प्रासंगिक – भक्तांना आनंद पर्वणी

>> स्वाती विप्रदास

श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा समाधी सोहळा 28 एप्रिल ते 6 मे या कालावधीत साजरा होत असून भक्त त्याची वाट पाहत असतात. देश – परदेशातून भाविक या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. हा सोहळा म्हणजे भक्तांसाठी आनंद पर्वणीच असते. येणारा प्रत्येक जण महाराजांकडे काही तरी गाऱहाणी घेऊन आलेला असतो. काहीतरी मागायला आलेला असतो. तरी महाराज प्रत्येकाचे गाऱहाणे ऐकतात. त्याला मार्ग दाखवतात. दररोज काहीना काही नवी मागणी असते. इतके स्वार्थी मन असले तरी सद्गुरू दूर लोटत नाहीत. प्रपंचातील अडचणी सोडवताना काही संपून जातात. काही जण व्यसनात अडकतात आणि काही जण भक्ती पंथात येतात, संतसेवा करतात. जसे त्यांना अनुभव येतात तसे ते सद्गुरूंना हृदयात ठेवतात. संत हे आईच आहेत. आपण साधना वाढवत नेली पाहिजे. साधनेपेक्षा या जगात काहीच नाही. साधनेत सत्यता असावी, स्वार्थीपणा नसावा एवढीच मागणी सद्गुरूंची असते. काम, क्रोध, लोभ, माया, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू मनाची शांतता सारखी बिघडवतात. आपण त्या षडरिपूंना आवरू शकत नाही आणि मग मार्ग चुकतो त्या सगळ्या गोष्टीपासून आपले आपण संरक्षण नाही करू शकत. आपले संरक्षण फक्त संतच करू शकतात. सद्गुरू शंकर महाराज यांच्या धनकवडी येथील मठात त्रिकाल आरती असते. भक्तांना रोज खिचडीचा प्रसाद मिळतो. दुर्गाष्टमी सोहळा असतो. भजन, कीर्तन, गायन असते. ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, शंकरगीता, गुरुचरित्र अशा ग्रंथांचे पारायण असते. महाअष्टमी सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमांची पर्वणीच असते. सात दिवस. लघुरुद्र, महारुद्र, याग, सप्तशतीपाठ, नवचंडी, शतचंडी, भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड… नुसता हरिजागर असतो. शेवटी कार्ल्याचे कीर्तन होते आणि कार्यक्रमांची सांगता होते. या सोहळ्यात प्रचंड अन्नदान होत असते. सर्वश्रेष्ठ आहे संतसेवा. जी जगण्याचे बळ देते. सद्गुरू उदासीनतेपासून मनाला बाहेर काढतात आणि उपासनेचा मार्ग धरावा असे विचार करायला शिकवतात.