
>> शहाजी शिंदे
कथा साहित्यात आणि विज्ञानपटांमध्ये आपण अनेकदा अशा यंत्रमानवांना पाहिले आहे जे मानवाप्रमाणेच भावना आणि वेदना व्यक्त करतात. विज्ञानाच्या प्रगतीने आता या कल्पनेला वास्तवात उतरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. हाँगकाँग सिटी युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी विकसित केलेली नवी ‘इलेट्रॉनिक स्किन‘ (ई–स्किन) तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी क्रांती मानली जात आहे.
हाँगकाँगच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली असून त्यांनी मानवी त्वचेप्रमाणेच संवेदना असणारी ‘ई-स्किन‘ म्हणजेच इलेट्रॉनिक त्वचा विकसित केली आहे. मानवी मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून तयार केलेली ही कृत्रिम त्वचा आता रोबोटना स्पर्शाची जाणीव करून देणार आहेच; पण याजोडीला त्यांना वेदनाही समजू शकणार आर्हेत. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग येथील संशोधक युयू गाओ आणि त्यांच्या सहकार्यांनी हे संशोधन ‘पीएनएएस‘ या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध केले असून, यामुळे भविष्यातील ह्युमनॉइड रोबोट्सविषयीची चर्चा सुरू झाली आहे.
या नव्या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे हे मानवी मज्जासंस्थेचे हुबेहूब अनुकरण करते. आजवरच्या रोबोटस्मध्ये बसवण्यात येणारी त्वचा ही केवळ दाब किंवा स्पर्श मोजण्यासाठी वापरली जात असे. मात्र, या नव्या ‘न्यूरोमॉर्फिक‘ त्वचेमध्ये स्पर्श आणि वेदना यांमधील फरक ओळखण्याची क्षमता आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीराला एखादी गरम वस्तू किंवा तीक्ष्ण धार लागल्यास मेंदूला सूचना मिळण्यापूर्वीच आपला हात मागे घेतला जातो, अगदी तशाच प्रकारची प्रतिक्षिप्त ािढया करण्याची क्षमता या कृत्रिम त्वचेमुळे रोबोंमध्ये येणार आहे. ही यंत्रणा चार वेगवेगळ्या थरांनी बनलेली असून, प्रत्येक थराची भूमिका एखाद्या जैविक मज्जापेशीसारखी आहे. जेव्हा रोबोटला हलका स्पर्श होतो, तेव्हा त्याचे संकेत मुख्य प्रोसेसरकडे पाठवले जातात, ज्यामुळे रोबोटला वस्तू हाताळणे किंवा लोकांशी संवाद साधणे सोपे होते. परंतु, जेव्हा स्पर्शाचा हा दाब एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जातो, तेव्हा ही यंत्रणा ‘पेन मोड‘ मध्ये जाते.
वेदनांची ही जाणीव रोबोटच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जेव्हा या त्वचेवर तीव्र दाब पडतो, तेव्हा सिस्टीम ही माहिती मुख्य संगणकाकडे न पाठवता थेट रोबोटच्या मोटर्सना हाय-व्होल्टेज संदेश पाठवते. यामुळे रोबोट कोणत्याही विलंबाशिवाय आपला हात किंवा पाय धोयाच्या ठिकाणाहून मागे घेऊ शकतो. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘रिफ्लेस अॅशन‘ किंवा प्रतिक्षिप्त ािढया असे म्हणतात. विशेष म्हणजे, या त्वचेला स्वतच्या नुकसानाची जाणीव होण्याची देखील सोय करण्यात आली आहे.
या संशोधनाचे व्यावहारिक स्वरूपही अत्यंत सुटसुटीत ठेवण्यात आले आहे. ही त्वचा जरी स्वतहून बरी होऊ शकत नसली, तरी तिची रचना ‘मॉडय़ुलर‘ म्हणजे सुटय़ा भागांची मिळून बनलेली आहे. ही त्वचा चुंबकीय ब्लॉसप्रमाणे जोडलेली असते. त्यामुळे जर एखादा भाग खराब झाला, तर संपूर्ण रोबोट उघडण्याची गरज भासत नाही. केवळ तो खराब झालेला तुकडा काढून काही सेकंदात तिथे नवीन तुकडा बसवता येतो. या सोयीमुळे रोबोटची देखभाल करणे अत्यंत स्वस्त आणि सोपे होणार आहे. आजच्या काळात जेव्हा एलॉन मस्क यांच्या स्पेसएस सारख्या कंपन्या आणि अनेक तंत्रज्ञान संस्था अधिक प्रगत ह्युमनॉइड रोबोट्स बनवण्यावर भर देत आहेत, तेव्हा अशा प्रकारची मानवी संवेदना असणारी त्वचा या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे.
विज्ञानाच्या या प्रगतीमुळे आता माणूस आणि यंत्र यांच्यातील भिंत अधिक पुसट होत चालली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञानाचे हे मानवीकरण जेवढे सुखद वाटते, तेवढेच ते ‘धोयाची घंटा‘ देणारे देखील आहे. जेव्हा यंत्रांना मानवाप्रमाणे संवेदना प्राप्त होतात, तेव्हा केवळ तांत्रिकच नव्हे, तर नैतिक आणि सामाजिक स्तरावरही अनेक गंभीर प्रश्न उभे राहू शकतात. रोबोंमध्ये ‘प्रतिक्षिप्त प्रक्रिया‘ निर्माण करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने स्वागतार्ह असले, तरी यामुळे रोबो अधिक स्वायत्त होत आहेत. आजवर ते केवळ मानवाने दिलेल्या आज्ञांचे पालन करणारी यंत्रे होती. मात्र, जेव्हा त्यांना स्वतला होणार्या वेदना समजू लागतील, तेव्हा त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा ‘स्व-संरक्षण‘ भाव निर्माण होईल. संशोधकांच्या मते, जर रोबोटला स्वतच्या अस्तित्वाची आणि त्याला होणार्या इजांची जाणीव झाली, तर भविष्यात तो स्वतचा बचाव करण्यासाठी मानवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा स्वतला वाचवण्यासाठी मानवावरच उलट वार करू शकतो.
ह्युमनॉइड रोबोट्स अधिक मानवी दिसू लागल्याने आणि वागू लागल्याने मानवी नात्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याला विज्ञानात ‘अनकॅनी व्हॅली‘ म्हणतात. एखादे यंत्र जेव्हा माणसासारखे दिसते पण पूर्णपणे माणूस नसते, तेव्हा माणसाच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. तसेच, जर रोबोट्स मानवापेक्षा अधिक हळवे किंवा संवेदनशील वाटू लागले, तर लोक मानवी नात्यांपेक्षा यंत्रांशी भावनिक रित्या जोडले जातील. यामुळे समाजात एकाकीपणा आणि सामाजिक विरक्ती वाढण्याचा धोका आहे.
प्रगत रोबोंच्या निर्मितीमुळे केवळ श्रमाधारीतच नव्हे तर कौशल्याधिष्ठित नोकर्यांवरही गदा येत चालली आहे. अशा काळात संवेदना असणारे रोबो अवतरल्यास नर्सिंग, केअरटेकिंग आणि शिक्षण क्षेत्रात ते मानवाची जागा घेऊ शकतात. यामुळे मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होऊ शकते. शिवाय, हे महागडे तंत्रज्ञान केवळ श्रीमंत देशांकडे किंवा भांडवलदारांकडे असल्याने आर्थिक विषमता अधिक तीव्र होण्याची भीती आहे. परिणामी भविष्यात ज्यांच्याकडे प्रगत रोबो असतील, तेच भविष्यातील सत्तेचे केंद्र बनण्याचा धोकाही आहे.
विज्ञानाचा कोणताही शोध हा सुरुवातीला मानवाच्या कल्याणासाठीच असतो, मात्र त्याचा अतिवापर किंवा चुकीच्या दिशेने झालेली प्रगती विनाशाकडे नेणारी ठरू शकते.
(लेखक संगणक अभियंता आहेत)
























































