
रेल्वे सेवांवर झालेल्या चर्चेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत विविध मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सेवा सुधारणा, कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग, बुलेट ट्रेन कामांमुळे होणारे नुकसान, तसेच मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न यावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
सावंत म्हणाले की, रेल्वे बजेटमध्ये 2,81,377.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या काही कामांचे कौतुक करायला हवे, परंतु त्यातील त्रुटींवर लक्ष दिले जात नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे सेवांचा विस्तार, बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन आणि विविध कॉरिडॉर प्रकल्पांमुळे आनंद वाटतो, मात्र स्थानिक गरजांकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्हींचे मुख्यालय मुंबईत आहे. या दोन्ही मार्गांमधून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र त्यानुसार सुविधा मिळत नाहीत. मुंबईत चार रेल्वे मार्ग आहेत, परंतु लोकल सेवा सुधारण्यासाठी किमान सहा मार्गांची आवश्यकता आहे. सध्या त्याच मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्याही धावत असल्याने लोकल सेवेत सुधारणा करणे कठीण होते.
यावेळी त्यांनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेल्या एलिव्हेटेड ट्रेनच्या संकल्पनेचा उल्लेख केला. एलिव्हेटेड ट्रेनचा पर्याय विचारात घेतल्यास मार्गवाढीचा प्रश्न सोडवता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे असलेले ब्रॉडगेज मार्ग आणि मुंबई रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ते वापरात आणल्यास नवी मुंबईकडे जाणारा मार्ग विकसित होईल आणि हार्बर लाईनवरील ताण कमी होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
कोकण रेल्वेबाबत बोलताना सावंत म्हणाले की, हा प्रकल्प मधु दंडवते यांच्या काळात सुरू झाला आणि अनेक प्रयत्नांनंतर पूर्ण झाला. मात्र आजही कोकण रेल्वेवर एकाच मार्गावर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे होळीच्या काळात तेजस आणि वंदे भारतसारख्या गाड्या सहा ते सात तास उशिरा धावल्या. जोपर्यंत कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग होत नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी ही प्रमुख स्थानके असल्याचे सांगत त्यांनी या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचे नमूद केले. सावंतवाडी हे गोव्याच्या सीमेवरील महत्त्वाचे स्थानक असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली. कोकण रेल्वेला मध्य रेल्वेत विलीन करून त्याचा विस्तार करण्याचीही त्यांनी मागणी केली. तसेच कोकणातील मत्स्यव्यवसाय, आंबा, फणस आणि काजू यांसारख्या उत्पादनांच्या वाहतुकीसाठी रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतही त्यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात बुलेट ट्रेनसाठी टनेल खोदकाम करताना होणाऱ्या स्फोटांमुळे सुमारे 100 ते 150 घरांना तडे गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून स्थानिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाकडे रेल्वे मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना सावंत म्हणाले की, या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याबाबत मनमाड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. इंदूरमध्ये ज्या दराने जमीन दिली जाते, त्याच प्रमाणात मोबदला मनमाडमध्ये दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. जमीन गमावणाऱ्या कुटुंबातील किमान दोन सदस्यांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणी स्थानिकांकडून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पूर्ण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सावंत म्हणाले. नाशिकमध्ये काही कामे सुरू असली तरी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पूर्ण न झाल्यास यात्रेकरूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील रेल्वे मोटरमनच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. काही मोटरमननी अलीकडेच राजीनामे दिल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, मोटरमनच्या केबिनमध्ये बसवलेल्या यंत्रांमुळे प्रचंड आवाज होतो आणि त्यामुळे काम करणे कठीण होते. या तक्रारी गंभीरपणे घेऊन मोटरमनना दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे रुळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. रुळांची तपासणी करणारे कर्मचारी जड साधने घेऊन किलोमीटरच्या अंतरावर चालत काम करतात. ते रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या प्रश्नाकडेही सावंत यांनी लक्ष वेधले. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक स्थानकांची नावे बदलल्याचा दावा करणारे फलक लावले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप त्या स्थानकांची नावे बदललेली नाहीत, असे त्यांनी सांगितले.
हार्बर लाईनवरील सॅंडहर्स्ट रोड स्थानकाचे नाव डोंगरी असे करावे, रे रोडचे नाव माझगाव, कॉटन ग्रीनचे नाव काळाचौकी, करी रोडचे नाव लालबाग असे नामांतर करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. मरीन लाइन्सचे नाव मुंबादेवी, चारणी रोडचे नाव गिरगाव, ग्रँट रोडचे नाव गावदेवी आणि बॉम्बे सेंट्रलचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणीही त्यांनी केली. गुजरातमधील केवडिया स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास अडचण का आहे, असा सवाल त्यांनी केला.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रशासनिक आणि राजकीय अनुभव लक्षात घेऊन या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली.
























































