
>> मेधा कुळकर्णी
राहुरी तालुक्यातल्या गुहा गावाने मुस्लिम गावकऱ्यांवर सामाजिक, आर्थिक बहिष्कार घातला आहे. याला निमित्त ठरला आहे येथील सुफी व नाथ संप्रदाय, परंपरा एकत्रित दर्शविणारा दर्गा. दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या कडवट धार्मिक अस्मिता आपल्या सहिष्णुतेचा, सलोख्याचा गोफ विलग करीत आहेत.
आम्ही गुहा गावात गेलो तो तिथल्या मुस्लिम नागरिकांच्या धरणे आंदोलनाचा 512 वा दिवस होता. राहुरी तहसील कार्यालयासमोर ही मंडळी रोज कार्यालयीन वेळात नेमाने धरण्याला बसतायत. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या राहुरी तालुक्यातल्या या गावाने मुस्लिम गावकऱ्यांवर सामाजिक, आर्थिक बहिष्कार घातलाय आणि गेली काही वर्षे, खास करून 2023 पासून गावात वाढता तणाव असल्याचं तिथला गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ता अल्लाउद्दीन शेख गेले दोन महिने सांगत होता. गावात सुमारे 120 मुस्लिम कुटुंबं आहेत. तुषार गांधी, फिरोज मिठीबोरवाला, शरद कदम यांनी एकत्र येऊन देशाचं ऐक्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने ‘हम भारत के लोग’ या नावाची संघटना नुकतीच स्थापन केली. त्या निमित्ताने झालेल्या बैठका, भेटी यात गुहा गावाची चर्चा सुरू झाली. आणि आम्ही तिथे जायचं ठरवलं.
नगरपासून 50 आणि राहुरीपासून 18 किमी अंतरावरचं हे गाव. तणावाला निमित्त झाला आहे गावातला अनेक शतकं अस्तित्वात असलेला आणि 1857 सालात ब्रिटिश सरकारची मंजुरी मिळालेला बाबा रमजान शाह माही सवार बाबांचा दर्गा. सुफी आणि नाथ संप्रदायाच्या परंपरा एकात एक गुंफलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रातल्या हिंदु आणि मुसलमान लोकांनी मिळून या परंपरा जोपासल्या आहेत. पण सध्याच्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या चलतीमुळे सलोख्याचा हा घट्ट गोफ सुटू लागला आहे. नगरच्या या परिसरात कान्होबा नावाचे संत होऊन गेले. मूळचे हिंदु असले तरी या कान्होबांनी सुफी संत सय्यदुस्सादात निजामुद्दिन-इद्रीस-अलहुसैनी यांच्या संपर्कात आल्यानंतर मुस्लीम धर्म स्वीकारला. भ्रमण करत ते नगरच्या ‘मढी’ या गावी येऊन राहिले. त्यांच्या चमत्काराच्या अनेक आख्यायिका आजही परिसरात प्रसिद्ध आहेत. तर या कान्होबांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर धारण केलेलं नाव होतं ‘शाह रमजान.’ ही नोंद सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोशात आढळते. 1884 साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेंसीच्या ब्रिटिश गॅझेटियरमध्येही सविस्तर वर्णन आहे. इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांचंही हेच मत असल्याची नोंद त्यांनी त्यांच्या ‘सुफी संप्रदाय’ (तत्त्वज्ञान आणि परंपरा) या पुस्तकात केली आहे. हे कान्होबा म्हणजेच नाथपंथीय कानिफनाथ असंही मानलं जातं. पण कानिफनाथ कान्होबांच्या कितीतरी आधी होऊन गेले असावेत आणि मढीचे कान्होबा किंवा शाह रमजान 15 व्या शतकाच्या शेवटी झाले असावेत, असं पगडींनी लिहिलंय. जगात दोन धर्मांचा असा मेळ क्वचितच आढळेल. हे या भूमीचे खरं सौंदर्य आणि सामर्थ्य. गुहा गावातलं कान्होबाचं स्थान किंवा रमजान शाह यांचा दर्गा हे या शतकानुशतकं चालत आलेल्या सलोख्याचं प्रतीक.
या दर्ग्यातले उत्सव वर्षानुवर्ष हिंदू-मुस्लिम सलोख्याने करत होते. गावकरी गुहा गावात मिळून-मिसळून राहात होते. अल्लाउद्दीनचे 88 वर्षांचे अब्बा, मकबूल शेख आम्हाला भेटले. या गोड म्हाताऱ्याने तर गावाच्या मातीत सद्भावनेचं शिंपण केलंय. गावातल्या कुठल्याही घरात जराशी कुरबुर झाली तरी ते वडीलकीच्या नात्याने समजावत आणि लोक या बुजुर्गाचा शब्द खाली पडू देत नसत. गावातल्या हॉटेलात दलितांना वेगळा कप देण्याची भेदभावाची रीत त्यांनी मोडून काढली. पण आता त्यांचा शब्द चालेनासा झालाय.
हा विखार तयार झाला तो घटनाक्रम थोडक्यात असा. 2023 साली फाल्गुनातल्या उरुसाचं परंपरेने चालत आलेलं यजमानपण मुस्लिमांकडून हिसकावून घेणं, कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट तयार करून त्याची नोंदणी करणं, जून 2023 मध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव भरवणं, त्यात 17 जूनला सनातन संस्थेचे श्रीहरी आंबेकर यांनी केलेलं भाषण, गावातल्या मुस्लिमांचा उल्लेख ‘जिहादी’ असा करून, बाराशे वर्षांपूर्वी इथे मंदिरच होतं असं सांगत आता ‘आपला’ देव परत मिळवायची घोषणा करणं. खरं तर, असं भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण, तसं झालं नाही. हिंदू गावकऱ्यांनी 28 डिसेंबर 23 रोजी दर्ग्यात बसवलेली कानिफनाथांची मूर्ती, तिथे नित्यनेमे सुरू केलेली पूजा, आक्रस्ताळी आरती अशी घोषणाबाजी वगैरे. या सर्व बळजबरीविरोधात मुस्लिमांनी कायदेशीर कारवाईची, न्यायाची मागणी करायला सुरुवात केली आणि मुस्लिमेतर गावकऱ्यांनी बहिष्काराचं अस्त्र वापरून आता मुस्लिमांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
आम्ही आधी दर्ग्याशीच पोचलो. तिथेच जवळ गावातली मशीददेखील आहे. मशीद आणि दर्गा यांची देखभाल पिढय़ान्पिढय़ा करणारी मुजावरांची 35 घरं या परिसरात आहेत. सय्यद, बागवान, पठाण ही अन्य मुस्लिम कुटुंबं गावात इतरत्र राहतात. चिंचेची बरीच झाडं दर्ग्याच्या परिसरात आहेत. या झाडांच्या गारव्यातच आम्ही त्यांच्याशी बोलायला बसलो. आम्हाला हिंदू गावकऱ्यांसोबतही चर्चा करायची होती परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ऑक्टोबर 2023 मध्ये गुहा ग्रामसभेने मुस्लिमांवरच्या बहिष्काराचा ठराव केला. नियम मोडणाऱ्याला दोन हजार रुपये दंड ठोठावणाऱ्या या ठरावाची वैधता तपासली पाहिजे, असं मुस्लिम गावकरी म्हणतात. अर्थात, ही बहिष्काराची कृतीच बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे. खुद्द आपल्या राज्याचाच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा आहे, महाराष्ट्र अधिनियम 2017. भारतात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवणारा अशा स्वरूपाचा कायदा महाराष्ट्राने केला आहे. तरीही गुहा गावात कुटुंबियांना स्वतःच्याच शेतजमिनीत कामं करायला रोखलं जातंय. पेरणीचा काळ आला तरी अजून त्यांना नांगरणी करता आलेली नाही. गावातले ट्रक्टर्स तर त्यांना दिले जातच नाहीयेत. म्हणून त्यांनी बाहेरून ट्रक्टर्स आणले तेव्हा जमाव चालून आला. ड्रायव्हरला मारहाण करण्याचा, शेतकाम करणाऱ्या बायकांच्या अंगावर टॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मैमूना आपा हे सांगत होत्या. त्या जमावापुढे आडव्या पडल्या. मैमुना हिंमतबाज आहेत, खणखणीत बोलतात. पण आता हताश झाल्यात. शेळ्या विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका विधवा बाईंना त्यांचं काम बंद करायची वेळ आलीये. कारण गावात कोणत्याही बांधावर त्यांच्या शेळ्यांना चरायला बंदी केली आहे. राजू बागवानचं भेळ, चिवडा, वडा, चहा देणारं गावातलं हॉटेल बंद करायला लावलं. वेल्डिंग, फॅब्रिकेशन करणारा मन्सूर सय्यद. त्याला केवळ पोटासाठी संगमनेरला स्थलांतरित व्हावं लागलं. मुस्लिम स्त्रिया शेतमजुरी करून दिवसाला दोन-तीनशे रुपये मिळवायच्या. बहिष्कारामुळे हा मार्ग आता बंद. तुटलेली चप्पल शिवणं, केस कापणं या साध्या साध्या कामांसाठीही गावाबाहेर जावं लागतंय. एकाचं झेरॉक्सचं दुकान त्याला रोजचे तीन-चार हजार मिळवून देत असे. आता दुकान गेलं. झेरॉक्स मशीन घरी आणून ठेवलंय. मिळकत शंभर-दोनशेवर आलीये. अलाउद्दीनच्या भावाला गावातल्या त्याच्या हिंदू मित्राने घरातल्या लग्नाची आमंत्रण पत्रिका दिली. तर त्या मित्राला दंड ठोठावला गेला. गावच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर बहिष्काराचे आदेश उघडपणे दिले जातात.
गुहा गावातल्या मुस्लिमांवरच्या सामाजिक-आर्थिक बहिष्काराच्या अशा या 120 पैकी या निवडक कथा. गुहा गावातला मुस्लिमांवरचा बहिष्कार हा आता नवीन प्रकार आहे. हा सरळ ‘आपण विरुद्ध ते’ असा धार्मिक दुभंग आहे. देशातल्या मुस्लिमविरोधी नियोजनबद्ध कटाचा भाग आहे. कारण मशिदी आणि दर्गे यांच्याभोवती संशयाचे भोवरे तयार करणं गेली दहा-बारा वर्षे सुरू आहे. दर्ग्यासारख्या अनेक सामायिक जागा. हिंदु आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांचे लोक अनेक पूर्वग्रह बाजूला ठेवूनही इथे एकत्र येतात. कट्टर हिंदुत्ववादी नेते या सामायिक जागा आणि अवकाश नष्ट करायच्या मागे लागले आहेत. महाराष्ट्रात जिह्याजिह्यात भाईचाऱ्याच्या सुरेल कहाण्या सांगणारे दर्गे आहेत. तिथल्या जमिनींवर, उत्पन्नावर डोळा ठेवून तिथे संघटितपणे विष पसरवलं जातंय. गुहाच्या मुस्लिम गावकऱ्यांनी तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या, धर्मादाय आयुक्त, वक्फ बोर्ड अशा सगळ्या प्रशासन यंत्रणेकडे न्यायासाठी साकडं घातलंय. न्यायलयातही ते पोचले आहेत. पण अजून तरी स्थिती जैसे थे आहे.
गुहावासी मुस्लिमांची लढाई त्यांच्या संयमाची, चिकाटीची कठोर परीक्षा घेणारी आहे. स्वतंत्र भारतात, खणखणीत संविधान असलेल्या भारतात अशी लढाई लढण्याची वेळ एका धर्माच्या नागरिकांवर, त्यांच्या धर्मामुळे येणं ही शरमेची आणि दुःखाची बाब आहे. ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करण्याचं बळ त्यांना आणि सन्मती अन्य सगळ्यांना मिळो.
आम्ही गुहा गावाला भेट दिली होती 23 मे रोजी. त्यानंतर स्थिती आणखी बिघडत चालली आहे. बिघडवणारे तेच, कडवे उजवे हिंदू. यांना हिंदू धर्मातल्या सलोख्याच्या परंपरांशी देणंघेणंच नाही. गावागावांत मुस्लिमांना त्रास देण्याचा यांचा ठरलेला पॅटर्न आहे. दर्ग्यापाशी जमायचं, दणदणाटी आवाजात आरत्या करायच्या – महाआरती हा शब्द वापरतात ते, मग दर्ग्याच्या भिंतींना भगवा रंग फासायचा, पताका वगैरे लावायच्या आणि एखाद्या दिवशी गुपचूप मूर्ती बसवून टाकायची. मुस्लिम कुटुंबांमध्ये दहशत निर्माण करायची. या पद्धतीने अहिल्यानगर जिह्यातच जवखेड, ता. पाथर्डी, खुद्द राहुरी गाव, पिंपरीवळण, ता. राहुरी, कापूरवाडी, ता. अहिल्यानगर, सुकेवाडी-गुलेवाडी, ता. संगमनेर याही गावांत मुस्लिमांना त्रास देणं सुरू झालंय. पुणे जिह्यातली चिरोली (आळंदीजवळ), पौड आणि पिरंगुट ही गावंदेखील या यादीत आधीपासूनच आहेतच. या सगळ्या गावांतले प्रतिनिधी त्यांची गाऱ्हाणी सांगायला नुकतेच मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी झालेल्या भेटीत तपशील समजला. आजच्या महाराष्ट्राचं वास्तव हे असं आहे.
(लेखिका सामाजिक समस्यांची अभ्यासक आहे.)