
‘‘सगळ्या प्रकारचे गडबड घोटाळे करून आणि जंग जंग पछाडूनही भारतीय जनता पक्षाला मुंबईत बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मुंबईकर भाजपच्या विरोधातच आहेत असा याचा अर्थ आहे,’’ अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिली.
गुजरात दौऱयावर असलेल्या केजरीवाल यांनी अहमदाबाद येथे मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. त्या वेळी त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. ‘‘विरोधी पक्षांच्या मार्गात भाजपने अनेक अडथळे आणले. निवडणूक प्रक्रियेत अनेक गडबडी केल्या. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केला तरीही त्यांना बहुमत मिळाले नाही. मुंबईच्या लोकांना ते नकोच आहेत हे यातून दिसून आले,’’ असे केजरीवाल म्हणाले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे शिलेदार विशाल ससाणे आणि विशाल विचारे यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी या निवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मढवी, विधानसभाप्रमुख अतुल पुळकर्णी आदी उपस्थित होते.
























































