
>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]
नैसर्गिक, अक्षय आणि प्रदूषणमुक्त असलेली सौर ऊर्जा ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. कोळशासारख्या घातक इंधनावरचे अवलंबित्व कमी करण्यात सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. हिंदुस्थानचा विचार केल्यास गेल्या अवघ्या दशकभराच्या अवधीत आपला देश जगातील तिसरा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. हे कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आज ऊर्जेचा वापर एकूण वापराच्या 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या अनुदान योजनेअंतर्गत एकूण 24 लाख घरांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत.
सौर ऊर्जा पार्क, घराघरावर आणि सोसायटीच्या छतांवर दिसू लागलेले सौर ऊर्जा प्रकल्प हे नक्कीच समाधान देणारे आहेत. सध्या अनेक घरे, सोसायटय़ा या प्रकल्पांमधून वीजनिर्मिती करत आहेत आणि ग्रिडमध्ये देखील पाठवत आहे. शुद्ध स्वरूपाची म्हणून ओळखली जात असलेली ह्या ऊर्जानिर्मितीचे व्यवस्थापन जर नीट पद्धतीने केले गेले नाही, तर पुढे पर्यावरणासाठी ते किती धोकादायक ठरणार आहे ह्या संदर्भात अनेकांना कल्पना नाही आणि त्यावर फारशी चर्चा होतानादेखील दिसत नाही.
सौर ऊर्जा उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणारे सौर पॅनेल्स हे चांदी, पॉलिमर, अॅल्युमिनियम अशा धातूंच्या मदतीने बनवले जातात. सौर पॅनेलच्या बहुतेक भागांचा पुनर्वापर शक्य असतो. मात्र ह्यामध्ये असलेले शिसे आणि कॅडमियम हे धातू विषारी असून, त्यांचे प्रमाण जरी कमी असले तरी योग्य प्रकारे न हाताळले गेल्यास त्यांच्यापासून पाणी आणि माती प्रदूषित होण्याचा मोठा धोका असतो. सौर पॅनेल्स साधारण 25 वर्षे कार्यरत राहतात आणि त्यानंतर ती काढून टाकली जातात. हिंदुस्थानचा विचार केल्यास सध्या आपल्याकडे अशा सौर कचऱ्याच्या पुनर्वापर प्रक्रियेसाठी स्वतचे असे कोणतेही ठोस बजेट नाही. जुन्या झालेल्या सौर पॅनेल्सवर प्रक्रिया करणारी काही लहान केंद्रे आहेत, पण त्यांची संख्या फार कमी आहे.
सध्या आपल्या देशात किती सौर कचरा आहे त्याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र एका अभ्यासानुसार सौर ऊर्जेचा वाढता वापर बघता देशात 2030 पर्यंत 6 लाख टन सौर कचरा निर्माण होऊ शकतो. तर ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेच्या नव्या अभ्यास अहवालानुसार देशात 2047 पर्यंत 1.1 कोटी टन कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी नक्कीच धोकादायक म्हणावी अशी आहे. ह्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर ह्यासाठी लागणाऱ्या यंत्रणांवर आताच गुंतवणूक करायला सुरुवात केली नाही तर देशाला सौर कचऱ्याच्या एका नव्या आणि धोकादायक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
देशात मोठं मोठी सौर उद्याने ही 2010 सालात बांधण्यात आली होती. त्यामुळे येणाऱ्या 10 ते 15 वर्षात सौर कचऱ्याच्या खऱ्या समस्येची ओळख सामान्य लोकांना होऊ लागेल. सौर कचऱ्याचे योग्य नियोजन करणे, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे ह्यासाठी विशेष प्रकारच्या 300 रिसायकलिंग केंद्राची गरज देशाला भासणार आहे. या सर्वासाठी पुढील 20 वर्षात देशाला अंदाजे 47.80 करोड डॉलर्स (478 दशलक्ष रुपये) येवढी प्रचंड गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र काही तज्ञांच्या मते हिंदुस्थानात तयार होणारा सौर कचऱ्याचा आकडा हा अमेरिका आणि चीन सारख्या महासत्तांशी मिळता जुळता असणार आहे. 2030 सालापर्यंत अमेरिका आणि चीन दोघेही 10 लाख टनांपर्यंत सौर कचरा निर्माण करू शकतील.
सौर कचऱ्याच्या योग्य नियोजनाबद्दल काही तज्ञ पूर्णपणे आशावादी आहेत. सौर ऊर्जेचा वाढत्या वापरामुळे सौर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणाऱ्या जाणकार कंपन्यांची देखील मागणी वाढेल अशा परिस्थितीत ह्या क्षेत्रातील वाढती गुंतवणूक, जाणकारांची मोठी संख्या, वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, लोकांचा सहभाग अशा सर्वांमुळे सौर कचऱ्याची समस्या फारसे गंभीर रूप घेणार नाही आणि तिच्याशी आपण सहजपणे सामना करू शकू अशी त्यांना खात्री आहे. दोन्ही बाजूंची मते भिन्न असतीलदेखील, मात्र समस्या निवारण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करायला हवे हे नाकारता येणार नाही.
























































