विश्वजन्माचे रहस्य…

461

सुमारे 13 अब्ज 80 कोटी वर्षांपूर्वी आपले विश्व निर्माण झाले असा आतापर्यंतचा अभ्यास सांगतो. म्हणूनच अवकाशी संशोधनाविषयी अचूक माहिती नसेल तिथे ‘सुमारे’ असा शब्द वापरावा लागतो. त्यात कधीही ‘उन्नीस-बीस’ होऊ शकतं म्हणून ही काळजी.

सध्याच्या आपल्या विश्वनिर्मितीचा प्रचलित सिद्धांत आहे तो ‘बिग बॅन्ग’ किंवा महास्फोटाचा. वास्तविक त्याला ‘बिग एक्स्पॅन्शन’ किंवा महाप्रसरण असं नाव अधिक उचित ठरेल. ‘बॅन्ग’ म्हणजेही विस्फोट नव्हेच. ते जोरदार आवाजाचं निदर्शक आहे. हा शब्द सर्वप्रथम उपरोधाने वापरला तो विश्व स्थिर आहे असं मत असलेले खगोलशास्त्र्ाज्ञ फ्रेड हॉयल यांनी. आपल्या नारळीकरांनी त्यांच्यासमवेत काम केलं होतं. विश्व स्थिर म्हणजे ‘अनादी-अनंत’ स्वरूपात असून त्याचा विशिष्ट क्षणी आरंभ वगैरे झाला नसावा असं ‘स्थिर स्थिती’ सिद्धांताला वाटतं.

परंतु त्याच काळात विश्वातील दीर्घिका परस्परांपासून दूर जात असल्याचं सिद्ध झाल्यावर विश्व ‘प्रसरण’ पावत आहे याला सज्जड पुरावा मिळाला. आता हे प्रसरण-आकुंचनाचं चक्र आहे का हासुद्धा वैज्ञानिक वादाचा विषय, परंतु सर्वसामान्यपणे विश्वाच्या ‘महाप्रसारण’ सिद्धांताला जगत्मान्यता लाभली खरी.

ज्याअर्थी विश्व प्रसरण पावत आहे, त्याअर्थी त्याचा आरंभ कधीतरी झालाच असणार. मग तो कधी झाला? विश्वनिर्मितीच्या काळातला ‘प्रायमॉर्डिअल हायड्रोन’ हुडकण्याचं काम आपल्याकडची खोडद येथील जायन्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपही करत असल्याचं आम्हाला 1993 मध्ये संचालक डॉ. कपाही यांनी सांगितलं होतं.

अशाच जगभरच्या संशोधनातून हळूहळू ‘विश्वाचं वय’ नक्की होऊ लागलं. 1985 पासून त्या आकडय़ात होत असलेला बदल नव्या संशोधनाची साक्ष देतो. विश्वनिर्मिती 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झाली असल्याचे भरपूर पुरावे आता मिळतायत. दीर्घिकांच्या परस्परांपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला ‘रेड शिफ्ट’ असं म्हणतात. कारण प्रकाशकिरणांचा वर्णपट घेतला तर लाल रंगाचे किरण दूरवर जाताना दिसतात. याउलट नीलकिरणांचं असतं. विश्वातील अनेक दीर्घिका परस्परांपासून दूर जात असताना त्याचाच भाग म्हणून काही दीर्घिका ‘जवळ’ येताना दिसतात. याला ब्लू-शिफ्ट म्हणतात. आपली आकाशगंगा दीर्घिका आणि आपली शेजारी म्हणजे 22 लाख प्रकाशवर्षे अंतरावर असलेली देवयानी (ऍन्ड्रोमिडा) दीर्घिका या जवळ येत आहेत. कोटय़वधी वर्षांनी त्यांची टक्कर होईल किंवा त्या परस्परांच्या आरपार जातील असं म्हटलं जातं.

…तर मूळ मुद्दा विश्वनिर्मितीचा. विश्वनिर्मितीपूर्वी एका अतिसूक्ष्म जागेत आजच्या विश्वात प्रसरण होताना दिसतंय ते सारं वस्तुमान सामावलेलं होतं. या अवस्थेला ‘सिंग्युलॅरिटी’ असं म्हणतात. मात्र त्याच्याआधी काय होतं? हा प्रश्न विचारण्याची मुभा नाही. कारण त्यातून विश्वाचं महाप्रसारण सुरू झालं तेव्हाच ‘काळ’ आणि ‘अवकाश’ (टाइम ऍण्ड स्पेस) यांचा जन्म झाला असं मानलेलं असल्याने काळाच्या ‘आधी’ काय असणार असं हे कोडं आहे.

विश्वाचं प्रसारण (13.8 अब्ज वर्षांपूर्वी) सुरू झाल्यावर आधी काही सेकंदांत आणि नंतर तीन मिनिटांत प्रचंड द्रव्य दूरदूर फेकलं गेलं. यासाठी ‘फर्स्ट थ्री मिनिट्स’ हे स्टीफन हॉकिंग यांचे पुस्तक वाचावे. अशा या वेगवान घडामोडींमधून जे द्रव्य उत्पन्न झालं त्यात प्रतिद्रव्य समसमान होतं. त्यांचं परस्परांशी टकरून काही उरत नसल्याचा काळ गेला. त्यानंतर त्यातून जे ‘चुकार’ मूलकण ‘वाचले’ ते म्हणजे आपण ‘पाहू शकतो’ असं विश्व. एकूण विश्वाच्या तुलनेत ते अवघं 4 टक्के आहे. त्यावरून एकंदर विश्वाच्या विराटतेची कल्पना यावी. आता संशोधक कृत्रिम टर्ब्युलन्स किंवा ‘वादळा’चा अभ्यास करून विश्वनिर्मितीच्या काळातील गतिमानतेचा आरंभ झाला का वगैरेचा शोध घेतला जातोय. त्यानंतर आपली सूर्यमाला अवघी 5 अब्ज वर्षांपूर्वीची आहे आणि आपल्यासारखा माणूस फक्त 20 लाख वर्षांपूर्वीचा. विश्वनिर्मितीचं रहस्य कळलं तर मानवी मेंदूला क्षणकाळ शांतता लाभेल आणि पुन्हा नव्या संशोधनाचा आरंभ होईल.

आपली प्रतिक्रिया द्या