
समर्थ संप्रदायामध्ये ज्या कवयित्री झाल्या त्यामध्ये ‘वेणाबाई’ यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो. संत बयाबाई या वेणाबाई यांच्या शिष्या होत. ‘बयाबाई’चा उल्लेख ‘बायजाबाई’ असाही केला जातो. त्यांच्या स्थलकालाबद्दलची माहिती उपलब्ध होत नाही. तथापि ज्या समर्थ संप्रदायाचे एक प्रमुख संत गिरिधरस्वामी हे त्यांचे शिष्य होते, अशी माहिती उपलब्ध मिळते. बयाबाईंनी विपुल लेखन केलेलं नाही. सध्यातरी त्यांची अल्पस्वल्प स्फुटरचनाच प्रकाशात आली आहे. ती प्रामुख्यानं पदांच्या स्वरुपात आहे. या पदांमध्येही गुरुभक्तिपर आणि गुरुमाहात्म्यापर रचनेस विशेष महत्त्व आहे.
बयाबाईंच्या पदांमध्ये गुरुनं आपल्याला साधना कशी करावी, हे सांगितलं. या साधनेतील खाचखळगे, अडथळे आपल्या लक्षात आणून दिले. उपासनेतले हे अडथळे कसे दूर करावेत, याचं अचूक मार्गदर्शन केलं. त्यामुळे आपल्याला परमार्थ मार्गाची यथायोग्य कल्पना आली आणि आपल्या जीवनाचं कल्याण झालं. अशा आशयाची श्रद्धायुक्त भावना व आपल्या गुरुविषयीची अपार श्रद्धा बयाबाईंच्या पदांत व्यक्त झाली आहे. त्यांतून स्त्राrसुलभ भावनांचाही भक्तिमय आविष्कार त्यांच्या रचनेत झाला आहे. बयाबाईंची रचना अत्यंत रसाळ असून गेयता हे तिचं वैशिष्टय़ आहे.























































