
अमेरिका, इस्रायल- इराण युद्धामुळे सर्व जगाला मोठा फका बसला आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि महागाई वाढण्याची चिंता जगाच्या मानगुटीवर बसली आहे. युद्धात अनेक देशांचे नुकसान होते. मात्र, या युद्धामुळे अमेरिकेने जबरदस्त कमाई केल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली आहे. त्यामुळे अमेरिकेचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.
आचा युद्ध कधी संपेल? या प्रतीक्षेत जग आहे. या युद्धाच्या परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक विधान चर्चेत आहे. त्यांनी म्हटले आहे की युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा खंडीत झाला आहे, त्यामुळे किमती वाढल्या आहेत. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि अमेरिकेने जबरदस्त कमाई केली, असा नवा दावा ट्रम्प यांनी केला आहे. युद्ध आणि तणावामुळे, जागतिक बाजारात तेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत आणि सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $१०० च्या आसपास व्यापार करत आहे, जे सुमारे एक महिन्यापूर्वी प्रति बॅरल $७५ होते.
जेव्हा तेल महाग होते, तेव्हा आपण खूप पैसे कमवतो, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आता पैसे कमावण्यापेक्षा इराणला अण्वस्त्रे मिळविण्यापासून रोखणे, ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. त्यामुळे जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा अमेरिकेची सर्वाधिक कमाई होते. जेव्हा तेल महाग होते, तेव्हा आपण जबरदस्त कमाई करतो. युद्धादरम्यान, तेल पुरवठा खंडित होतो आणि शिपिंगला धोका तयार होतो. त्यामुळे तेल बाजारपेठेत अनिश्चितता वाढते, ज्यामुळे किंमती वाढतात, ज्यामुळे अमेरिकन ऊर्जा कंपन्यांना फायदा होतो. या युद्धाचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही. तेलाच्या वाढत्या किमती जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवत आहेत. तथापि, अमेरिकेत पेट्रोलच्या किमती देखील वाढल्या आहेत, ज्या सरासरी $3.6 प्रति गॅलनपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांवर खर्चाचा दबाव वाढला आहे. तरीही अमेरिकेने जबरदस्त कमाई केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प यांच्या विधानावर अमेरिकन राजकारणातही टीका होत आहे. काही विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे की वाढत्या तेलाच्या किमती सामान्य लोकांवर भार वाढवतात आणि महागाई देखील वाढवतात. त्यांचा असा विश्वास आहे की युद्ध आणि तेल बाजारातील अशांततेचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आखाती देशातील तणाव दीर्घकाळ राहिला तर तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल, विशेषतः जे देश मोठ्या प्रमाणात तेल आयात करतात. तेल महाग असते तेव्हा अमेरिकेला काही प्रमाणात फायदा होतो. होर्मुझची सामुद्रधुनी सध्या बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढणे निश्चित आहे.
युरोप आणि इतर देशांना अमेरिकन तेल आणि नासर्गिक वायू खरेदी करावा लागतो. ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे आणि अशा परिस्थितीत अमेरिकेला सर्वाधिक फायदा होणार आहे. ट्रम्प म्हणत आहेत की त्यांचे ध्येय सुरक्षा आणि शांतता आहे आणि तेलापासून मिळणारा नफा हा एक किरकोळ मुद्दा आहे. युद्धामुळे अमेरिकेला फायदा होईल, ही वस्तुस्थिती ट्रम्प यांना आधीच माहिती आहे. आखाती देशातील तणावाचा तेल पुरवठ्यावर परिणाम होईल आणि अमेरिका नंतर त्याचे तेल जास्त किमतीत विकेल, ही वस्तुस्थिती सर्वांना आधीच अपेक्षित होती. परंतु आता ट्रम्प स्वतः अमेरिकेचे फायदे मान्य करत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे खरे रुप जगासमोर आले आहे.


























































