
>> अक्षय शेलार, [email protected]
अमेरिकन स्टँड–अपच्या परंपरेत सामाजिक इतिहास, संघर्ष समोर ठेवत त्यावर भाष्य करणारा कॉमेडियन मिन्हाज. त्याच्या विशिष्ट शैलीमुळे त्याचा विनोद समस्त समुदायाचा आवाज ठरतो.
हसन मिन्हाजची स्टँड-अप कॉमेडी म्हणजे केवळ विनोदी कार्यक्रम नसून एक राजकीय, सांस्कृतिक आणि आत्मकथनात्मक कामगिरी असते. अमेरिकन स्टँड-अपच्या परंपरेत वैयक्तिक अनुभव आणि सामाजिक इतिहास एकमेकांत मिसळणारे जे कॉमेडियन्स आहेत, मिन्हाज त्यांच्यापैकीच एक महत्त्वाचा आवाज आहे. त्यामुळे त्याचे स्पेशल्स पाहताना आपण केवळ विनोद ऐकत नाही, तर अमेरिकन समाजातील वंश, धर्म, स्थलांतर आणि अस्मितेच्या संघर्षांची एक नाटय़मय मांडणी पाहतो.
‘होमकमिंग किंग’पासून (2017) ‘द किंग्ज जेस्टर’पर्यंत (2024), मिन्हाजची कॉमेडी सतत स्वतः भोवतीच फिरते, पण ती आत्मकेंद्री कधीच होत नाही. तो आपल्या आयुष्यातील अपमान, वर्णद्वेषी अनुभव, शाळकरी वयात त्याच्या वाटय़ाला आलेली तिऱ्हाईतपणाची भावना, प्रेमातील अपयश यांचा वापर करतो, पण त्या गोष्टी नुसत्या वैयक्तिक शोकांतिका म्हणून मांडण्याऐवजी त्या एका व्यापक अमेरिकन कथेत बसवतो. एक स्थलांतरित मुस्लिम मुलगा, ज्याच्याकडे तिऱ्हाईत ‘इतर’ (दी अदर) म्हणून पाहिलं जातं. यातून तो असं नाटय़ रचतो की, त्याच्या वैयक्तिक कथा सामाजिक दस्तऐवजासारख्या वाटू लागतात.
मिन्हाजच्या कामाचा सर्वात ठळक भाग म्हणजे त्याची नाटय़मय, जवळ जवळ ब्रॉडवे-सदृश मांडणी. त्याचे स्पेशल्स केवळ माइक-स्टँड आणि स्टूलपुरते मर्यादित राहत नाहीत. एलईडी क्रीन, अॅनिमेशन, ध्वनी आरेखन आणि काटेकोरपणे आखलेली लय यामुळे त्याचा स्टँड-अप एक मल्टिमीडिया एकलप्रयोग बनतो. हा सौंदर्यशास्त्रीय निर्णय केवळ देखावा नाही, तो मिन्हाजच्या राजकीय भूमिकेशी जोडलेला आहे. तो सांगत असलेली कथा ही एका माणसाची नसून एका समुदायाची आहे आणि त्यासाठी त्याला मोठय़ा, भव्य, दृश्यात्मक भाषेची गरज भासते. त्याच्या विनोदांमध्ये उपरोध कमी आणि थेट विधान अधिक असतं. मिन्हाज प्रेक्षकांना त्यांचा हात धरून एका विशिष्ट निष्कर्षाकडे घेऊन जातो. त्यामुळे त्याच्या कॉमेडीत पारंपरिक ‘मिसडायरेक्शन’ किंवा सूक्ष्म पंचलाइनपेक्षा भावनिक उत्कर्ष जास्त महत्त्वाचा ठरतो. त्याची कॉमेडी अनेकदा विनोदापेक्षा जाहीर विधानासारखी वाटते. याच ठिकाणी त्याची ताकद आणि मर्यादा दोन्ही स्पष्ट होतात.
मिन्हाजच्या कथनशैलीत सिनेमॅटिक संवेदना आहे. तो प्रसंग उभा करतो, संवाद रंगवतो आणि स्वतःला त्या प्रसंगाच्या मध्यभागी ठेवतो. त्यामुळे त्याचे स्टँड-अप अनेकदा एखाद्या एकल-नाटय़ासारखे वाटतात. तो त्याची कथा इतक्या दृश्यात्मक तपशिलात सांगतो की, ते फक्त ऐकवले जात नाही, तर प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर घडत राहतात (ज्यात दृश्य मांडणीचाही भाग आहेच).
परंतु याच सिनेमॅटिकपणामुळे त्याच्या विनोदांमध्ये एक प्रकारचा नियंत्रणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक वळण, प्रत्येक भावनिक क्षण आधीच आखलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्वतहून अर्थ काढण्याची फारशी मोकळीक उरत नाही. मिन्हाजची कॉमेडी ही अधिक ‘क्युरेटेड’ आहे, अधिक नियंत्रित, अधिक दिग्दर्शित. ती प्रभावी आहे, पण कधी कधी तिच्या चकचकीत मांडणीमध्ये मानवी सहजता आणि गोंधळ काहीसा हरवतो.
तरीही हसन मिन्हाजच्या महत्त्वाला यामुळे कमी लेखता येत नाही. आजच्या काळात स्थलांतर, धर्म आणि अस्मिता या गोष्टी पुन्हा राजकारणाच्या मध्यभागी आहेत. अशा वेळी त्याचा विनोद हा एका संपूर्ण समुदायाचा आवाज बनतो. तो विनोदाचा वापर करून वांशिक भेदभावाचा इतिहास लिहितो. स्थलांतर, इस्लामोफोबिया, वंशवाद आणि ‘अमेरिकन ड्रीम’च्या दुटप्पीपणावर तो जे भाष्य करतो, ते केवळ करमणूक नसून एक प्रकारचा सांस्कृतिक हस्तक्षेप आहे. तो विनोदाच्या माध्यमातून ज्या कथा सांगतो, त्या मुख्य प्रवाहातील माध्यमांत क्वचितच ऐकू येतात. त्यामुळे त्याचे स्टेजवर उभं राहणं हे स्वतच एक राजकीय विधान ठरतं. (असंच ठसठशीत काम पाहायचं असेल, तर ‘पेट्रिअट अॅक्ट वुईथ हसन मिन्हाज’ हा त्याचा प्रचंड पॉलिटिकल टॉक शो पहावा.)
हसन मिन्हाज म्हणजे एक असा कॉमेडियन जो रंगमंचावर उभा राहून केवळ विनोद करत नाही, तो आपली ओळख, आपला इतिहास आणि आपली राजकीय भूमिका एकत्र करून एक सार्वजनिक परफॉर्मन्स उभा करतो आणि त्यामुळेच त्याचे स्टँड-अप पाहताना आपण हसतो, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे आपण एका काळाचे साक्षीदार बनतो, आपण अंतर्मुख होतो.
(लेखक चित्रपट समीक्षक आहे.)

























































