
संत निर्मळा या संत चोखा मेळा यांची लहान बहीण, तर सोयराबाई यांच्या नणंद होत्या. त्याचबरोबर सोयराबाईचे बंधू बंका यांच्या पत्नी होत्या. ज्या काळात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या तटबंदीमध्ये गावकुसाबाहेरील समाजाची मोठी घुसमट होत होती, ती कोंडी फोडण्यात चोखोबांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा होता. वर्णव्यवस्थेला धडका देत असतानाच कर्मकांडांमुळे गलितगात्र झालेल्या समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला, त्यात महिला संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो. निर्मळा यांचे सर्व कुटुंब भाविक होते. पंढरीची नित्य वारी करणारे होते.
मेहुणाराजा येथून वारी करणे अवघड होऊ लागल्यानंतर हे कुटुंब बराच काळ पंढरपूर येथे राहिले. परंतु चोखा मेळा यांच्या अपघाती निधनानंतर निर्मळा आणि त्यांचे पती बंका पुन्हा मेहुणाराजा येथे आले. आजही निर्मळा नदीतीरावर त्यांच्या समाधी आहेत. समाज अनिष्ट प्रथांना बळी पडत असताना निर्मळा यांनी वेगळी वाट निवडण्याचा प्रयत्न केला. कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिला. या पर्यायाच्या आघाडीच्या प्रचारक म्हणून निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते.























































