
सरदार भीमराव यशवंतराव पानसे हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी योद्धे होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ते पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख सरदार होते. त्यांनी सोनोरी येथे मल्हारगड किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याच्या उभारणीमागे एक विशेष हेतू होता. पश्चिम घाटावर लक्ष ठेवण्यासाठी आणि या घाटातून आगेकूच करणाऱया शत्रूंच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. तसेच सोनोरी गावात एक भव्य चिरेबंदी वाडा बांधला, जो आजही अस्तित्वात आहे. त्यांनी बांधलेला मल्हारगड हा मराठा साम्राज्यातील सगळ्यात शेवटचा किल्ला मानला जातो. भीमराव यशवंतराव पानसे यांनी पानिपतच्या युद्धापासून ते ब्रिटिशांशी लढा देण्यापर्यंत मराठा साम्राज्याच्या संरक्षणात मोलाचे योगदान दिले. त्यांची समाधी सोनोरी येथील त्यांच्या ऐतिहासिक वाडय़ाच्या परिसरात अस्तित्वात आहे, जी त्यांच्या घराण्याच्या शौर्याची साक्ष देते, परंतु सध्या या वास्तूची बरीचशी पडझड झाली असून वाडय़ाला भग्नावस्था प्राप्त झाली आहे.



























































