रंगयात्रा – द कार्डशार्प्स

>> दुष्यंत पाटील, [email protected]

इटलीच्या मिलानमधील चित्रकार कॅरावॅगिओ, ज्याचं कार्डशार्प्स हे मानवी भावभावनांचं वास्तववादी चित्रण करणारं चित्र आजही तितकंच लोकप्रिय आहे. तटस्थ वृत्तीने जगण्याची त्याची वृत्ती चित्रातही उमटलेली दिसते.

अतिशय थरारमय आयुष्य लाभलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे कॅरावॅगिओ. त्याचं जीवन म्हणजे एक ‘क्राईम थ्रिलर’ होतं. कॅरावॅगिओचा जन्म 1571 साली इटलीमधल्या मिलानजवळ झाला. तो लहान असतानाच मिलानमध्ये प्लेगची साथ आली. त्यात त्याचे वडील, काका आणि आजोबा एकाच दिवशी वारले. या घटनेचा त्याच्या आयुष्यावर, कलेवर खोल परिणाम झाला. वयाच्या 13 व्या वर्षी तो मिलानमध्ये सिमोन पीटरझानो नावाच्या एका चित्रकाराकडे उमेदवारी करण्यासाठी गेला. या काळात त्यानं रंगांचं आणि प्रकाशाचं सखोल ज्ञान मिळवलं.

कॅरावॅगिओ थोडासा तापट डोक्याचा होता. मिलानमध्ये असताना तो फक्त पेंटिंगच नव्हे, तर तलवारबाजी आणि मारामारीसुद्धा शिकला. 1592 च्या सुमारास मिलानमध्ये त्यानं रागाच्या भरात एका पोलीस अधिकाऱ्याला जखमी केलं, असं मानलं जातं. हा मोठाच गुन्हा होता. मग अटक होण्याच्या भीतीनं त्यानं  रातोरात मिलान सोडलं. यानंतर तो रोमला आला. रोममध्ये येताना त्याच्याकडे काहीही पैसे नव्हते. खरे तर त्याच्या अंगावर धड कपडेही नव्हते. रोममध्ये त्याला कुणीही ओळखत नव्हतं. तिथे पोहोचल्यावर पोटापाण्यासाठी त्याला मिळेल ते काम करावं लागलं. सुरुवातीला तो ज्युसेप्पे सिझारी नावाच्या एका पोपच्या आवडत्या चित्रकाराकडे कामाला लागला. सिझारी त्याला काम देताना मुख्य चित्रं (माणसं/चेहरे) काढू देत नसे. कॅरावॅगिओला फक्त चित्राच्या कोपऱ्यातली ‘फळे, फुले आणि टोपल्या’ रंगवण्याचं काम दिलं जायचं. आपले टॅलेंट फुकट जातंय आणि आपल्या कामाचं श्रेय दुसरंच कुणीतरी घेतंय, याची त्याला प्रचंड चीड यायची. कंटाळून त्यानं सिझारीची नोकरी सोडली. आता जे होईल ते होईल, पण मी माझी स्वतःची चित्रं विकणार, असा धाडसी निर्णय त्यानं घेतला.

त्या काळचे सगळे चित्रकार फक्त देव-धर्म आणि पुराणातली चित्रं काढायचे. सतत धार्मिक प्रकारची चित्रं बघून लोक कंटाळले होते. कॅरावॅगिओनं डोकं चालवलं. त्यानं आयुष्यात घडणाऱ्या खऱ्याखुऱ्या प्रसंगांची चित्रं रंगवायचं ठरवलं. त्याला श्रीमंत लोकांना दाखवायचं होतं की, बघा, मी फक्त संतांची चित्रं नाही, तर जिवंत माणसांचे चेहऱ्यावरचे भावसुद्धा हुबेहुब रंगवू शकतो. याच प्रयत्नात त्यानं ‘द कार्डशार्प्स’ हे चित्र रंगवलं.

‘द कार्डशार्प्स’मध्ये तीन व्यक्ती दिसत आहेत, पण थोडंसं बारकाईनं पाहिल्यावर कळतं की, हा खेळ दोन विरुद्ध एक असा आहे. चित्रामध्ये डाव्या बाजूला बसलेला, काळे कपडे घातलेला मुलगा. तो श्रीमंत आहे पण चेहरा बघूनच कळतं की, तो निरागस आहे. तो आपल्या पत्त्यांमध्ये पूर्ण हरवून गेलाय. प्रत्यक्ष आयुष्यात चालणारे छक्केपंजे त्याला माहीत नाहीत. मधला माणूस फसवणूक करतोय. तो डावीकडच्या श्रीमंत मुलाच्या पाठीमागून त्याचे पत्ते चोरून बघतोय. तो उजवीकडच्या मुलाला खुणावतोय. उजवीकडचा मुलगा मधल्या माणसानं केलेले इशारे पाहतोय. तो आपल्या पाठीमागे कमरेला खोचलेला एक जास्तीचा पत्ता हातचलाखीनं बाहेर काढतोय.

उजव्या बाजूच्या मुलाकडे नीट बघा. त्याच्या कमरेला एक खंजीर लटकलेला दिसतोय. याचा अर्थ हा खेळ फक्त पैशांचा नाही, जर श्रीमंत मुलाला संशय आला तर या ठिकाणी मारामारी होऊ शकते. तिघांच्या नजरा बघा. श्रीमंत मुलगा पत्त्यांकडे बघतोय, मधला माणूस श्रीमंत मुलाच्या पत्त्यांकडे बघतोय आणि उजवीकडचा मुलगा मधल्या श्रीमंत मुलाकडे बारकाईनं पाहतोय.

कॅरावॅगिओची खासियत म्हणजे त्यानं चित्रात प्रकाशाचा केलेला नाटय़मय वापर. या चित्रात रंगमंचावरच्या स्पॉटलाईटसारखा प्रकाश पडलाय. चित्रातली पार्श्वभूमी साधी आणि फिकट आहे. यामुळे चित्र पाहणाऱ्याचं पूर्ण लक्ष चित्रातल्या ‘चोरी’वर आपोआपच खिळतं.

कॅरावॅगिओनं हे चित्र एका दुकानात विक्रीला ठेवलं. तिथून जाणाऱ्या एक अत्यंत श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीची (कार्डिनल डेल मोंटे)  नजर या चित्रावर पडली. त्याला हे ‘गल्लीतल्या जुगाराचे’ वास्तववादी चित्र इतकं आवडलं की त्यानं ते चित्र विकत घेतलं, कॅरावॅगिओला आपल्या राजवाडय़ात राहायला जागा दिली आणि त्याला जेवढं हवं तेवढं काम व पैसा पुरवला.