
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी दिंडीसाठी 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकऱ्यांच्या पायांना शास्त्रोक्त पद्धतीने व फिजिओथेरपीच्या माध्यमातून आराम दिला जात आहे. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.