
दिवंगत ख्यातनाम लेखक-पत्रकार शिरीष कणेकर यांच्या गाजलेल्या ‘पुन्हा यादों की बारात’ या पुस्तकातील आशाताईंचे हे शब्दचित्र…
मला असं कळलं की, एका ‘काॅमन’ ओळखीच्या माणसाजवळ आशा भोसले माझ्याविषयी एकच प्रश्नार्थक वाक्य बोलली, “हा माणूस काय मला प्लेबॅक सिंगर मानत नाही वाटतं?’’
रानडुकराच्या कपाळाच्या मधोमध गोळी घालतात तेव्हा त्याला कसं वाटत असेल याची ‘या माणसाला’ साधारण कल्पना आली. वास्तविक मी दिलीपकुमारवरही मोठं असं काही लिहिलेलं नाही. श्यामसुंदर माझा अत्यंत लाडका संगीतकार; पण त्याच्यावरही हातून लिहिणं झालेलं नाही. माझ्या निष्कपटीपणाचा हा पुरावा कोर्टात मला संशयाचा फायदा मिळून निर्दोष शाबीत करीलही; पण वैरी न चिंती ते चिंतणाऱ्या माझ्या मनाने मला केव्हाच दोषी घोषित करून टाकलं.
पन्नास ते साठ (फार तर दोन वर्षं अलीकडे व दोन वर्षं पलीकडे!) हा मी हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ मानत आलोय. संगीतकारांनी हिरेमाणकांचे रांजण कानसेनांसमोर ओतले. तेव्हा एकच स्त्रीस्वर आसमंत व्यापून दुमदुमत होता. त्याच्या आसपास पोहोचणारं आधी किंवा नंतर काहीही झालं नाही हे माझ्या कानांचं ठाम मत आहे आणि माझ्या कानांनी इतक्या वर्षांच्या अनुभवाने माझा पूर्ण विश्वास संपादन केला आहे. ज्या काळातील संगीताचा मी ‘दिवानाss परवानाsss’ आहे, त्या काळात आशा अस्तित्वात अवश्य होती; पण आजच्यासारखी राज्यकर्ती नव्हती. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आवाज मोकळा सोडला तर तो इकडेतिकडे गल्लीबोळात भरकटेल अशी अकारण भीती तिच्या मनात असावी. आत्मविश्वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं. एरवी इतक्या दाणेदार व पल्लेदार आवाजाच्या मालकिणीला कसली आलीय डर?
जम बसण्यापूर्वीच्या व स्वत्व गवसण्यापूर्वीच्या काळातही काही गाणी आशाने जीव ओतून सुरेख गायलीत. उदाहरण द्यायचं तर ‘तेरा दर्द है मेरी जिदगी’ (‘रम्मन’ – संगीतकार विनोद – साल 1954), ‘दर्दभरी किसी की याद’ (‘संगदिल’- सज्जाद – साल 1952), ‘देख ली ऐ इश्क’ (‘लैला मजनू – गुलाम महंमद – साल 1953) या गाण्यांचं देता येईल. आशाने या गाण्यांना पूर्ण न्याय दिला तरीही ऐकताना सतत मनात वाटत राहतं की, ही गाणी थोरलीनेच गावीत. असं मनात येणं हे आशा भोसले या स्वतंत्र बाण्याच्या, व्यक्तिमत्त्वाच्या व गायकीच्या कलावतीचं दुर्दैव होय. माणूस दैवाशी टक्कर देऊ शकतो, सामना करू शकतो; पण जिंकू शकत नाही. आपण इंच इंच लढलो एवढ्यावर समाधान मानणं नेहमीच शक्य होतं असं नाही. “मी कायम ‘ऑलसो रॅन’ राहिले हो.’’ आशा अलीकडेच मला विषादाने म्हणाली.
“छे! ‘ऑलसो रॅन’ नाही. ‘रनर्स अप’ म्हणायचं.’’ मी पुटपुटलो.
हंसराज बहेल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 1948 साली ‘चुनरिया’ या चित्रपटात आशा प्रथम गायली. ते गाणं होतं – ‘सावन आया आया आया रे’ (गीता दत्त, जोहराबाई, आशा व कोरस). आशा आधी पोटासाठी गायला लागली; मग पोटच्या पोरांसाठी. रस्ता खाचखळग्यांचा व काटेरी होता. तिच्या पोटावर आपला जाडजूड पाय देऊ पाहणाऱया ढालगज भवान्या व्यवसायात होत्या. द्वंद्वगीत गाताना एक भरभक्कम गायिका कोपराने ढोसून माइकपासून आपल्याला दूर कशी लोटायची याचा किस्सा आशानेच सांगितलाय. तेव्हा आशाचं पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पायघड्या घालून स्वागत झालं असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. पावलागणिक ती झगडली. रोज तिला आपल्या गायकीने लायकी सिद्ध करावी लागली. ‘मंगेशकर मत्तेदारी’ची पोपटपंची करणाऱ्यांनी एक गोष्ट विसरू नये की, त्या ज्या स्थानावर आज आहेत त्या अन्य गायिकांच्या सदिच्छांच्या बळावर किंवा संगीतकारांच्या दयाळूपणामुळे नव्हे, तर निव्वळ स्वकर्तृत्वावर. आपल्या चाली श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्या सर्वोत्पृष्ट माध्यम आहेत अशी संगीतकारांची खात्री पटली म्हणून त्या गाताहेत. या खात्रीवर रसिकांनी एकमुखाने शिक्कामोर्तब केलंय म्हणून त्या गाताहेत. अनेक स्थित्यंतरं, आव्हानं व प्रवाह यांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिलंय म्हणून त्या गाताहेत. कृष्णा कल्ले किंवा अलिशा चिनॉय यांच्या आगमनाने डळमळतील ती आसनंच कसली?
सुरुवातीच्या पाच-सात वर्षांत आशाच्या वाट्याला फारशी गाणी आली नाहीत असा समज आहे. वस्तुस्थिती भिन्न आहे. ‘रम्मन’मध्ये विनोदने तिला दहापैकी आठ गाणी दिली होती. ‘रामजन्म’मध्ये अविनाश व्यासने सहापैकी पाच, ‘ठोकर’मध्ये सरदार मलिकने आठपैकी सहा गाण्यांत, ‘पापी’मध्ये एस. मोहिंदरने आठपैकी सहा गाण्यांत व ‘राजमहल’मध्ये पं. गोविंदरामने सातपैकी सहा गाण्यांत आशाचा आवाज वापरला होता. मात्र तत्कालीन आघाडीच्या मान्यवर संगीतकारांनी आशावर कमी विश्वास टाकला. फुटकळ, उडत्या चालीसाठी त्यांनी आशाला पाचारण केलं. सहनायिका व कॅबरे डान्सर्स यांच्यासाठी आशा गळा झिजवायची, आशाचं रोपटं स्वतंत्र रुजलं होतं. बाजूलाच एक महावृक्ष फोफावला होता, हा ना त्या रोपट्याचा दोष ना त्या महावृक्षाचा! इतर अनेक लहानमोठी झाडं पटापट माना टाकत असताना आशाच्या रोपट्याने नुसताच जीव धरला नाही, तर ते वाढीस लागलं व बघताबघता स्वतःच एक डेरेदार वृक्ष बनलं. ‘वेडे, पुरूप पिल्लू’ पार्श्वगायनाच्या तळ्यात राजहंसाप्रमाणे विहार करू लागलं.
असं का व्हावं समजत नाही; पण आशाची ‘सोलो’ गाणी चटदिशी आठवत नाहीत. पण सर्व संगीतकारांकडे आशाची उत्तम गाणी आढळतात. नमुन्यादाखल ही काही गाणी पाहा. अनिल विश्वास (‘दिल श्यामसे डुबा जाता है’-‘संस्कार’), सी. रामचंद्र (‘दिल लगाकर हम ये समझे’ ‘जिंदगी और मौत’), ‘मदन मोहन (‘सबसे यह कह दो ‘बैंक मॅनेजर’), रोशन (‘निगाहे मिलाने को’ ‘दिलही तो है’), नौशाद (‘तोरा मन बडा पापी’- ‘गंगा जमना’), शंकर-जयकिशन (‘पान खाए सैय्या’ – ‘तीसरी कसम’), हेमंतपुमार (‘भीगी भीगी फिजा’ – ‘अनुपमा’), एस.डी. बर्मन (‘काली घटा छाये’- ‘सुजाता’), रवी (‘मुझे गलेसे लगा लो’ – ‘आज और कल’), एन. दत्ता (‘किस जगह जाये’- ‘लाइट हाऊस’), सरदार मलिक (‘ऐ गमे दिल’ – ‘ठोकर’), सलील चौधरी (‘मेरी वफाये तुम्हारी जफायें’ – ‘अनामत’), आर.डी. बर्मन (‘मेरा कुछ सामान’ – ‘इजाजत’). तशा आशाने बऱयाच गमती केल्यात. ‘मेरे जीवन में आया है काैन’ (‘प्यासे नैन’ – एस.के. पाल) या तलतच्या गाण्यात तिने पार्श्वभूमीवर नुसत्याच सफाईदार, भिंगरीसारख्या ताना मारल्यात. ‘प्यार पर बस तो नहीं है’ (‘सोने की चिडिया’ – ओ.पी. नय्यर) या तलतच्या गाण्यात मधेच सुरेल लकेरी मारल्यात. ‘ये हसता हुवा कारवाँ’ (‘एक झलक’ – हेमंतपुमार) या हेमंकुमारच्या गाण्यात ती मधेमधे बोललीय तर ‘मेरा नाम है शबनम, प्यारसे मुझे लोक ‘शब्बो’ कहते है’ हे बोलत गायलीय व गात बोललीय.
एकापेक्षा एक सरस गाणी दिली जात होती त्या काळात आशाचं बस्तान बसायचं होतं. आज आशा पूर्ण भरात येऊन बेफाम गातेय तर त्या लायकीच्या चालीच निर्माण होत नाहीत. आशाच्या आवाजाला आव्हान देतील अशा ताकदीचे संगीतकार राहिलेले नाहीत. “आज मी शंभर गाणी गायली तर त्यातली धड पाचदेखील बरी निघणार नाहीत,’’ असं आशा नशिबाला बोल लावत म्हणते. चित्रपटसंगीतातून जान निघून जावी तशी ‘मेलडी’ निघून जावी हा दैवदुर्विलास. मुळात डिस्को संगीत ऊर्फ मुसळाचं कांडणं किंवा ब्रेक डान्स ऊर्फ हाडवैद्याची बरकत हा संगीत-खून आवडला तर ना त्यातल्या आशाच्या गाण्यांचं कौतुक वाटणार? आज आशाची ‘गलेबाजी’ पाहायची असेल तर त्यासाठी गुलाम अलीबरोबरच्या तिच्या गझला व ‘भीनी भीनी भोर आयी’ किंवा ‘जूठे तेरे नैन, सौतन की छबी छूके आये’ यासारख्या आर.डी. बर्मनच्या गैरफिल्मी रचना ऐकाव्यात.
कधी कधी वाटतं की, या देशात दोनच भोसले झाले. शिवाजी आणि आशा. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले!
n आशाच्या पंखांना गरुडाचं सामर्थ्य देण्याची किमया निःसंशयपणे ओ.पी. नय्यरच्या संगीताने केली. ‘छम छमा छम’ (1952) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1973) या एकवीस वर्षांत 51 चित्रपटांत ओ.पी.ने आशाला 162 ‘सोलो’च 154 द्वंद्वगीतं दिली. दुसऱ्या कुठल्याही संगीतकाराने आशाला इतकं मोकळं रान दिलं नाही. ओ.पी.कडे (व त्या खालोखाल एस.डी. बर्मनकडे) आशा तुफान गायली. आपण ओ.पी.च्या प्रमुख पार्श्वगायिका आहोत या अभिमानास्पद जाणिवेतून आलेला जबर आत्मविश्वास तिच्या गाण्यांतून दिसतो. ‘घबराइये न हमसे, शरमाइये न हमसे (‘दो दिल धडक रहे हैं’, ‘इन्साफ’ चित्रगुप्त) असं ती तलत महमूदला म्हणाली असली तरी गायकांनी खरोखरच वचकून राहावं असं तडाखेबंद गाणं ती ओ.पी.कडे गायली. ‘कुछ तो ऐसी बात कर जालीम’ (‘कैदी’), ‘छोटासा बालमा’ (‘रागिनी’), ‘आइये मेहरबाँ’ (‘हावडा ब्रिज’), ‘रातों को चोरी चोरी’ (‘मुहोब्बत जिंदगी है’), ‘मैं शायद तुम्हारे लिये’
(‘ये रात फिर ना आयेगी’), ‘मेरी जान तुम पे सदके’ (‘सावन की घटा’), ‘ये है रेशमी’ (‘मेरे सनम’) व ‘चैनसे हमको कभी’ (‘प्राण जाये पर बचन नं जाय) या व अशा अनेक गाण्यांत आशाने अतुलनीय करामत दाखवली. ओ.पी.कडच्या तिच्या रफीबरोबरच्या द्वंद्वगीतांची मी खास कॅसेट बनवून घेतलीय इतकी त्यांची गोडी अवीट आहे. एवढं सगळं असलं तरी ओ.पी.ने आशा घडवली हे दगडातून मूर्ती घडवली याअर्थी जे म्हटलं जातं ते मला मान्य नाही. संगीतकार गायक-गायिका तयार करू शकतात हे मला पटत नाही. तसं असतं तर एवढ्या मोठ्या शंकरने शारदाला केवढी मोठी गायिका केली असती. खुद्द ओ.पी.ने दिलराज काैर व कृष्पा पागधरे यांना नसतं का घडवलं? त्याचप्रमाणे गायक संगीतकारांना घडवतात हेही तितकंच झूट. रफीने नौशादला घडविलं तर तो चित्रगुप्त, इक्बाल पुरेशी व सोनिक ओमी यांना का नाही घडवू शकला? तेव्हा ओ.पी. व आशा यांनी एकमेकांना घडवलं नाही. ते एकमेकांना पूरक ठरले. आशाला अशा संगीतकाराची नितांत गरज होती व त्यालाही अशा आवाजाची तितकीच गरज होती.






























































