साहित्य जगत- या पुण्याचे काय सांगावे?

>> रविप्रकाश कुलकर्णी

 पुण्याचे म्हणून एक वेगळेपण नक्की आहे. तो तिथल्या पाण्याचा गुणधर्म आहे का? आता हे पाणी मुळा नदीचे का मुठेचे याबद्दल अजून एकवाक्यता झालेली नाही!

पण पुण्याचे हेच वैशिष्टय़ आहे. त्यामुळे एकाच वेळी एखाद्या विषयावर परस्परविरोधी मते पुण्यातच दिसतात. पुण्याचे असेही वेगळेपण आहे! मग कोणी ‘आधीच पुणे गुलजार…’ असे म्हणतात, तर ‘काय बाई पुण्याची तारीफ, लवंगा निघाल्या बारीक’ असेही म्हटले जाते.

तात्पर्य, पुण्याबद्दल आतापर्यंत इतक्या जणांनी लिहिले आहे तरी पुण्याचा शोध संपलेला नाही. या सगळ्याचा मागोवा रवींद्र श्रीराम ठिपसे घेत आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी ‘वैभवशाली पुणे शहर-वर्णनात्मक ग्रंथसूची’ तयार केलेली आहे. एकूण 486 नोंदी यात आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पुणे शहरावरील प्रकाशित मराठी ग्रंथांची वर्णनात्मक सूची तयार करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न असावा असे वाटते. सदरच्या सूचीतील प्रत्येक ग्रंथाचा ग्रंथकार, ग्रंथनाम, प्रकाशन वर्ष, प्रकाशक, आकार आणि पृष्ठ संख्या, छायाचित्रे आणि नकाशे (असल्यास) यांचा तपशील दिलेला आहे. ग्रंथातील विषयाची थोडक्यात माहिती दिलेली आहे. ग्रंथात ग्रंथनाम सूची आहेच. शिवाय पुण्यासंबंधात लेखिकांनी लिहिलेले ग्रंथ, विशेष ग्रंथांची माहिती, ग्रंथांचे प्रकाशन स्थळानुसार तपशील, प्रकाशित ग्रंथाचा दशवार्षिक कालानुसारी तपशील, निवडक स्मरणिकांची सूची अशी परिशिष्ट देखील आहेत.

मराठीत ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे पहिले स्थळवर्णनात्मक पुस्तक गोविंद नारायण माडगावकर यांचे ‘मुंबईचे वर्णन’, प्रकाशन वर्ष 1863. त्या प्रेरणेतूनच 1868 मध्ये नारायण विष्णू जोशी यांनी ‘पुणे शहराचे वर्णन’ हे पुस्तक प्रकाशित केले आणि तेव्हापासून पुण्यावर पुस्तके येतच आहेत. त्यात विविधता तरी किती असावी?

या सूचीत अरुण टिकेकर व अभय टिळक यांनी संपादित केलेल्या ‘शहर पुणे’ या बृहत ग्रंथापासून पुण्यात ज्या चहाला अमृततुल्य म्हणतात त्या आद्य अमृततुल्य आणि इतर चहांची माहिती देणारा विलास पायगुडे यांचा ग्रंथदेखील आहे. जोशी-अभ्यंकर खून खटल्यासंदर्भात मुनव्वर शहांचे ‘यस, आय आम गिल्टी’ या आत्मकथनाची नोंद इथे आहे. तसेच या खटल्याची पार्श्वभूमी असलेली नारायण पुराणिक यांच्या ‘ओके बॉस’ या कादंबरीचीदेखील नोंद आहे. तसेच कुंडलिक गावडे यांचं ‘यस, माय लॉर्ड! हे खरे आहे!’, ज्यात पुण्यातील वकिलांचे दर्शन घडवलेले आहे.

संपादकांनी ‘पुणे शहर ग्रंथसूची’ असे जरी म्हटले असले तरी त्यांनी काही पत्र-पत्रिकांचा, पुस्तिकांचा समावेश केलेला दिसतोय. उदाहरणार्थ, दत्तो वामन पोतदारकृत 1921 साली प्रकाशित झालेली ‘आपले पुणे’ ही चार पानी पत्रिका. संपादकाने शिक्षण प्रकाशक मंडळींचे कार्यालय येथे असलेल्या पोतदार संग्रहातून ती मिळवलेली आहे. या अतिदुर्मिळ पुस्तिकेची संपादक माहिती देतात… ‘पूर्वी जशी सिनेमाच्या गाण्यांची चार किंवा आठ पृष्ठांची घडीची पुस्तिका मिळत असे तसे याचे स्वरूप आहे.’ पुढे या कागदाचा आकार सांगत संपादक लिहितात, कागदाच्या एका बाजूवर पुणे शहराचा नकाशा आहे. पृष्ठ एकवर शीर्षक, पृष्ठ क्रमांक दोनवर सदू आणि गोदू यांचा शनिवारवाडय़ासमोरून जात असतानाचा संवाद दिलेला आहे. पृष्ठ क्रमांक तीनवर सोमवार ते रविवार प्रत्येक दिवशी पुण्यातील कोणत्या मंदिरात भेट द्यावी याची आखणी दिलेली आहे. पृष्ठ क्रमांक चारवर सुट्टी संपल्यावर शाळेतील गुरुजी आणि मुलांच्या सुट्टीत कुणी कुणी काय काय पाहिले, याविषयीचा संक्षिप्त संवाद दिलेला आहे. असे हे फक्त चार पानी घडीचे पुस्तक आहे. पुण्यावरील सर्वात छोटे हे पुस्तक आहे.

अविनाश सांगोलेकर संपादित ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा इतिहास’ याची पण दखल घेतली आहे हे विशेष. असे दुसरे पुस्तक असेल की नाही, याची शंका आहे म्हणून ते महत्त्वाचे.

संपादक रवींद्र ठिपसे यांनी पुण्याबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. उदाहरणार्थ, शंकर बापूजी मुजुमदार यांच्या ‘पुणे शहराचा पेशवाईनंतरचा इतिहास’ या पुस्तकाची जाहिरात मुजुमदार यांच्या ‘रंगभूमी’ मासिकात पाहायला मिळाली, पण ते पुस्तक त्यांना खूप प्रयत्न करूनही  अजून मिळालेले नाही, पण त्याची नोंद ठिपसे यांनी केलेली आहे. या ग्रंथसूचीत अतिशय वेगळे प्रकरण आहे, त्याचे शीर्षक आहे, ‘नावात ‘पुणे’ अंतरंगात ‘उणे’.

प्रास्ताविकात संपादकांनी म्हटल्याप्रमाणे, ‘पुणेकर आणि पुण्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असणारे, पुणे शहराबाहेरील जिज्ञासू वाचक तसेच पुण्यावर नव्याने काही लिहू इच्छिणारे लेखक आणि आंतरविद्याशाखीय संशोधक तसेच पुण्याचे सर्वांगीण इतिहासकार यांना या सूचीचा उपयोग होईल असे वाटते.’ संपादकांचे म्हणणे खरेच आहे. म्हणून या ग्रंथसूचीचे स्वागत होवो.