
आशा भोसले यांच्या निधनाने संगीत आणि सिने क्षेत्रावर शोककळा पसरली. आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आशा भोसले यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांचा त्यांच्या आठवणींनी कंठ दाटला.
एक असा आवाज जो प्रत्येक घरात घुमत होता. त्यांची प्रत्येक गाणी मंत्रमुग्ध करणारी होती. मराठी, हिंदी सिनेसृष्टीत असा आवाज होणे नाही. एकदा त्यांचे रेकार्डिंग सुरू होते. मी तिथे गेलो होतो. त्यात ‘काय’ असे म्हणायचे होते. त्यात त्यांनी मलाच म्हणायला आग्रह केला आणि मी हिम्मत करून तो शब्द त्या लावणीत म्हटला. जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो. त्यांचा स्वर कुठेही पोहोचायचा, वरच्या स्केलवर सहज जायचा.
– अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते
रमेश सिप्पी झाले भावूक
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक रमेश सिप्पी भावुक झाले. मी आशाजींच्या खूप जवळ होतो, कारण त्यांचे पती आर. डी. बर्मन हे ‘शोले’सह माझ्या अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते. त्यामुळे, पंचम आणि आशाजी यांच्याशी निगडित आठवणी खूप भावनिक आहेत. त्यांचे जाणे अत्यंत दुःखद आहे, असे रमेश सिप्पी म्हणाले. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले.
संगीत क्षेत्राच्या ‘सुवर्णकाळात’ त्यांनी अत्यंत असाधारण आणि उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्यासारखी गायिका पुन्हा होणे नाही. आपल्या कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी होती. जेव्हा कधी कुणाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळे, तेव्हा एक कलाकार म्हणून त्यांचे स्थान किती अढळ आणि महान आहे, याची जाणीव त्यांनी कधीच कुणाला होऊ दिली नाही. त्या नेहमीच अत्यंत विनम्र राहिल्या.
– ललित पंडित, संगीतकार
‘आशाताई’ आता आपल्यात राहिल्या नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. एक संगीतकार, एक चाहता आणि एक कौटुंबिक मित्र म्हणून माझे हे दुःख शब्दांत व्यक्त करणे मला अशक्य आहे. मी त्यांना नेहमीच ‘माता सरस्वती’ मानले. त्या सदैव सुरांमधून आपल्यासोबत राहतील.
– शंकर महादेवन, गायक.
आशाताई महान गायकांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या सुमधुर गीतांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला आनंद दिला. त्यांची ही कामगिरी कोणत्याही सामान्य मानवाच्या क्षमतेपलीकडची आहे. त्या मला अगदी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असल्यासारख्या वाटायच्या.
– हरिहरन, गायक
माझी आई गेली. माझे पहिलेवहिले गाणे प्रदर्शित झाले, तेव्हा ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. ती खरोखरच एक महान कलाकार होती. माझ्या यशात तिने अत्यंत मोलाची भूमिका बजावली.
– अन्नु मलिक, संगीतकार
दिलखुलास आणि मिश्कील व्यक्तिमत्त्व
1982 सालापासून मी आशाताईंच्या ए. बी. ऑर्पेस्ट्रात साथसंगत करत आहे. खरं तर मंगेशकर कुटुंब आणि आमचा खूप जुना परिचय. माझे वडील नाना साठे आणि काका बाळ साठे हे मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकर यांच्या कंपनीत व्हायोलिन वादक होते. मंगेशकर भावंडं ही माझ्या वडिलांसमोरच लहानाची मोठी झाली. ए. बी. ऑर्पेस्ट्राचे देशविदेशात शेकडो कार्यक्रम झाले. 1983 साली मी आशाताईंसोबत पहिला विदेश दौरा केला. तोही अमेरिकेला. पश्चिम बंगालमधील त्यांच्या शोला तुफान प्रतिसाद मिळायचा. संध्याकाळचा कार्यक्रम असला तरी लोक दुपारपासून आशाताईंंचे गाणे ऐकायला यायचे. तिथले कार्यक्रम पहाटेपर्यंत चालायचे.
अलीकडे तीन वर्षांपूर्वी आम्ही इस्रायल दौरा केला. इस्रायलमध्ये तेव्हा वातावरण तणावाचे होते. त्यातच आशाताईंची कॉन्सर्ट खुल्या ऑपेरा थिएटरमध्ये होती. मात्र तशा तणावग्रस्त परिस्थितीतही आम्ही शो केला. त्यानंतर 2024 साली ‘आशा अॅट नाईन्टी’ हा कार्यक्रम बीकेसीच्या जिओ वर्ल्डमध्ये केला. आशा भोसले यांचा स्वभाव दिलखुलास, मिश्कील, थट्टामस्करीचा. शोच्या आदी त्यांच्या घरी दर रविवारी रिहर्सल व्हायची. त्यावेळी आशाताईंचा पाहुणचार, आदरातिथ्य अनुभवायला मिळायचे. त्या प्रत्येकाला आग्रहाने जेवूखाऊ घालायच्या. रिहर्सल चालू असताना मध्ये स्वयंपाकघरात डोकावून यायच्या. रिहर्सलच्या आधीही त्यांच्या घरी जाणे व्हायचे. तेव्हा त्या अनेक जुन्या संगीतकारांच्या आठवणीत रमून जायच्या. त्या अनेक जुन्या आठवणी आज जाग्या झाल्या.
– सूराज साठे, अॅकॉर्डियन वादक
सोनचाफ्याचा सुगंध आजही दरवळतोय
आशाताईंनी अनेक भाषांमधली विविध प्रकारची, हजारो गाणी गाऊन जागतिक विक्रम केला. अतिशय कष्टाने, रियाजाने त्यांनी आपले गाणे वेगळे केले. लतादीदींसारख्यांसोबत स्पर्धा असताना त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. लोक वयाच्या साठीपासूनच निवृत्तीच्या गोष्टी करतात, पण आशाताईंनी वयाच्या नव्वदीत दुबईत जाऊन कार्यक्रम सादर केला. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी जलतरण तलावाच्या उद्घाटनप्रसंगी माझा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी आशाताईंनी मला थांबूवन ठेवा, असे आयोजकांना सांगितले होते. मला खूप अवघडल्यासारखे झाले. कारण दुसऱया दिवशी पहाटे इंदूरच्या कार्यक्रमासाठी मला विमान पकडायचे होते, पण आशाताईंची भेट झाली. त्या सोनचाफ्याची फुले घेऊन आल्या होत्या. तो सुगंध आजही माझ्या मनात दरवळतोय…
– पद्मजा फेणाणी, ज्येष्ठ गायिका
संगीतातील सूर्यचंद्र हरपले- उत्तम सिंग
लतादीदी आणि आशा भोसले म्हणजे संगीतातील सूर्यचंद्र. दोन्ही गेले. आशाताई म्हणजे अष्टपैलू गायिका. असे कोणते गाणे नसेल, जे आशाताईंनी गायले नाही आणि संगीतकारांनी त्यांच्याकडून गावून घेतले नाही. कोणत्याही शैलीचे गाणे- मग अभंग असू दे नाहीतर गझल किंवा पॉप-आशाताईंच्या दैवी सुरांचा स्पर्श त्याला व्हायचा.
माझ्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटांसाठी त्यांनी ‘ले गयी ले गयी’ हे गाणे गायले. या ओळीतला एक वैशिष्टय़पूर्ण टोन हे फक्त आशाताईच गाऊ शकतात. हे केवळ त्यांचेच देणं आहे, माझं नाही. पुढे तर ‘ले गयी ले गयी’ या गाण्याशिवाय त्यांची एकही कॉन्सर्ट होत नसे. 50 वर्षांपूर्वी रेकॉर्डिंगची पद्धत वेगळी होती. सगळं लाईव्ह व्हायचं. आतासारखे आधुनिक तंत्र नव्हते. त्यावेळचे गायक, संगीतकार, वादक सगळेच ग्रेट होते. आशाताई या सगळ्यांसाठी गायच्या, त्यांची प्रचंड मेहनत असायची. अत्यंत व्हर्सटाईल गायिका. मी आशाताईंच्या अनेक शोसाठी अरेंजर म्हणून काम केले. याशिवाय व्हायोलिनदेखील वाजवायचो. आम्ही देशविदेशात अनेक दौरे केले. अमेरिका, लंडन, मॉरिशस, सिंगापूर अशा अनेक देशांतील आमचे दौरे गाजले. त्याच्या खूप सुंदर आठवणी आहेत. लतादीदींसोबत मी खूप काम केले. लतादीदी किंवा आशाताई पुन्हा होणे नाही.
(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत)


























































