
<<< दिलीप ठाकूर >>>
चित्रपट माध्यमात पटकथा लेखन व संकलन या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या! त्यावरूनच चित्रपट टेबलावर बनतो असे म्हटले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, विजय आनंद, हृषीकेश मुखर्जी हे नामवंत प्रतिभावान दिग्दर्शक उत्तम संकलक म्हणूनही ओळखले जातात. व्ही. एन. मयेकर हे हिंदी चित्रपटांचे संकलक म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरले असताना त्यांनी मराठीत चित्रपट दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवला. अलीकडेच मयेकर यांचे निधन झाले. व्ही. एन. मयेकर यांनी गोविंद सरय्या दिग्दर्शित ‘सरस्वतीचंद्र’ (1968) या चित्रपटाच्या वेळेस बासू चटर्जी यांचे संकलक सहायक म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि त्यानंतर काही वर्षांतच बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या निर्मिती संस्थेच्या बासू चटर्जी दिग्दर्शित ‘छोटी सी बात’ (1976) या चित्रपटापासून स्वतंत्रपणे संकलनात पाऊल टाकले.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’ या चित्रपटातील व्ही. एन. मयेकर यांच्या संकलनाचे कायमच कौतुक होत राहिले. दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याकडे ‘अर्धसत्य’ चित्रपटांच्या वेळेस सहायक दिग्दर्शक म्हणून अनुभव घेतल्यावर राजकुमार संतोषीकडे धर्मेंद्रने आपल्या विजयता फिल्म या बॅनरखालील ‘घायल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. संतोषी यांनी मयेकर यांच्याकडे आपल्या चित्रपटाचे संकलन सोपवले. ते त्यांनी अतिशय प्रभावीपणाने पडद्यावर दाखवले. विशेषतः चित्रपटात आपल्या हरवलेल्या भावाचा-अशोक मेहता याचा (राज बब्बर) शोध घेत असलेल्या नायक अजय मेहता (सनी देओल) यास दारूच्या गुत्त्यावर भेटलेला एसीपी जॉय डिसोझा (अन्नू कपूर) नेमके काय घडले हे सांगतो. या दृश्यावरचे व्ही. एन. मयेकर यांचे संकलन एक सर्वोत्कृष्ट म्हणून कायमच गणले जाते. याच चित्रपटातील खारच्या मच्छी मार्केटमधील मारहाण दृश्यावरची व्ही. एन. मयेकर यांची सफाईदार कात्री वाखाणली गेली. या चित्रपटासाठी व्ही. एन. मयेकर यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संकलक या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटापासून व्ही. एन. मयेकर हे राजपुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांचे हुकमी संकलक ठरले. त्यानंतर राजपुमार संतोषी दिग्दर्शित ‘घातक’, ‘अंदाज अपना अपना’, ‘चायना गेट’, ‘द लिजण्डस् ऑफ भगतसिंग’, ‘लज्जा’ वगैरे चित्रपटांचे संकलन व्ही. एन. मयेकर यांनी केले. दिग्दर्शक बासू चटर्जी (‘अपने पराये’, ‘शौकीन’, ‘रत्नदीप’, ‘चक्रव्यूह’ इत्यादी), महेश मांजरेकर (‘आई’, ‘अस्तित्व’, ‘वास्तव’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘जिस देश में गंगा रहता है’ इत्यादी.) या दिग्दर्शकांशी व्ही. एन. मयेकर यांचे अतिशय चांगले सूर जमले. त्याशिवाय व्ही. एन. मयेकर यांनी ‘विवाह’, ‘निगाहबने’, ‘एहसास’,‘सौगंध’, ‘वादे इरादे’ अशा अनेक चित्रपटांचे संकलन केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, हेमा मालिनी यांनी ‘दिल आशना है’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आपल्या या चित्रपटाचे संकलक म्हणून व्ही. एन. मयेकर यांचीच निवड केली.
हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असतानाच व्ही. एन. मयेकर यांनी मराठीत चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम वाटचाल केली. त्यासाठी त्यांनी चैतन्य चित्र ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि ‘पसंत आहे मुलगी’ (1989), ‘जन्मदाता’ ( 1994), ‘मी तुझी तुझीच रे’ (2004) हे चित्रपट दिग्दर्शित केले. व्ही. एन. मयेकर यांना चित्रपती व्ही.शांताराम विशेष उल्लेखनीय कामगिरी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संकलकाला चित्रपट माध्यमाची उत्तम जाण असेल तर तो दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते त्यावर प्रभावीपणे कात्री चालवू व जोडणी करू शकतो असे मानले जाते. तसा व्ही. एन. मयेकर यांच्याकडे दृष्टिकोन होता. अशा दृश्य माध्यमाची उत्तम जाण असलेल्या व्ही. एन. मयेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा चित्रपट व्यवसायात उमटला.