
>> रविप्रकाश कुलकर्णी
वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक आपलं लक्ष नेहमीच वेधत असतात. तर असंच एका पुस्तकाकडे लक्ष गेलं. पुस्तकावर अपरिचित फोटो आणि त्या मुखपृष्ठावर अक्षरांकन ‘साये में धूप’, त्याखाली ठसठशीतपणे नाव दुष्यंतकुमार.
हिंदीत दुष्यंतकुमार हे गझलकार म्हणून प्रसिद्ध नाव. इंदिरा गांधी पर्वात जी अमानुष आणीबाणी लादली गेली त्या काळात या कवीने त्या विरुद्ध आवाज उठवला होता.
कैसे आकाश मे सुराख हो नही सकता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
आणि जणू या दोन ओळी दुष्यंतकुमारची ओळख होऊन बसल्या. अशा जळजळीत आणि भेदक गझलांचा संग्रह आला तो म्हणजेच‘साये में धूप’ आणि तो गाजला. किती गाजावा तर दुष्यंतकुमार पूर्व गझल आणि दुष्यंतकुमार नंतरची गझल अशी समीक्षा होऊ लागली. तर असा हा संग्रह नव्याने आला आहे. विशेष म्हणजे याचे मराठी लिप्यंतर व प्रस्तावना आहे, प्रदीप निफाडकर यांची.
उर्दू गझल देवनागरी लिपीत छार्ताना कठीण उर्दू शब्दांचा, तळटिपेत हिंदीत अर्थ दिलेला असतो. असं लिप्यांतर करण्रायाला पुस्तकात ते श्रेय देखील दिलेले असते. प्रदीप निफाडकर यांनी ‘साये में धूप’मधील सर्व गझलांतील कठीण शब्द त्या त्या गझलांच्या खाली दिलेले आहेत.
या संग्रहाला प्रदीप निफाडकर यांनी प्रस्तावना आणि दुष्यंतकुमार यांची चरित्र रेखा दिलेली आहे, त्यामुळे या गझलकारा बद्दल कुतूहल वाढते. उदाहरणार्थ दुष्यंतकुमारांची खरी जन्मतारीख 27 सप्टेंबर 1931 आहे. पण कवीच्या पुस्तकात एक सप्टेंबर 1933 आहे. त्याबाबत कवीला असे का विचारता त्याचे उत्तर आहे, ‘एक तारीख कशी पगार हातात येणारी वाटते. 27 म्हणजे महिना अखेर.’
अकाली गेलेल्या या कलावंताचा एकमेव गजल संग्रह ‘साये में धूप’ असला तरी झालं आतापर्यंतच्या 75 आवृत्त्या पुनमुद्रित झालेली आहेत! या संग्रहाचे हे वर्ष सुवर्ण जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने दुष्यंतकुमारची गझल सर्व भारतीय भाषेत नेण्याची योजना आहे. त्याची सुरुवात प्रदीप निफाडकर यांच्या या पुस्तकाने झालेली आहे हे विशेष.
या निमित्ताने प्रदीप निफाडकर यांनी आपण या गझलकाराच्या गझलांनी कसे पछाडले गेलो आणि एका रात्रीत सगळा संग्रह कसा हाताने लिहून काढला, किंवा ते या गजलांवरच पीएचडी करत आहेत. या सगळ्या गोष्टी कुतूहल वाढवतात. शेवटी दुष्यंतकुमार यांनी म्हटल्याप्रमाणे,
मै जिसे ओढता बिछाता हू
वो गजल आपको सुनाता हु
याचा प्रत्यय हवा असेल तर हा संग्रह वाचण्याखेरीज गत्यंतर नाही !























































