
>> दुष्यंत पाटील, [email protected]
1888 हे साल व्हॅन गॉगच्या आयुष्यातला सर्वात उमेदीचा आणि आनंदाचा काळ. या काळात व्हॅन गॉगनं त्याचं प्रसिद्ध ‘यलो हाऊस’ हे घर सजवण्यासाठी झपाटल्यासारखी चित्रं काढली. याच चित्रमालिकेत एक चित्र म्हणजे ‘कॅफे टेरेस अॅट नाईट’.
व्हॅन गॉग म्हणजे कलेच्या इतिहासातल्या सर्वात महान चित्रकारांपैकी एक. नेदरलँड्सचा हा चित्रकार आयुष्यभर गरिबी, एकटेपणा आणि मानसिक आजारांशी झुंजत राहिला. त्यानं आपल्या चित्रांमधून जगाला ‘जसं दिसतं तसं’ नाही, तर ‘जसं वाटतं तसं’ बघायला शिकवलं. त्याच्या आयुष्याची शोकांतिका म्हणजे त्याच्या जिवंतपणी त्याचं फक्त एकच चित्र विकलं गेलं. आज मात्र त्याच्या चित्रांच्या किमती अब्जावधी रुपयांमध्ये आहेत. दुर्दैवी आयुष्य लाभलेल्या या महान कलाकारानं नैराश्यात असताना एकदा स्वतःचा कान कापला आणि वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी आत्महत्या केली. तो फक्त कॅन्व्हासवर रंग फासणारा कारागीर नव्हता, तर मानवी वेदना आणि आनंद रंगांतून मांडणारा एक तत्त्वज्ञ होता.
1888 हे साल म्हणजे व्हॅन गॉगच्या आयुष्यातली ‘वादळापूर्वीची शांतता’ होती. त्याचं वय सर्वसाधारण 34 होतं. या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये त्यानं ‘कॅफे टेरेस अॅट नाईट’ नावाचं चित्र काढलं. हा काळ त्याच्या आयुष्यातला सर्वात उमेदीचा आणि आनंदाचा काळ मानला जातो. व्हॅन गॉग काही महिन्यांपूर्वीच पॅरिसच्या धावपळीला आणि धुक्याला कंटाळून दक्षिण फ्रान्समधील ‘आर्ल’ नावाच्या गावी आला होता. अर्थातच स्वतःची काहीही कमाई नसल्यानं त्याच्या राहण्याखाण्याचा खर्च त्याच्या भावाला करायला लागायचा. याच काळात व्हॅन गॉगनं त्याचं प्रसिद्ध ‘यलो हाऊस’ भाडय़ानं घेतलं होतं. त्याला तिथे इतर चित्रकारांना बोलावून एक ‘कलावंतांची वसाहत’ बनवायची होती. तो खूप उत्साहात होता. घर सजवण्यासाठी तो झपाटल्यासारखी चित्रं काढत होता. याच चित्रमालिकेत त्यानं ‘कॅफे टेरेस अॅट नाईट’ हे चित्र रंगवलं. हे जवळच असणाऱ्या एका कॅफेचं चित्र होतं. या चित्राविषयी आपल्या बहिणीला पत्रात तो लिहितो : ‘आता मला रात्रीचं चित्र काढण्यात खूप मजा येतेय. मला रात्र ही दिवसापेक्षा जास्त जिवंत आणि रंगांनी भरलेली वाटते.’
रात्र म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? काळाकुट्ट अंधार, भीती आणि शांतता, पण या चित्रकारानं आपल्या चित्रातून जगाला दाखवून दिलं की, रात्र ही दिवसापेक्षा जास्त जिवंत आणि रंगीबेरंगी असते. जेव्हा आपण या चित्राकडे पाहतो, तेव्हा त्यातला भडक पिवळा रंग आपलं लक्ष पटकन वेधून घेतो. चित्राच्या डाव्या बाजूला एक कॅफे आहे. तिथे लोक बसलेत, गप्पा मारत आहेत. तिथे लावलेल्या गॅसच्या दिव्यांचा पिवळा-केशरी प्रकाश बाहेर पडतोय. हा प्रकाश इतका उबदार आहे की, हे चित्र पाहताना थंडीच्या दिवसात शेकोटीजवळ बसल्यासारखं वाटतं. चित्रामध्ये उजव्या, वरच्या बाजूला गडद निळं आकाश आहे. त्यात चांदण्या चमकत आहेत. रस्त्याच्या दगडांवर त्या पिवळ्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडलंय. हे प्रतिबिंब सोन्यासारखं चमकतंय.
चित्रकारानं या चित्रात ‘निळा’ आणि ‘पिवळा’ या दोन विरुद्ध रंगांचा खेळ मांडला आहे. रंगांच्या भाषेत याला ‘कॉम्प्लिमेंटरी कलर्स’ म्हणतात. असे रंग वापरल्यामुळे चित्र उठावदार दिसतं. व्हॅन गॉगनं चित्रामध्ये दाखवलेला कॅफे म्हणजे युरोपियन लोकांचा ‘कट्टा’च आहे. हे चित्र बघताना एक प्रकारची ‘सुरक्षितता’ वाटते. रात्र जरी असली तरी तिथे भीती नाहीये. तिथे माणसांची सोबत आहे. त्यानं या चित्रात वर आकाशात चांदण्या दाखवल्या आहेत. त्या साध्या ठिपक्यांसारख्या नाहीत. त्या फुलांसारख्या उमलल्या आहेत.
रंगशास्त्रामध्ये पिवळा रंग हा आनंद, आशा आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. व्हॅन गॉगच्या आयुष्यात जेव्हा दुःख होतं, तेव्हा त्यानं मातीसारखे तपकिरी आणि काळे रंग वापरले होते. ते बघूनच उदासीनता येते, पण या चित्रात त्याने गॅसच्या दिव्याचा प्रकाश इतका वाढवलाय की, जणू काही तिथे दुसरा सूर्यच उगवल्यासारखं वाटतंय. व्हॅन गॉगनं संपूर्ण टेरेस सोन्यासारखा रंगवलंय. चित्रकलेच्या भाषेमधली अतिशयोक्ती आहे, जी फक्त एखादा प्रेमात किंवा आनंदात बुडालेला कलाकारच करू शकतो.
या चित्रात व्हॅन गॉगनं चांदण्या कशा काढल्यात ते पहा. त्या उमललेल्या फुलांसारख्या दिसतात. त्याला आकाश ‘स्थिर’ किंवा ‘निर्जीव’ वाटत नव्हतं. त्याला ते आकाश जिवंत वाटत होतं. चित्रात टेरेसवर जी माणसं बसली आहेत, त्यांच्यापैकी आपल्याला एकाचाही चेहरा स्पष्ट दिसणार नाही. ते फक्त रंगांचे फटकारे आहेत. यावरून हे समजतं की, व्हॅन गॉगला तिथे कोण बसलंय (व्यक्ती) यात रस नव्हता, तर त्याला फक्त ‘माणसांचा वावर’ आणि त्यामुळे कॅफेला येणारा जिवंतपणा महत्त्वाचा वाटत होता. चित्राच्या खालच्या भागात जो रस्ता आहे, तो नीट बघितला तर चित्रकाराची आनंदी मन:स्थिती जाणवल्यावाचून राहत नाही. मातीचा किंवा दगडाचा रस्तासुद्धा केशरी, गुलाबी आणि पिवळ्या रंगात रंगवलाय. चित्राच्या उजव्या बाजूला अंधारातसुद्धा हिरवीगार टवटवीत ती फांदी दिसते. यात व्हॅन गॉगचं निसर्गप्रेम दिसतं.
हे चित्र आजही इतकं लोकप्रिय आहे. कारण ते आपल्याला ‘आशा’ देतं. कितीही अंधारी रात्र असली तरी कोपऱ्यावरचा तो पिवळा उबदार दिवा नेहमीच आपली वाट पाहत असतो. व्हॅन गॉगनं वास्तवातले ‘तपशील’ चित्रात न दाखवता फक्त त्याच्या ‘भावना’ हायलाईट केल्या. हेच या चित्राचं यश आहे.
























































