वेबसीरिज – आपलीशी वाटणारी कथा

>> तरंग वैद्य

आपली स्वप्नं, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून अनेक वेळा परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं हे सत्य सांगणारीआगरा अफेअर ही मालिका. स्वतःची  तत्त्वं सांभाळत आकाश आणि तन्वीचं व्यावसायिक नातं प्रेमात बदलताना पाहणं, अनुभवणं छान वाटतं.

आगरा अफेअर’ नाव वाचून असं वाटू शकतं की, एखाद्या राजकारणी खेळीवर किंवा ताजमहालसंबंधित इतिहासावर बेतलेली कथा असणारी ही वेब सीरिज असावी, पण नाही. आगरा येथे राहणाऱ्या एका मुलामुलीच्या प्रेमकथेवर आधारित आहे ‘आगरा अफेअर’. मॅक्सप्लेअर- अॅमेझॉन प्राईमवर 8 जानेवारी, 2025 ला ही वेब सीरिज आली असून एकूण भाग आहेत सहा आणि लांबी 25 ते 30 मिनिटे.

आकाश अग्रवाल जेवण उत्तम बनवतो. त्याने त्याचे व्यावसायिक प्रशिक्षणही घेतले आहे. तो आपल्या परिवारासहित आगरा येथे राहतो आणि इथेच त्याला आपले स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करायचे आहे, पण प्रश्न पैशांचा आहे. रेस्टॉरंटसाठी लागणारं भांडवल कुठून आणणार? त्याचे वडील त्यांच्या वडिलांचे राहण्याची सोय असलेले हॉटेल कसंबसं चालवत आहेत. कारण आता स्पर्धा खूप वाढली आहे. रोज नवनवीन हॉटेल्स उभारली जात आहेत. आकाशचे वडील आता वय झाले म्हणून त्यांच्या हॉटेलची धुरा त्याच्या हातात सोपवतात आणि आकाशला आपलं स्वप्न बाजूला ठेवून गळ्यात पडलेल्या व्यवसायाकडे लक्ष देणं भाग पडतं. कारण त्याच्यावरच घर चालत असतं.

आकाश आपल्या मित्राच्या मदतीने मेहनत घेत असतो, पण हॉटेल म्हणावं तसं चालत नसतं. तन्वी सचदेव एक गाईड म्हणून काम करत असते. कोणालाही, विशेषकरून परदेशी पाहुण्यांना लुबाडायचे नाही. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचे यासाठी तिचा प्रयत्न असतो. म्हणून काही गाईड तिच्यावर चिडत असतात, तिच्या विरुद्ध खेळी करतात, पण ती बधत नाही. योगायोगाने तिची गाठ आकाशशी पडते. दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडतात. तन्वी आकाशच्या हॉटेलसाठी काही बदल सुचवते आणि काही मोलाचे सल्ले देते, जे आकाशला आवडतात. तन्वी तिच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची सोय आकाशच्या हॉटेलमध्ये करायचा प्रयत्न करेल अशा बोलीवर दोघांमध्ये करार होतो आणि अर्थातच ‘ये करार प्यार में बदल जाता है’.

आई-वडील आपले निर्णय मुलांवर थोपतात, ते जबाबदार नाहीत असे भासवून त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. अर्थात हे सर्व ते जाणूनबुजून करत नसतात. उलट काळजीपोटीच करतात हा ‘जनरेशन गॅप’चा भाग पण कथेत नीट पेरला आहे. एकूण कथेला अनुसरूनच प्रसंग आहेत. त्यामुळे कथा आपलीशी वाटते.

या वेब सीरिजमधील कलाकार ओळखीचे असे  नाहीयेत, पण सर्वांनी आपली कामे चोख केली आहेत. आपल्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडणाऱ्या मुलाची भूमिका आकाश दहियाने उत्तम प्रकारे साकारली आहे. तन्वीसमोर प्रेम व्यक्त केलं आणि तिने नकार दिला तर…या भीतीने होणारी कुचंबणा त्याने नीट व्यक्त केली आहे. तन्वी दिसते छान आणि अभिनयही करते छान. आकाशचा मित्र आणि त्याला योग्य सल्ले देणारा मित्र ही भूमिका प्रतीक पचौरीने व्यवस्थित निभावली आहे. इतर कलाकारही योग्य साथ देतात.

[email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक पटकथाकार आहेत)