रूट-ब्रूकची झुंजार भागीदारी

सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या अॅशेस  मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने लढाऊ वृत्ती, संयम आणि आत्मविश्वास यांचे दर्शन घडवत स्फूर्तिदायक कामगिरी केली. खराब सुरुवात झाली असतानाही जो रूट आणि हॅरी ब्रुक यांच्या दमदार अर्धशतकी खेळींमुळे इंग्लंडने दिवसअखेर मजबूत स्थिती निर्माण केली. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे केवळ 45 षटकेच खेळ होऊ शकला, तरीही इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावणारा हा दिवस ठरला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी झाय रिचर्डसनऐवजी अष्टपैलू ब्यू वेबस्टरला संधी दिली, तर फिरकीपटू टॉड मर्फीला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. कर्णधार स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीवर फिरकीला फारशी मदत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. इंग्लंडला मात्र बदल करण्यास भाग पाडले गेले आणि दुखापतग्रस्त गस
अॅटकिंसनच्या जागी मॅथ्यू पॉट्सला संघात घ्यावे लागले.

इंग्लंडची सुरुवात पुन्हा एकदा डळमळीत झाली. बेन डकेटने आक्रमक खेळ दाखवत मिचेल स्टार्कच्या एका षटकात सलग दोन चौकार ठोकले, मात्र 24 चेंडूंतील 27 धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर मायकेल नेसरने झॅक क्रॉलीला बाद केले, तर लगेचच स्कॉट बोलॅण्डने जेकब बेथेलला तंबूत पाठवले. अवघ्या 13 षटकांत 57 धावांत तीन आघाडीचे फलंदाज बाद झाल्याने इंग्लंड दबावाखाली आला होता.

याच निर्णायक क्षणी रूट आणि ब्रूक यांनी इंग्लंडचा डाव सावरत संघाला नवी ऊर्जा दिली. नव्या चेंडूचा धोका त्यांनी संयमाने हाताळला, चुकीचे फटके टाळले आणि संधी मिळताच धावा वाढवल्या. उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या 3 बाद 114 अशी झाली होती. 34 व्या षटकात दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली-रूटने अनुभवाच्या जोरावर, तर ब्रूकने आत्मविश्वासपूर्ण फटक्यांनी. ब्रूकने कसोटीतील पहिला षटकार ठोकत इंग्लंडच्या डावाला आणखी धार दिली.