जाऊ शब्दांच्या गावा – मुसळामुसळाची गाठ!

>> साधना गोरे

एक काळ असा होता की, पाटा-वरंवटा, खल-बत्ता, उखळ-मुसळ या साधनांशिवाय स्वयंपाकघर परिपूर्ण होत नसे, पण विज्ञानाच्या शोधांमुळे ही जुनी यंत्रं मागे पडली आणि विजेवर चालणारी वेगवान यंत्रं आली. त्यामुळे बाईचं रांधण्याचं काम कितीतरी सोपं झालं. तर सांगायची गोष्ट म्हणजे ही पारंपरिक साधनं जोडगोळीनेच वापरता येतात. त्यातलं कुठलंही एक हाताशी नसेल तर सगळं मुसळ केरात गेलं म्हणून समजावं. उखळ-मुसळ या जोडगोळीपैकी गेल्या लेखात आपण उखळाचं मूळ पाहिलं. आता मुसळाचं पाहू..

तर ‘मुसळ’ म्हणजे तांदूळ इ. धान्य कांडण्याचं गोल व लांब लाकूड. मुसळाने धान्य कांडतात म्हणून काही भागात त्याला कांडणीदेखील म्हणतात. युद्धात वापरल्या जाणाऱया ‘गदा’ नावाच्या हत्यारालाही मुसळ म्हटलं जाई. हा शब्द संस्कृतमधील ‘मुसलम्’ या शब्दापासून तयार झाला आहे. ‘मुशलम्’ किंवा ‘मुषलम्’ असाही त्याचा उच्चार केला जातो. आसामीत ‘मुहल’, बंगाली आणि उडियामध्ये ‘मुसल’, हिंदी आणि पंजाबीमध्ये ‘मुसल’, सिंहलीत ‘मुहुरू’, तर गुजरातीत ‘मुसळू’ असे उच्चार आहेत, पण काही भाषा शास्त्रज्ञांनी ‘मुसळ’ शब्दाचं मूळ द्राविडी असल्याचं म्हटलं आहे.

आडमुठापणा करणाऱया धटिंगण मनुष्याला ‘धसमुसळ’ किंवा ‘मुसळ’ म्हटलं जातं. ‘धस’ शब्दाचा एक अर्थ जोराचा हल्ला असा आहे. धान्य कांडण्याच्या क्रियेत उखळातल्या धान्यावर मुसळाचे असेच जोराचे हल्ले, प्रहार करावे लागतात. शिवाय हे काम करताना डोक्याचा फार वापर करावा लागत नाही. ताकदीच्या बळावर एकामागोमाग मुसळाचे दणके देत राहिले तरी धान्य कांडलं जातंच. यावरून वस्तू नीट न हाताळणाऱया, ओबडधोबड काम करणाऱ्या माणसाला ‘मुसळ’ किंवा ‘धसमुसळ’ म्हटलं गेलं असावं.

मोठय़ा पावसाला मुसळधार पाऊस म्हटलं जातं. मोठा म्हणजे किती? तर मुसळाएवढी धार असलेला पाऊस तो मुसळधार. पावसाळ्यात असा जोराचा पाऊस पडला की, वर्तमानपत्रांचे मथळे ‘मुसळधारा’ने चिंब झाल्याचं आपण पाहतो. संत जनाबाई यांनीही अभंगात हा शब्द वापरला आहे – ‘वारा पाणी मुसळ धारा। तेणें मोडिलें छपरा। मग विठाई धांवली। हातीं चक्र धांवत आली।’

खैर, साग, चिंच या झाडांच्या लाकडापासून बनवलेलं मुसळ चांगल्या प्रतीचं समजलं जाई. मुसळ म्हणजे सरळसोट लाकूडच. त्यामुळे त्याला वाकवणं अशक्य! त्यावरून अशक्य गोष्ट शक्य करणं या अर्थाने ‘मुसळाचं धनुष्य करणं’, ‘मुसळाला अंकुर फुटणं’ या म्हणी प्रचलित आहेत. खरं तर मुसळाचं लाकूड रोज वापरून गुळगुळीत झालेलं असतं. त्याला वाकवणं, अंकुर फुटणं ही तशी अशक्यच गोष्ट नाही का?

मुसळाचं हे स्वरूप लक्षात घेतलं की, मुसळ नेसणं/पांघरणं किंवा डोक्याला बांधणं, मुसळस्नान, मुसळामुसळाची गाठ बांधणं हे शब्दप्रयोग कसे तयार झाले असतील हे सहज लक्षात येतं. निर्लज्जपणाने, सभ्यता सोडून वागणाऱया माणसाला ‘मुसळ नेसलेला’ म्हणतात. अंग न चोळता घाईत उभ्यानं अंगावर पाणी घेऊन अंघोळ उरकण्याला ‘मुसळस्नान’ म्हटलं जातं.

हेकट आणि आडमुठा स्वभाव असणाऱया दोन माणसांचं कधी जमू शकेल का? नाहीच जमत ना! पण त्यासाठी मराठी माणसाने मुसळाची कल्पना वापरली आहे – ‘मुसळामुसळांची गाठ बांधता येत नाही’ अशी म्हण त्यासाठी प्रचलित आहे. दोन लाकडांची गाठ बांधणं ही गोष्ट अशक्य आहे, पण त्यातली कल्पना केवढी भन्नाट आहे नाही!

मुसळावरून वापरली जाणारी एक लोकप्रिय म्हण म्हणजे ‘दुसऱयाच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.’ कुसळ म्हणजे वाळलेल्या गवताचा शेंडा अन् तो असतो तरी केवढुसा! स्वार्थी माणसाला इतरांचे लहानसे दोषही दिसतात, पण स्वतःमधले मोठे दोष मात्र दिसत नाहीत, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

लोकप्रिय म्हणीतील दुसरी म्हण आहे, ‘सगळंच मुसळ केरात जाणं.’ महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणं, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. ही म्हण कशी तयार झालीय माहितीये? उखळात धान्य कांडताना, सडताना उखळाभोवती धान्याच्या फोलपटांचा ढीग लागतो. धान्य कांडून, सडून झालं की, मग ही फोलपटे-केर काढला जातो. हा केर काढताना मुसळसुद्धा केर समजून केरात लोटून दिलं जातं. खरं तर मुसळ ही महत्त्वाची गोष्ट, पण दुर्लक्ष झाल्याने केरात जाते.