
<<< साधना गोरे >>>
गेला आठवडाभर पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. सगळीकडेच जोरदार बरसला. इतका की, माणसाला तोंड बाहेर काढू दिलं नाही. रस्त्यांची तळी झाली, रेल्वे ठप्प झाली. शाळा-कॉलेज बंद ठेवावी लागली. शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली. अनेकांची घरं पडली. ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. हा असा आडवातिडवा पडणारा पाऊस कधी एकदाचा थांबतोय असं सगळ्यांना होऊन गेलं. पाऊस थांबण्यावरून कॉलेजच्या दिवसांतली एक आठवण जागी झाली.
जन्मापासून मुंबईत राहूनही माझ्या बोलण्यात आजही पश्चिम महाराष्ट्रातला हेल येतोच. तिथल्या बोलीतले काही शब्द आपसूक तोंडात येतात. ‘पाऊस थांबला’ असं न म्हणता मी नेहमी ‘पाऊस उघडला’ म्हणत असे. आजही क्वचित माझ्या तोंडी हा शब्दप्रयोग येतो. माझ्या बोलण्यात अनेकदा हे ऐकल्यावर एक मैत्रीण म्हणाली, “तू पाऊस उघडला कसं म्हणतेस? पाऊस म्हणजे काय छत्री आहे का उघडबंद व्हायला?’’ त्यावर ‘‘आमच्याकडे असं म्हणतात’’ एवढंच उत्तर मी तेव्हा देऊ शकले. प्रांतानुसार पावसासंबंधी असे कितीतरी वैविध्यपूर्ण शब्दप्रयोग वापरले जातात.
मराठीतला ‘पाऊस’ शब्द संस्कृतमधील ‘प्रावृष्’ शब्दापासून आला आहे. पालीमध्ये ‘पावुस’, हिंदी आणि गुजरातीमध्ये ‘पावस’ अशी रूपं आहेत. आता हिंदीमध्ये ‘वर्षाव’पासून आलेला ‘बारीश’ शब्द अधिक रुजला आहे. मराठीतील ‘बरसणे’ हे क्रियापद याला फार जवळचे आहे.
पावसावरून बऱ्याच म्हणी आणि वाक्प्रचार आहेतच, पण त्यासोबत वापरलेल्या क्रियापदामुळेही त्याच्या अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल होतो. उदा. पाऊस उतरणे. अमुक एका दिशेला काळेकुट्ट ढग दाटून आले की, ‘त्या दिशेला पाऊस उतरला आहे’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ त्या दिशेला लवकरच पाऊस पडेल. अलीकडे वातावरणातील बदलामुळे ढगफुटीच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. अशा ढगफुटीला बोलीतला शब्द म्हणजे ‘पावसाचं पोट फुटणं’. या दोन्ही शब्दप्रयोगांवरून लक्षात येतं की, ‘ढग’ आणि ‘पाऊस’ हे शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत.
पाऊस पडण्याआधी आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते. जणू आकाश या ढगांनी व्यापून जातं. केव्हाही पाऊस पडेल असं वातावरण होतं तेव्हा ‘पाऊस डोईवर आला’ म्हटलं जातं. पाऊस थांबणं या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या ‘पाऊस उघडला’ या शब्दप्रयोगात ढगाळलेलं आकाश निरभ्र, स्वच्छ होणं, मेघांची काळोखी कमी होणं या अर्थच्छटा सामावलेल्या आहेत. पाऊस थांबणं, त्याचा जोर कमी होणं या अर्थाने काही भागांत ‘पाऊस हडकला’ असंही म्हटलं जातं. तर आकाश निरभ्र होऊन लख्ख सूर्यप्रकाश पडला की, ‘पावसाने डोळा उघडला’ म्हटलं जातं.
पावसाच्या रूपावरूनही काही शब्दप्रयोग आहेत. उदा. खूप मोठा पाऊस पडत असेल तर ‘मुसळधार’ म्हटलं जातं. जणू काही मुसळाएवढा मोठ्या धारेचा पाऊस पडत आहे. धारही नाही आणि सरही नाही, तर नुसता बुरबुर पाऊस पडत असेल तर त्याला ‘कोंड्याचा पाऊस’ म्हणतात. अशा पावसात बारीक बारीक तुषारांचा वर्षाव होतो. गंमत म्हणजे अतिशय थोडा पाऊस पडतो, म्हणजे एखादी सर येऊन लगेच थांबते तेव्हा त्याला ‘पावसाचे पिल्लू’ म्हटलं जातं.
‘पावसाने झोडपलं, नवऱ्याने मारलं आणि राजाने लुटलं तर कोणाकडे फिर्याद करावी?’ असा एक जुना शब्दप्रयोग आहे. आज नवऱ्याने, राजाने म्हणजे सरकारने केलेल्या अन्यायाची तक्रार करायला पोलीस, न्यायालयं या यंत्रणा आहेत. मग भले तिथं न्याय न मिळो किंवा न्यायाची वाट पाहण्यात माणसांची आयुष्य खर्ची होवोत, पण पावसाने केलेल्या नुकसानीची तक्रार करायला कुठं जागाच नाही. फार फार तर सरकारी यंत्रणा त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असतात. भले ती पुरेशी नसली तरी. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच कवयित्री इंदिरा संतांनी ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी’ अशी थेट पावसालाच ‘पडू नकोस’ म्हणून विनवणी केली असेल!
भारतासारख्या कृषीप्रधान देशात पाऊसपाणी नसेल तर फक्त शेतकऱ्याचीच नाही, तर सगळ्या मनुष्यजातीचीच दुर्दशा होते. म्हणून योग्य प्रमाणात पाऊस पडून चांगलं पीक येणं कसं लाभदायक आहे हे सांगणाऱ्या काही म्हणी आहेत – पाऊस पडे मोती गळे, पाऊस पडेल तर पाणी साचेल (तळी, विहिरी इ.मध्ये), पाऊसपाणी आबादानी – धान्याचे मडके दणदणी. एकूण काय, अति आला तर अडचण अन् अजिबात नसला तर खोळंबा अशातली पावसाची गत आहे!