
>> स्पायडरमॅन
अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाची झळ सर्व जगाला बसायला लागलेली आहे. प्रत्येक वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल आणि सोशल मीडिया युद्धाच्या बातम्यांनी भरभरून वाहू लागले आहेत. कोणी युद्धाची भयानकता दर्शवत आहे, तर कोणी आतल्या गोटातल्या बातम्या सांगत आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर मरत असलेल्या नागरिकांचे आणि सैनिकांचे व्हिडीओ कोणी दाखवत आहे, तर कोणी
नॉस्त्रॅडेमस व बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या सांगून घबराट पसरवत आहे. मात्र या सगळ्यात या युद्धाची प्रत्यक्ष झळ बसत असलेल्या मुक्या प्राण्यांविषयी मात्र फारसे कोणी बोलताना दिसत नाही. युद्धाचे ढग इराणमुळे आता दुबई, सौदी अरेबिया, कतार अशा देशांवरदेखील पसरू लागले आहेत. जिवाच्या भीतीने अनेकांनी दुबईसारखे एकेकाळी सर्वात सुरक्षित मानले गेलेले देशदेखील सोडायला सुरुवात केली आहे. मात्र देश सोडताना हे लोक आपल्या पाळीव प्राण्यांना मात्र सर्रास रस्त्यावर सोडून देत आहेत. दुबईमधील अनेक प्राण्यांच्या धर्मदाय संस्था अशा परिस्थितीत पुढे आलेल्या आहेत आणि त्या अशा प्राण्यांना आसरा देत आहेत. दुबईमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्राण्यांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया फार किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक लोक देश सोडून जाताना आपल्या पाळीव प्राण्यांना रस्त्यावर अथवा वाळवंटात सोडून जाणे पसंत करत आहेत. यापैकी अनेक प्राण्यांना मायक्रोचीपदेखील बसवलेली आहे. सोडून दिलेल्या अशा प्राण्यांमध्ये मांजरी आणि कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटिश सरकारने आपत्कालीन विमान व्यवस्था सुरू करून आपल्या 45 हजार नागरिकांना दुबईबाहेर काढले आहे. यापैकी अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना दुबईमध्येच सोडून जाणे पसंत केले आहे. एका बातमीनुसार अनेक मालकांनी आपल्या निरोगी असलेल्या पाळीव प्राण्यांनादेखील इच्छामृत्यू द्यावा यासाठी हजारोंनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. धर्मदाय संस्थांचे फोन मिनिटा मिनिटाला वाजत असल्याचे आणि या संस्थांच्या सर्व खोल्या अशा सोडून दिलेल्या प्राण्यांनी भरल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले.































































