मुद्दा – मुलगी शिकली…समाज कधी सुधारणार?

>> बबन लिहिणार

खूप श्रीमंत सासर असलं म्हणजे मुलीला खूप सुख मिळतं असं काही नसतं. त्या श्रीमंत घरातील लोक मनानं किती श्रीमंत आहेत यावरच खरं तर सगळं काही मुलीचं सुख-दुःख अवलंबून असतं. ज्या घरात मुलगी नांदायला गेलीय, त्या घरातील लोक किती शिकले सवरलेले आहेत की ते अडाणी आहेत, हेसुद्धा महत्त्वाचं नाही. ज्या कुटुंबात मुलगी गेलीय तेथील लोकांची मानसिकता समाजाचं भान जपणारी आणि दुसऱयाची मुलगी ती आपली मुलगी असं मानणारी असली तरी पुरेसं आहे, तरच ती मुलगी तिच्या नवऱयासोबत सुखानं संसार करू शकेल. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे 16 मे 2025 रोजी घडलेले पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. मूळशी तालुक्यातील भुकूम येथे अवघ्या 23 वर्षीय वैष्णवी नावाच्या या महिलेनं सासरच्या जाचाला पंटाळून आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. ही आत्महत्या म्हणजे सरळ सरळ हुंडाबळी आहे, हे आता स्पष्ट झालंय. एखादं कुटुंब पैशासाठी किती हपापलेलं असू शकतं, हे या प्रकरणाकडं पाहिलं तर स्पष्ट लक्षात येईल.

मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हटलं जातं ते शंभर टक्के खरंसुद्धा आहे. मुलगी शिकली तर कुटुंब सुधारेल, कुटुंब सुधारले तर गाव, त्यानंतर राज्य आणि देश सुधारेल. परंतु समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या ज्या काही जुन्या कुप्रथा आहेत, त्या आजही अलिखित स्वरूपात सुरूच आहेत. कारण या प्रथा कागदोपत्री बंद आहेत, परंतु त्याला दोन्ही बाजूंनी मूकसंमती आहे. हुंडा द्यायचा नाही अन् घ्यायचा नाही, असे करणे कायद्याने गुन्हा आहे. ते फक्त कागदोपत्री. आजघडीला 100 लग्नांपैकी 60 ते 70 लग्न हे हुंडा घेतल्याशिवाय होत नाहीत असं म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही. मुलगी चांगल्या घरात जातेय, नवरदेवाला काही तरी द्यावेच लागेल, इथपासून झालेली सुरुवात मग फ्रीज, वॉशिंग मशीन, सोने, चांदी, महागडी गाडी इथपर्यंत जाऊन थांबते. या प्रथा बंद व्हायला हव्यात असे किती जणांना वाटते? त्यासाठी खरंच कोणी प्रयत्न करतोय का? हा मूळ प्रश्न आहे. मुलीने जन्म घेतला तेव्हापासून ती काही लोकांना ‘नकोशी’ होते. मुलगी हे परके धन आहे, असेही अनेकांना वाटते. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा, मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर जमवलेली जमापुंजी खर्च करा. चांगलं स्थळ मिळावं यासाठी हुंडा द्या. लोक नाव ठेवणार नाहीत, त्यामुळे चांगलं लग्न करून द्या. मुलीच्या लग्नातला सर्व खरंच फक्त मुलीच्या पालकांनी उचलावा, असाही काही भागात अलिखित नियम आहे. राज्यातील कोकण आणि अन्य काही भाग सोडला तर लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या पालकांनाच करावा लागतो. त्यानंतरही तिचे सासर चांगले निघाले तर ठीक. नाहीतर तिच्यासाठी आयुष्यभर सासरच्या मंडळीचे बोलणे खा. समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा असंख्य वैष्णवी आहेत. ज्यांना लग्नानंतर जोडीदाराचे, सासरच्या लोकांचे प्रेम आणि सुख मिळत नाही. त्यांचा केवळ पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असतो, तर काही वैष्णवींना मूल होत नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून रोज टोमणे ऐकावे लागतात.

मे महिना म्हटलं की, लग्नसराईचा महिना. दरवर्षी या महिन्यात सर्वात जास्त विवाह सोहळे पार पडतात. मागील आठवडय़ात मित्राच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. दोघेही नवरा-बायको दहावीपर्यंत शिकलेले. त्यामुळे त्यांनी मुलगा अन् मुलगी असा भेद न ठेवता मुलीला चांगले शिक्षण दिले. त्यासाठी खर्च करायला मागे पुढे पाहिले नाही. दोघेही मोठय़ा नोकरीधंद्याला नाहीत. हाताला येईल ते काम करून त्यांनी संसाराचा गाडा चालवला. मुलीला पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्यानंतर तिचे हात पिवळे करायचे ठरवले. चांगले स्थळ हातचे जाऊ द्यायचे नाही म्हणून मुलाला दोन तोळे सोने द्यायचे ठरले. बाकी बस्त्यापासून ते लग्नापर्यंतचा खर्च लिहून ठेवला असून तो आठ लाखांच्या घरात गेलाय, असं मित्र थोडं नाराजीच्या सुरात सांगत होता. मुलीच्या लग्नात खर्च झालाय, पण मुलाच्या लग्नात इतका पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागणार नाही, असंही तो म्हणाला. या वेळी त्याच्या चेहऱयावर आधीसारखा भाव नव्हता. या दोन वाक्यांवरून अनेकांना मुलगी नकोशी का होतेय, याचा अंदाज येतो. मुलगा अन् मुलगी आम्ही समान मानतो, असं म्हणणारेसुद्धा लग्नात हुंडा घेण्यासाठी अडून बसलेले अनेकदा दिसतात. लग्नकार्यात दोन्ही बाजूची मंडळी असते तरीसुद्धा लग्नाच्या जेवणाचा सर्व खर्च मुलीच्या पालकांना करावा लागतो हे मराठवाडा आणि विदर्भात गेले की, सर्रासपणे पाहायला मिळते. लग्नाचा खर्च एकटय़ा मुलीच्या पालकांनीच का करायचा? असा साधा प्रश्नसुद्धा कोणी विचारत नाही. एखाद्या व्यक्तीला जर तीन-चार मुली असतील तर त्याचे संपूर्ण आयुष्य लग्नासाठी केलेला खर्च फेडण्यासाठी जाणार नाही तर काय? मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त शेतकरी हे कर्जबाजारी होऊन आत्महत्या का करतात, त्यामागे हेसुद्धा हे कारण आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे मुलगी शिकली, प्रगती झाली हे जरी खरं असलं तरी समाज कधी सुधारणार आहे? यावर खरंच कोणी बोलणार आहे की नाही?