
>> अक्षय मोटेगावकर
कवी, सृजनशील गीतकार, लेखक आणि महत्त्वाचे म्हणजे हिंदी आणि उर्दू साहित्यातील जाणकार अशी ओळख असलेले मनोज मुंतशीर यांचे यूटय़ूब चॅनेल पाहणे, ऐकणे म्हणजे कलासक्त वृत्ती जोपासल्याचा अनुभव ठरतो.
मनोज मुंतशीर यांची पहिली ठळक ओळख झाली ते त्यांनी लिहिलेल्या ‘तेरी मिट्टी’ या देशभक्तिपर गीतावरून. मग एक व्हिलन, चित्रपटातील गलिया, ‘एम. एस. धोनी’ चित्रपटातील ‘कौन तुझे यूं प्यार करेगा’, ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘राम सियाराम, जय श्रीराम’, ‘बाहुबली’मधील ‘कान्हा सो जा जरा’ ही गाणी पण आवडली आणि मनोज मुंतशीरचं स्वतंत्र जग खुणावू लागलं.
सर्वात प्रथम तर मनोज मुंतशीर या नावाबद्दलच कुतूहल वाटले. मनोज मुंतशीर म्हणजेच मनोज शुक्ला यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून लिहायला सुरुवात केली. साहिर लुधियानवी, कबीर, दिनकर, दुष्यंत कुमार, हरिवंशराय बच्चन, अटल बिहारी वाजपेयी ही दैवते होतीच, पण जान एलिया, गालीब, मीर, फैजवरसुद्धा विशेष प्रेम होते आणि त्यांच्या प्रेमापायीच मनोज शुक्ला उर्दू पण रीतसर लिहायला, बोलायला, वाचायला शिकले. वाचन वाढू लागले तसं तसे आयुष्याचे अनुभव लिखाणातून प्रकाशमान होऊ लागले, पण लिहिताना ‘मनोज शुक्ला’ या नावाला वजन जाणवत नव्हते. एखादी काच खळकन फुटावी आणि तुकडय़ा तुकडय़ांमध्ये विखुरली जावी तशी मनोज यांची आवड ही विविध तुकडय़ांत विभागली गेली होती. कविता, गीत लेखन, वाचन,भाषण, कथा सांगणे वगैरे वगैरे आणि त्यामुळेच तुकडय़ा तुकडय़ांत विखुरल्या जाणे या अर्थाचा ‘मुंतशीर’ हा शब्द आपल्या नावापुढे धारण केला. टोपण नाव म्हणून आणि मनोज शुक्लाचा मनोज मुंतशीर झाला.
मनोज मुंतशीर यांच्या यूटय़ूब चॅनेलचा शोध लागला. मनोज मुंतशीर यांनी जान एलियावर चार-पाच व्हिडीओज केलेले आहेत. जान एलियाचे चाहते जगभर आहेत. उर्दू शेरोशायरी, गझलसाठी जान एलिया हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे आणि त्यांची शायरी उलगडून सांगणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. ते त्यांनी जमवले. हिंदीच्या अभ्यासकाला रामधारीसिंग दिनकर यांची मोहिनी पडली नाही, तर नवलच म्हणावे लागेल. तशीच मनोज मुंतशीर यांनादेखील पडली आणि त्यांनी त्यांचा अभ्यास केला. रश्मीरथी, उर्वशी आणि इतर कलाकृतींवर ते त्यांच्या व्हिडीओमध्ये भरभरून बोलले आहेत. त्यांचे अभिवाचन आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अंगावर काटा येतो. मैथिलीशरण गुप्त, कबीर, हरिवंशराय बच्चन, मुन्शी प्रेमचंद, अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरचे व्हिडीओ ऐकता, पाहताना तृप्ततेची भावना येते. मधूनच कुठलाही व्हिडीओ लावला आणि ऐकले तरी चालते. तुम्ही कवींचे मूळ काव्य पण अनुभवू शकता आणि त्यामागचे मनोज मुंतशीर यांनी केलेले मधाळ रसग्रहणही.
मला विशेष आवडलेल्या आणि जरूर ऐकाव्या अशा मालिका म्हणजे ओशोंवरचे दोन भाग, महाभारतावरील कमी ज्ञातअसलेल्या प्रकरणांवरील चार भाग, पंडित नरेंद्र मिश्र यांची गोरा बादलची कथा, प्रसिद्ध हिंदी लघुकथांवरच्या मालिका. या व्हिडीओमध्ये मनोज मुंतशीर फक्त ते काव्य, ती कथा वाचून दाखवत नाहीत, तर त्यामागची पार्श्वभूमी, कोणत्या काळात, कोणत्या परिस्थितीत या गोष्टी लिहिल्या गेल्या हेदेखील सांगतात. कथा किंवा कवितेची पार्श्वभूमी नीट कळली की, ते समजून घ्यायला सोपे जाते. यासोबतच त्यांनी खूप साऱया कविता, गाणी लिहिली. त्यामुळे त्यांच्यातील एका सृजनशील लेखकाची ओळख झाली.
मनोज मुंतशीर हे मध्यंतरी एका वादाचा हिस्सा ठरले. याबाबत मनोज मुंतशीर यांनी ‘बहारों के जमाने मे कहाँ एहसास था मुझको, मेरे पेडो से एक दिन सब परिंदे रुठ जायेंगे’ अशी खंत बोलून दाखवली. कलाकाराचे असे हळवे मन जाणून समाजाने हे विसरले पाहिजे. सृजनशील वृत्तीचे मनोज मुंतशीर हिंदी आणि उर्दू साहित्याची फार चांगली ओळख करून देतात. नव्या वाचकांना वाट दाखवतात तो ठेवा आपल्या हातातून निसटायला नको.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)

























































