विज्ञान-रंजन – नीलमत्स्य!

>> विनायक

देवमासा. आपल्याकडे विशालकाय माशांसाठी हा छान शब्द आहे. तो वापरण्याची वेळ फारशी येत नाही. कारण आता जीवशास्त्र शिकणाऱ्यांना ‘व्हेल’ मासा ठाऊक असतो. त्याचा विशाल आकार आणि जीवनमान काही निराळंच. त्यातील ब्ल्यू व्हेल हे सर्वात विशालदेही मासे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यापूर्वी हा विषय सुचला तो एका आठवणीने. अशा ‘जनरल नॉलेज’चा आमच्या शाळेत आठवडय़ा-पंधरवडय़ातून एक ‘तास’ असायचा. गप्पागोष्टींच्या स्वरूपात आमचे एक सर (त्या वेळी आम्ही गुरुजी म्हणायचो) त्या दिवशीचा ‘पोर्शन’ आधीच संपवून आम्हाला करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमापलीकडचं ज्ञान देत असत. हा अभ्यासाचा किंवा परीक्षेचा भाग नव्हता, तर ‘सामान्य ज्ञानविस्ताराचा’ होता आणि मास्तरांनी तो स्वतःच ठरवला होता. असे शिक्षक आम्हाला भेटले हे भाग्यच. गोष्टीरूपाने त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी पुढच्या आयुष्यात उपयोगी ठरल्या.

एकदा त्यांनी आम्हाला प्रश्न केला, ‘पृथ्वीवरचा आकाराने सर्वात मोठा सजीव कोणता?’ आम्ही एकमुखाने उत्तर दिलं ‘हत्ती!’ गुरुजी हसून म्हणाले, ‘सगळे नापास!’ आम्ही गप्प. मग त्यांनी आणलेला एक जाडजूड एन्सायक्लोपिडिया म्हणजे माहितीकोष काढला (या शब्दांचा परिचयही त्याचदिवशी प्रकर्षाने झाला). मग गुरुजींनी त्यातलं ‘ब्ल्यू व्हेल’ माशाचं दोन पानं भरलेलं मोठं चित्र दाखवून म्हटलं, हा तो समुद्री सजीव. पृथ्वीवरच महासागर आहे हे तुम्ही विसरलात. त्यातला हा ब्ल्यू व्हेल पिंवा ‘नीलमत्स्य’ पृथ्वीवरचा आकाराने सर्वात मोठा सजीव आहे. एखाद्या व्हेलच्या पोटात पाच-सात हत्ती सहज मावतील!

यातल्या शेवटच्या वाक्याने निर्माण केलेलं पुतूहल आजतागायत टिकलंय. म्हणून या वेळी ‘ब्ल्यू व्हेल’ची साठ वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा कितीतरी पटींनी उपलब्ध झालेली माहिती आता नव्या माहितीकोषात किंवा माहितीजालात (इंटरनेटवर) सापडेल.

सर्वात ‘सूक्ष्म-मत्स्य’ असतो अवघ्या 8 मिलिमीटर लांबीचा. ही त्याची सर्वाधिक वाढ. बाकीचे त्याहून छोटे हाताच्या बोटावर मावणारे.

इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरच्या दलदलीच्या (स्वॅम्प) ठिकाणी तो नव्याने सापडलाय. या उलट ब्ल्यू व्हेल या ‘देवमाशा’ची विराट काया. अधिकाधिक 30 मीटर (जवळपास 100 फूट) एवढा वाढतो. त्या पिडोसायप्रीस जेनेटिका जीवशास्त्र्ााrय नावाच्या या सूक्ष्म माशाचे वजन जेमतेम एखादा ग्रॅम असेल. नीलमत्स्य (ब्ल्यू व्हेल) मात्र सुमारे 200 टन वजनाचा असू शकतो. पॅसिफिकसारख्या महासागराचेच वसतीस्थान त्याला अधिक मानवणार हे स्पष्ट आहे. खोल सागरतळापर्यंत लीलया जलविहार करणारे नीलमत्स्य लांब, सडपातळ आणि चपळ असतात. त्यांना ‘ब्ल्यू’ किंवा ‘निळे’ मासे म्हणण्याचे कारण त्यांच्या त्वचेचा रंग पाण्यात निळसर-करडा (राखाडी) दिसतो. ब्ल्यू व्हेल किंवा नीलमत्स्य हे माणसांसारखे सस्तन (मॅमल) सजीव आहेत. उत्तर अॅटलँटिक आणि तसेच आपल्या देशाच्या दक्षिणेला असलेल्या विशाल हिंदी महासागरातही त्यांचे वास्तव्य असते. समुद्रात राहणाऱया जिवांसाठी सर्व पृथ्वी संचारासाठी मुक्त असते.

उन्हाळ्याच्या काळात ही नीलमत्स्य मंडळी थंडावा मिळवण्यासाठी ध्रुवीय समुद्रात जातात. त्यांची प्रजोत्पादनाची (ब्रीडिंगची) जागा मात्र काहीशा उबदार समशीतोष्ण भागात असते. हे मासे कधी एकेकटे, तर कधी ‘गट’ करून राहतात. ते परस्परांना 25 हर्टझ ध्वनी लहरींचा आवाज काढून संदेश देतात. तो तारस्वरात असतो.

19 व्या शतकापर्यंत नीलमत्स्य सागरीक्षेत्रात सुखाने जगत होते, परंतु माणूस नावाच्या प्राण्याने ‘प्रगत’ अस्त्र् हाती येताच त्यांची इतकी शिकार केली की, ते जवळपास नष्ट (एक्स्टिंक्ट) होण्याच्या मार्गाला लागले होते! अशी एखादी महाकाय प्रजाती नष्ट करून आपण निसर्गाचा समतोल किती बिघडवतोय याचं ज्ञान असूनही भान नसण्याच्या गोष्टी तेव्हा घडत होत्या आणि आजही घडतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने 1966 मध्ये ‘ब्ल्यू व्हेल’च्या शिकारीवर बंदी घातली. त्यानंतर त्यांची संख्या थोडी वाढली असली तरी जगातल्या सर्व देशांच्या महाकाय नौका समुद्रात सर्वदूर फिरू लागल्यावर त्यांच्या तळाचे ‘फटके’ बसून अनेक नीलमत्स्य घायाळ होतात. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजमुळे भूपृष्ठाप्रमाणेच सागरजलाचे तापमानही वाढते. समुद्रातला मानवनिर्मित वाढता ध्वनीकल्लोळ या साऱ्यांचा विपरीत परिणाम या नीलमत्स्यांवर होत आहे.

हे देवमासे पाण्यात विहरताना सर्वाधिक चांगले ‘अन्न’ पुठे मिळतं ते लक्षात ठेवतात. ताशी दोन ते आठ किलोमीटर वेगाने पाणी कापत त्यांचा जलसंचार सुरू असतो. मात्र गरजेच्या वेळी त्यांचा वेग ताशी 35 किलोमीटरपर्यंतही जातो. समुद्रात हजार फूट खोल पाण्यात ते ये-जा करत असतात. जलपृष्ठावर येताना शेपटीने पाणी उडवतात. एखादा देवमासा अचानक (उलटा) सूर मारून सागरपृष्ठावर आला तर आसपासच्या छोटय़ा बोटी डचमळतात. त्याचं आणि एकूणच मत्स्यमंडळींचं समुद्रात असणं पर्यावरणाच्या दृष्टीने कसं महत्त्वाचं ते पुढच्या लेखात.