलांना त्यांच्या डीएनएचा बहुतांश हिस्सा, त्यांची आनुवंशिक ब्ल्यू प्रिंट ही आई-वडिलांकडून मिळते आणि दुसऱया महिलेकडून 0.1 टक्का डिएनए मिळतात. ही बदलाची पद्धत पुढच्या पिढय़ांमध्येदेखील संक्रमित होत जाते.
ब्रिटन या देशामध्ये हे तंत्रज्ञान पूर्णपणे कायदेशीर आहे.2015 मध्ये ब्रिटनच्या संसदेत यावर मतदान घेण्यात आले आणि या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता देण्यात आली. अशी मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला. या तंत्रज्ञानाने जन्मलेली मुले माइटोकॉन्ड्रियलसारख्या गंभीर आनुवंशिक आजारापासून मुक्त असल्याचे पुरावे पहिल्यांदाच समोर आल्याने आता या तंत्रज्ञानाने जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या आजारावर कोणताही औषधोपचार नसल्याने मोठय़ा प्रमाणावर मुले मृत्युमुखी पडणे अथवा त्यांचे शरीर काम करण्याचे बंद होणे अशा प्रकारचा धोका उद्भवत असे. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला, आईला किंवा तिच्या पहिल्या मुलाला हा आजार झालेला असेल तर येणाऱया बाळालादेखील त्याचा धोका निर्माण होत असतो.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये यासंदर्भात दोन अहवाल प्रकाशित झाले आहेत. या अहवालानुसार न्यूकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये 22 कुटुंबांनी या तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. आतापर्यंत या तंत्राद्वारे आठ मुले जन्माला आली असून त्यात चार मुले आणि चार मुली यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यात एका जुळ्या बाळांच्या जोडीचा समावेश आहे. अनेक संशोधकांनी या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. माइटोकॉन्ड्रियल या रोगावर कोणताही इलाज नाही, पण आता आपण त्याचा प्रसार थांबवू शकतो असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. हे तंत्रज्ञान येणाऱया पिढीसाठी खूप मोठे वरदान असल्याचेदेखील अनेक संशोधकांना वाटते. या प्रयोगाच्या मदतीने इतर काही आनुवंशिक आजारांवर उपाय सापडतो का किंवा या रोगापासून पूर्णपणे मुक्त बालकांना जन्म देणे शक्य आहे का, यावर आता संशोधन होण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.