
>> डॉ. ब्रह्मदीप आलुने
इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून होणाऱ्या भीषण हल्ल्यांना रोखण्याची क्षमता जगातील कोणत्याही देशाकडे असेल तर तो रशिया आहे. इराण आणि रशियाचे धोरणात्मक संबंध अत्यंत दृढ असून दोन्ही देश अमेरिकेचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. अशा स्थितीत रशियाने आपली एखादी अणू पाणबुडी किंवा नौदलाची शक्ती इराणच्या रक्षणासाठी या क्षेत्रात तैनात केल्यास संपूर्ण रणनीतिक समतोल क्षणार्धात बदलू शकतो आणि संभाव्य हल्ले थांबवता येऊ शकतात. भौगोलिकदृष्टय़ाही रशिया आणि इराणमधील अंतर फारसे नसल्याने लष्करी मदत पोहोचवणे रशियासाठी अशक्य मानले जात नाही. मात्र, तरीही इराण इतिहासातील सर्वात मोठय़ा संकटाचा सामना करत असताना व्लादिमीर पुतीन प्रत्यक्ष लष्करी हस्तक्षेप करणे टाळत असल्याचे दिसून येते. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रशिया आणि इस्रायल यांच्यातील विशेष संबंध, ज्याला रणनीतिक परिभाषेत ‘डी-कन्फ्लिशन’ असे म्हटले जाते. लष्करी रणनीतीमध्ये ‘डी-कन्फ्लिशन’ ही एक अशी महत्त्वाची यंत्रणा आहे, जी संभाव्य संघर्ष रोखण्यासाठी आधीच केलेल्या समन्वयावर आधारित असते. लष्करी डावपेच आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतून विकसित झालेल्या या संज्ञेचा मूळ उद्देश युद्ध थांबवणे हा नसून दोन शक्तींमधील अनवधानाने होणारा संघर्ष टाळणे हा असतो. रशिया आणि इराणमध्ये सामरिक व राजकीय संबंध मजबूत असले तरी रशिया आपल्या परराष्ट्र धोरणात समतोल राखण्याची रणनीती अवलंबतो. अशा प्रकारचा समन्वय यापूर्वीही जगाने अनुभवला आहे. सीरियाच्या युद्धात रशिया प्रत्यक्ष सक्रिय असतानाही इस्रायलने अनेकदा सीरियातील इराण पुरस्कृत तळांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, इतक्या तणावानंतरही रशिया आणि इस्रायलमध्ये कधीही प्रत्यक्ष लष्करी संघर्ष झाला नाही. या दोन्ही देशांनी ‘डी-कन्फ्लिशन’ किंवा परस्पर समन्वयाची अशी एक पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे त्यांच्या सेना एकमेकांसमोर येण्याचे टाळले जाते. व्लादिमीर पुतीन यांचे सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समजून घेण्यासाठी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, रशिया स्वतः इस्लामी कट्टरपंथी हिंसेचा बळी ठरलेला देश आहे. 1990 आणि 2000 च्या दशकात चेचेन्या तसेच उत्तर कॉकेशस भागात फुटीरतावादी आणि जिहादी गटांनी रशियाला जेरीस आणले होते. 2002 मधील मॉस्को थिएटरमधील ओलीस संकट आणि 2004 मधील बेसलान शाळेवरील हल्ला यांसारख्या घटना रशियाच्या सुरक्षा स्मृतीमध्ये आजही खोलवर कोरलेल्या आहेत. याच अनुभवामुळे पुतीन यांचे दहशतवाद आणि कट्टरतावादाबाबतचे धोरण अत्यंत कठोर राहिले आहे.
पश्चिम आशियातील राजकारणात अनेक देश आणि शक्ती ‘प्रॉक्सी’ गटांचा वापर करतात, असे रशियाचे ठाम मत आहे. यासंदर्भात इराणने आपला प्रादेशिक प्रभाव वाढवण्यासाठी विविध सशस्त्र संघटनांना पाठबळ दिले आहे याची रशियाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच एकीकडे इराणशी राजकीय आणि लष्करी सहकार्य राखताना दुसरीकडे कट्टरपंथी विचारधारा आपल्या कॉकेशस क्षेत्रात पुन्हा पसरू नये यासाठी रशिया कमालीचा सतर्क असतो. रणनीतिकदृष्टय़ा कॉकेशस क्षेत्र रशियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हा भाग रशिया, मध्य आशिया, मध्य पूर्व आणि युरोपला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. शिवाय, तेल आणि वायू संसाधने तसेच ऊर्जा वाहिन्यांमुळे या क्षेत्राचे जागतिक राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या राजकीय गणितासोबतच रशियातील मोठी ज्यू लोकसंख्या आणि इस्रायलमधील रशियन वंशाचे नागरिक हे दोन्ही देशांमधील संबंधांमधील एक सामाजिक दुवा ठरले आहेत. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर मोठय़ा संख्येने रशियन ज्यू इस्रायल, अमेरिका आणि युरोपीय देशांत स्थलांतरित झाले. असे असूनही आज रशियात सुमारे दीड ते दोन लाखांच्या आसपास ज्यू समुदाय वास्तव्यास आहे. पुतीन यांच्या कार्यकाळात रशियाने ज्यू समुदायाबाबत अत्यंत उदार धोरण स्वीकारले आहे. मॉस्कोमध्ये भव्य ज्यू संग्रहालये आणि सांस्कृतिक केंद्रांचा विकास झाला असून इस्रायलशी समतोल संबंध राखण्यावर भर दिला गेला आहे. रशियातील ज्यू समुदायाचा ऐतिहासिक प्रभाव आणि इस्रायलमधील रशियन वंशाच्या लोकांचे अस्तित्व यामुळे दोन्ही देशांमध्ये एक सामाजिक आणि सांस्कृतिक ऋणानुबंध कायम आहे. याच कारणांमुळे पुतीन सध्या मौन बाळगून आहेत. इराण कमकुवत होण्याकडे ते पराजय म्हणून पाहत नसून त्यामध्ये त्यांना स्वतःचे सामरिक, राजकीय फायदे दिसत आहेत.































































