लेख – अर्वाचीन भारतीय सैन्याचे प्रणेते

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याची पडझड होताच ब्रिटिशांनी सैन्यभरती सुरू केली. त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा व स्वतंत्र भारताला भविष्यात एक प्रशिक्षित सैन्य प्राप्त व्हावे हाच यामागचा वीर सावरकरांचा उदात्त हेतू होता. स्वा. सावरकर यांनी ही सुसंधी पर्वणी समजून सैनिकीकरणाचा उपक्रम सुरू केला. विचारहेतू हाच की, आधुनिक सैनिकी प्रशिक्षण तरुणांनी आत्मसात करून ते स्वातंत्र्योत्तर काळात वृद्धिंगत करावे.

भारतीय लष्कराला 19-20 व्या शतकात ब्रिटिशांनी जरी आकार दिला, तरी त्याला बाळसे दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर व नेताजी सुभाषबाबू या नरशार्दुलांनी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्राला एक शिस्तबद्ध प्रत्ययकारी सैन्य उभारावे लागणारच या विचाराने सावरकरांनी सैनिकीकरणावर भर देऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे ठरविताच त्यांना रंगरूटवीर म्हणून हिणवण्यात आले. इतकेच नव्हे, तर विरोधकांनी त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून हिणवले. या टीकेला भीक न घालता तात्यारावांनी तत्कालीन तरुणांना ‘सैन्यात भरती व्हा’ हा जणू जपच सुरू ठेवला. ब्रिटिशांनी मंगल पांडे यांच्या हौतात्म्यानंतर ब्राह्मण, मराठा, जाट या लढवय्या जातींना सैन्याची दारे बंद केली, पण दुसऱया महायुद्धात ब्रिटिश सैन्याची पडझड होताच ब्रिटिशांनी सैन्यभरती सुरू केली. त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा व स्वतंत्र भारताला भविष्यात एक प्रशिक्षित सैन्य प्राप्त व्हावे हाच यामागचा वीर सावरकरांचा उदात्त हेतू होता. 15 एप्रिल 1938 या दिवशी मुंबई मुक्कामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात वीर सावरकरांनी संदेश दिला- ‘‘लेखण्या तोडा, बंदुका हाती घ्या.’’ सावरकर यांनी आवर्जून सैनिकीकरणाचा विषय उचलून धरला. यात रोजगाराबरोबरच सैन्यातील सर्वसमावेशकता निर्माण हावी, हा उद्देश होता आणि तो योग्यही होता.

खरे तर तेव्हा ब्रिटिश सैन्यात दाखल होणाऱया भारतीयांची स्थिती ‘न घर का, न घाट का’ अशी होती. स्थानिक एतद्देशीय सैनिकाला देशद्रोही म्हणून शिव्याशाप देत, तर ब्रिटिश काळा आदमी म्हणून हिणकस वागणूक देत होते. या प्रसंगी स्वा. सावरकरांनी भारतीय सैन्याला भावनिक, नैतिक आधार देत ब्रिटिश सैन्य आत्मसात करण्याचा उपदेशवजा आदेश दिला. भारत सरकारला सावरकरांनी चीनच्या विश्वासघातकी व राक्षसी विस्तारवादी सुप्त आकांक्षेची जाणीव करून दिली होती. फक्त नवनिर्मित पाकिस्तान हा पश्चिमोत्तर शत्रू नसून सैन्यदलाची उभारणी करताना सप्तभगिनी (Seven Sister) म्हणजे पूर्वोत्तर सीमा भागाकडे- विशेषतः अक्साई चीन (अरुणाचल प्रदेश) भागात संरक्षणसिद्धतेवर भर द्यावा, असे सावरकर वारंवार आग्रहपूर्वक सांगत होते. त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाने सरदार वल्लभभाई पटेल व सावरकरांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिपाक म्हणजे 1962 चे चीनचे आक्रमण, अर्थात न लढलेले युद्ध (unfaugh war). सावरकरांनी डोंगरी युद्धाभ्यासाचा पाठपुरावा केला, पण चीन धोका देणार नाही हेच तुणतुणे वाजवत सैन्याच्या या विभागाला चालनाच दिली गेली नाही. इथेच घात झाला. स्वा. सावरकरांच्या सूचना, सल्ले तत्कालीन सरकारने मानले असते तर चीनच्या आजही चालू असलेल्या घुसखोरीला वेसण बसली असती.

सामान्यतः स्वा. सावरकर मुंबईत अभ्यागतांना सकाळी भेटत नसत, पण 22 जून 1940 हा दिवस असा उजाडला की, एका अभ्यागताच्या स्वागताला सावरकर उत्सुक होते. त्यांनी माईना सांगितले की, तुम्हीसुद्धा तो तरुण आला की चहापाणी करून बाहेर ओसरीवर जाऊन बसावे. तो तेजःपुंज तरुण म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. सावरकरांना ते भेटायला आले होते ते जीना यांच्या सल्ल्यानुसार. ही भेट तब्बल तीन तास चालली. भारतीय क्रांतिकारी सैनिक व जर्मन सेनानी यांच्यात झालेल्या गुप्त कराराबाबत स्वा. सावरकर यांनी नेताजींना तपशिलासहित माहिती विदित केली. जर्मन-जपानी सैन्याच्या ताब्यात असलेले भारतीय युद्धबंदी सैन्याची उभारणी करीत असून, Indian National army अर्थात आझाद हिंद सेना स्थापित होत आहे. तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचे नेतृत्व करावे. कारण रासबिहारी बोस वृद्ध झाले असून या आझाद हिंद सेनेचे सेनापती म्हणून तुम्हीच योग्य आहात, असा विश्वास व सल्ला नेताजींना स्वा. सावरकरांनी दिला. कोलकात्यात परतल्यावर मी निश्चितच या विचाराची कृतीत परिपूर्तता करीन, असा शब्द नेताजींनी सावरकरांना दिला व खराही केला. 25 जून 1945 रोजी सिंगापूर नभोवाणीवरून सुभाषबाबूंनी जो भारतीय जनतेला संदेश दिला, त्यात नेताजींनी सावरकरांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत त्यांच्या सैनिकीकरणाचा गुणगौरव केला, हा इतिहास आहे.

दुसऱ्या महायुद्धात पडझड होत असताना ब्रिटिशांनी मदतीची याचना करून सैन्यभरती केली. संथ गतीने सुरू असलेले किंग कमिशन प्रवेशांनासुद्धा गती प्राप्त झाली. तेव्हा स्वा. सावरकर यांनी ही सुसंधी पर्वणी समजून सैनिकीकरणाचा उपक्रम सुरू केला. विचारहेतू हाच की, आधुनिक सैनिकी प्रशिक्षण तरुणांनी आत्मसात करून ते स्वातंत्र्योत्तर काळात वृद्धिंगत करावे. डॉ. धर्मवीर मुंजे, मामाराव दाते, शांताबाई गोखले, ल. ग. ऊर्फ भालाकार भोपटकर आदींनी याबाबत समाजप्रबोधन सुरू करताच रंगरूट, द्रेशद्रोही अशा शेलक्या विशेषणांनी सावरकरांची निर्भर्त्सना करण्यात आली. मात्र स्वा. सावरकरांच्या याच उपक्रमामुळे वीस लाख भारतीय सैन्यात भरती झाले. सावरकरांच्या या उपक्रमाचा फायदा असाही झाला की, ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड अॅटली यांनी भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मांडताना कबूल केले की, भारतीय सैन्य ब्रिटनशी एकनिष्ठ राहिलेले नसल्यामुळे भारताला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत. म्हणून म्हणावेसे वाटते की, स्वा. सावरकर हिंदुस्थानी सैन्याचे स्फूर्तिदाते होते, तर नेताजी सुभाषचंद्र आद्य सरसेनापती. याबाबत जपानी ग्रंथकार जे. पी. ओहसावा यांचे गाजलेले पुस्तक ‘दी टू ग्रेट इंडियन्स इन जपान’ हे अभ्यासकांनी जरूर वाचावे. आझाद हिंद सेनेला 50 हजारांच्या जवळपास प्रशिक्षित सैन्य लाभले. त्यात सावरकरांचा अवर्णनीय, बहुमोल वाटा होता यात संशय नाही.

माझ्यासारखा शिपाईगडय़ाला हा इतिहास आठवला, कारण आजच्या घडीला भारतीय सशस्त्र सेनादलाला पंधरा हजारांपेक्षा जास्त सैनिकी अधिकाऱयांची कमतरता भासत आहे. चीनची घुसखोरी थांबत नसून, पाकिस्तान कश्मीरचा वाद सतत उकरून काढत आहे. भारताच्या सीमेला पेटत ठेवणे हा एक आंतरराष्ट्रीय कट तर शिजत नाही ना? चीनला ग्वादर बंदर पाकिस्तानने पन्नास वर्षांच्या कराराने भाडेपट्टीवर दिल्याचा अर्थ काय? चीनने गेल्या दोन वर्षांत ऐंशीपेक्षा जास्त पाणबुडय़ा त्यांच्या नौदलात तैनात केल्या असून, एक विमानवाहू नौका (Air craft carrier) सामील केली आहे. भारतीय सैन्याची आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आकलन करून बांधणी करावी लागणार आहे. सैनिकी धोरण निश्चित करून सैन्याची सुयोग्य रचना, ठेवण करण्यासाठी सैनिकी अंदाजपत्रक बळकट करावे लागेल. तुलनात्मकदृष्टय़ा पाकिस्तान व चीनचे संरक्षण बजेट प्रचंड असते, आहे. या सर्व बाबींचा यथोयोग्य विचार करणे हे सध्याच्या सरकारपुढील आव्हान आहे.