
सध्याचा जमाना आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा आहे. अनेक क्षेत्रांत एआयचा वापर केला जात आहे. माणसाची जागा एआय तंत्रज्ञान घेणार का, नोकऱ्या संपुष्टात येणार का, अशी शंका व्यक्त होत आहे. अशातच आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी असा एआय असिस्टंट बनवला आहे, जो माणसासारखे स्वतः प्रयोग करू शकतो आणि त्याचे निष्कर्ष काढू शकतो. आर्टिफिशल इंटेलिजन्ट लॅब असिस्टंट (एआयएलए) नावाचे हे उपकरण आहे.
आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केलेले ‘एआयएलए’ हे उपकरण एक जटिल आणि संवेदनशील आहे. हे उपकरण लहान स्तरावर पदार्थांचा सखोल अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मायक्रोस्कोपची सेटिंग नीट करायला एक दिवस लागतो, पण नवीन एआय-लॅब असिस्टंट सात ते 10 मिनिटांत हे काम करू शकतो. त्यामुळे संशोधनाला गती मिळेल.
एआय-लॅब असिस्टंट स्वतः प्रयोग करू शकतो आणि त्याचे परिणाम अभ्यासू शकतो. तसेच काही उपकरणे चालवू शकतो. आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक नित्यानंद गोस्वामी यांनी सांगितले की, एआयएलएने स्वतः काम करून दाखवलेय की, एआय आता प्रयोगशाळेतही मदत करू शकतो.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक इंद्रजित मंडल यांनी सांगितले की, एआय-लॅब असिस्टंटची रोजच्या जीवनात खूप मदत होते. त्याच्यामुळे माझे काम लवकर होते. एआयचे काम आता फक्त प्रश्नांची उत्तरे देणे किंवा डेटा पाहण्यापर्यंत मर्यादित राहिलेले नाही, तर तो प्रयोगही करू शकतो.
देशातील विद्यापीठ, संशोधन संस्था जिथे जास्त उपकरण किंवा तज्ञ मंडळी नसतील, तिथे एआय लॅब असिस्टंटची मदत घेता येईल.


























































