
स्वाती नक्षत्राचा पाऊस सागरी भागात पडला तर ‘मोती’ पिकतात असं आम्ही बालपणापासून ऐकत आलोय. आपल्या कृषिप्रधान देशात 27 नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्रेच अधिक महत्त्वाची. ‘हस्त’ नक्षत्राचा पाऊस पडला की, ‘मृग’ नक्षत्रापासून संततधार धरणारा पाऊस संपत आल्याची नांदी. ‘हस्ता’नंतरच्या ‘चित्रा’ नक्षत्रात पावसाने शेतकऱ्यांसाठी उसंत घ्यायला हवी ही अपेक्षा आणि त्यानंतरच्या ‘स्वाती’ नक्षत्रात मात्र मोत्यांच्या उत्पादनासाठी ‘आ’वासून बसलेल्या शिंपल्यांमध्ये पावसाचे थेंब पडले तर त्यातून मोती पिकतात असं शेकडो वर्षांचं अनुभवजन्य निरीक्षण.
या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वाती नक्षत्र लागतं. यंदाचा पाऊस फारच लांबला. हा लेख लिहीत असताना किनारपट्टीच्या भागातून त्याने माघार घेतलेली दिसतेय खरी, पण समुद्रात वारंवार उद्भवणारे कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे यांची कारणे काहीही असली तरी शेतातल्या मोत्यासारख्या आणि सागरातल्या खऱ्या मोत्यांच्या ‘पिका’वर त्याचा विपरित परिणाम दिसतोय हे मात्र वास्तव.
आता केवळ ‘स्वाती’ नक्षत्रातल्या पावसाच्या पाण्यानेच ‘मोती’ पिकतात असं नाही. कारण मोत्यांची पैदास जगात सर्वत्र होत असते. हिंदुस्थानातले मोती उत्पादन परंपरेने मोठ्या प्रमाणावर होते ते दक्षिणेकडच्या श्रीलंकेजवळच्या ‘गल्फ ऑफ मन्नार’ किंवा मन्नारच्या आखातामध्ये मोत्यांची निर्मिती होत असल्याची आणि हे विविधरंगी नैसर्गिक मोती दक्षिणेतील पाण्डय़ राजांपासून ते सम्राट अशोकाच्या राजप्रासादापर्यंत पोहोचत असल्याचा इतिहास आहे. या ठिकाणी सापडणाऱ्या आठ प्रकारच्या मोत्यांची नोंद आढळते.
मन्नारप्रमाणेच हिंद महासागर, लाल समुद्र या भागांत प्राचीन काळापासून अनेक पाणबुडे समुद्रातून मोती काढत असल्याचेही उल्लेख आहेत. मोती हा तेजस्वी नैसर्गिक मणी दागिन्यांची शोभा वाढवणारा आहेच. मोत्याच्या माळा, कंठा, कानातली भिकबाळी वगैरे पुरुषी दागिनेही त्या काळात मोठय़ा प्रमाणावर वापरले जात. राजेरजवाड्यांना मिळणाऱ्या बहुमोल नजराण्यांमध्ये मोत्याचा समावेश असायचा. काही राजांकडे पोत्यांनी मोती असायचे आणि ते धान्यासारखे वाळवले किंवा सुकवले जायचे अशा कथा अतिरंजित असतीलही, पण त्यातून मोत्यांची पैदास आणि हव्यास या गोष्टी प्रतिबिंबित होतात.
पाश्चात्य देशात स्पॅनिश लोकांनी क्युबा, व्हेनेझुएला, मार्गारिटा इत्यादी देशांजवळच्या समुद्रात मोत्यांचा शोध घेणाऱ्या मोहिमा काढल्या. या भागांत मोत्यांची पैदास करणाऱ्या आणि शिंपल्यात ‘ऑइस्टर’ किड्यांचा मोठय़ा प्रमाणावर अधिवास होता.
वैज्ञानिकदृष्टय़ा मोती म्हणजे शिंपल्यातल्या लिबलिबित किंवा गोगलगायीसारख्या मऊ शरीराच्या मोलस्क (किंवा कालव) जिवांद्वारे तयार होणारा कठीण पदार्थ आहे. एखाद्या सूक्ष्म वाळूकणाभोवती हे शिंपल्यातले जीव त्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या रसाचं ‘कवच’ करतात. त्यात मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असल्याने ते घट्ट होत जातं. या द्रवाचे एकावर एक थर साचून ‘मोती’ बनतो. अत्यंत गोलाकार मोती जास्त किमतीचा ठरतो. अनेक मोती वेगवेगळय़ा आकारांचे असतात. नैसर्गिक मोत्यांचे शिंपले मिळवण्यासाठी सागरतळी फार शोध घ्यावा लागतो. मोत्याची प्रचंड मागणी नैसर्गिक मोती पूर्ण करू शकत नाहीत हे लक्षात आल्यावर मोत्यांची निर्मिती करणाऱ्या ‘ऑइस्टर’ची समुद्राच्या खाऱ्या किंवा गोड्या पाण्यातही ‘शेती’ करून कृत्रिमरीत्या मोती उत्पादन करण्यावर विचार सुरू झाला. त्याचाही इतिहास मोठा आहे. चीनमध्ये सन 960 च्या काळात ‘सॉन्ग’ राजांनी अशा उद्योगाला प्रोत्साहन दिलं. 16 व्या शतकापासून ही चिनी विद्या युरोपात पोहोचली. त्यांनी त्यावर मायक्रोस्कोपसारखी उपकरणं वापरून विविध प्रयोग केले. त्यातून कृत्रिम मोती निर्मितीच्या ‘सॅण्ड ग्रेन कॉझेशन’ किंवा ‘पॅरॅसाइट कॉझेशन’ पद्धती विकसित झाल्या.
1916 मध्ये जपानने त्यात आघाडी घेतली. ‘झकोया पर्ल ऑयस्टर’ शोधून त्यांनी अक्षरशः मोत्याचं पीक घेतलं! अर्थात, त्या प्रयत्नात 12 वर्षे गेली. म्हणजे 1928 पासून कृत्रिम मोत्यांची पैदास वेगाने होऊ लागली. त्याला आता एक शतक होत आलंय. रंगीत खनिज मिसळून रंगीत मोतीही तयार केले जाऊ लागले. उदाहरणार्थ, कोबाल्ट क्लोराइडचा वापर करून गुलाबी रंगाचे मोती बनवले जातात. कृत्रिम मोत्यांमध्ये अकोया, ताहितियन, गोड्या पाण्यातील तसेच दक्षिण सागरातील मोत्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. अकोया मोती चमकदार, तर ताहितियन मोती काळ्या रंगाचे (ब्लॅक पर्ल) असतात. दक्षिण सागरातील मोती सोनेरी रंगाचे तसेच शुभ्र रंगाचेही बनतात. गोड्या पाण्यात बनवले जाणारे मोती विविध आकार आणि रंगांचे बनवता येतात. जगभर प्रतिवर्षी सुमारे 2000 मेट्रिक टन कृत्रिम मोत्यांची निर्मिती होते. त्यात चीनचा वाटा 1600 टनांचा असतो.
मोत्याची किंमत त्याच्या आकार, वजन आणि चमकदारपणावरून ठरते. मोती हजारापासून, लाखो रुपये किमतीचे असू शकतात. दागिन्यांसाठी तर मोत्यांचा वापर होतोच, पण आयुर्वेदात, ‘मौक्तिक भस्म’सारख्या औषधांसाठीही होतो.