
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘अॅशेस’ मालिकेपूर्वी सर्वांचा एकच प्रश्न होता. यंदा तरी इंग्लंड पराभवांची मालिका खंडित करणार का.. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर गेल्या 15 कसोटींत इंग्लंडला एकाही विजयाचा चव चाखता आलेली नाही. 13 पराभव आणि दोन सामने अनिर्णित, अशा कामगिरीमुळे इंग्लंडचे 2010-11 च्या मालिकेतील 3-1 या विजयानंतरचे ‘पाणी’ अजूनही सुकलेलेच आहे. त्यामुळे इंग्लिश संघ आपल्या विजयाची तहान भागवण्यासाठी व्यापुळ झालाय. काहीही झाले तरी चालेल, दुष्काळ संपविणारच हे ध्येय उराशी बाळगूनच ते पर्थच्या पिचवर उतरणार आहेत. या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावरील अपराजित परंपरा कायम राखणार का? आणि इंग्लंडचा धडाडीचा कर्णधार बेन स्टोक्स हा इतिहासाचे गाठोडे बदलून दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘अॅशेस’ जिंकून दाखवणार का? दोन्ही संघांना प्रश्न पडलेत आणि उद्यापासून ते पर्थवर उत्तर शोधण्यासाठी संघर्ष करताना दिसतील.




























































