
आशिष निनगुरकर, [email protected]
विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान, विषयाचे सखोल आकलन, प्रायोगिक कौशल्ये, विषयाची आवड यांचा अभाव आणि कुठलीही दिशा नसणारे अध्ययन अशा शिक्षणामुळे तरुण पिढीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. शिकून निपिय आणि निकामी झालेल्या तरुणांची संख्या समाजात वाढू लागली तर सर्वसामान्य माणसाच्या मनातील शिक्षणाविषयीची आस्था कमी होईल. शिक्षक आणि शिक्षण हे हातात हात घालून चालत असते.
शिक्षणातून काय साध्य करायचे आहे हे ध्यानी घेतल्याशिवाय कुठलाही शिक्षक उत्कृष्टतेकडे वाटचाल करू शकणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा विकास कसा होतो याची व्यवस्थित कल्पना असल्याशिवाय शिक्षक विद्यार्थी घडवू शकणार नाही. आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारची माहिती देणे यालाच शिक्षण समजले जाते. त्यामुळे विविध प्रकारची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना पुरवणे हेच आपले काम आहे असा समज शिक्षकांनी करून घेतलेला आहे; परंतु ज्ञान आणि माहिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षातच घेतले जात नाही. माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्यासाठी अनुभव देण्याची व त्या ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करण्यासाठी विचार करण्याची एक महत्त्वपूर्ण पायरी असते.
शिकणाऱयाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्याचप्रमाणे एखाद्या विषयात पारंगत होण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज असते. निष्कर्ष, विश्लेषण आणि संकल्पना निर्मिती यासाठी योग्य मार्गदर्शनाची
आवश्यकता असते. त्यामुळेच शिक्षक अथवा गुरू यांचे स्थान औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये अधोरेखित होते. मानवी संस्कृतीचा विकास होत असताना ज्या संस्था उदयास आल्या त्यामध्ये शिक्षणसंस्था ही महत्त्वाची मानली जाते. शिक्षणाचे संस्थात्मक रूप तयार झाल्यानंतर शिक्षक हा त्यातील महत्त्वाचा घटक बनतो. संस्थात्मक स्वरूपामुळे शिक्षणाला साचेबद्ध स्वरूप आले. त्याचे अनेक फायदे आहेतच; परंतु या साचेबद्ध स्वरूपामुळे आजच्या शिक्षण आणि शिक्षकांमध्ये ज्या त्रुटी निर्माण झाल्या त्याचा परिणाम आजच्या शिक्षणावर झाल्याचे दिसून येते.
शहरी आणि ग्रामीण दोन्ही पातळ्यांवर शिक्षणाची गुणवत्ता खालावलेली दिसून येते, या परिस्थितीला शिक्षक पूर्णपणे जबाबदार नसला तरी त्याचा वाटा 70 टक्के एवढा निश्चित आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये शिकवण्याकडे असणारा कल कमी होत आहे. पूर्वी शिक्षक हा राजकीय, सामाजिक आणि इतर वादविवादांपासून अलिप्त असे. समाजामध्ये त्याचे स्थान मार्गदर्शकाचे असल्यामुळे समाजाचा त्याला आधार आणि पाठिंबा असे. अलीकडच्या काळात शिक्षणाचे अयोग्यरीत्या सरकारीकरण झाल्यामुळे शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जबाबदाऱया पार पाडाव्या लागतात.
माहितीच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देणे हा शिक्षणाचा उद्देश मागे पडला आहे. विद्यार्थ्यांनी स्वत माहिती गोळा करून त्यावर विचार करणे अपेक्षित आहे. वर्गामध्ये शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगला कसा आत्मसात करता येईल याविषयी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. याचाच अर्थ असा की, शिक्षकांना तो विषय नीटपणे समजायला हवा. एवढेच नव्हे तर, त्या विषयाशी आनुषंगिक अशा इतर गोष्टींचे त्याला ज्ञान हवे.
आपण जो विषय शिकतो त्या विषयाची उपयोगिता, त्याचा तात्कालिक संदर्भ आणि त्या विषयामध्ये पुढे होऊ घातलेले बदल यांचे ज्ञान शिक्षकाला हवे. विद्यार्थ्यांना केवळ विषय माहीत होणे अपेक्षित नसून त्यातील संकल्पना त्यांना स्पष्टपणे कळायला हव्यात, किंबहुना त्या संकल्पनांचे त्यांना आकलन व्हायला हवे. यासाठी शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. वर्गातील शिक्षण विद्यार्थ्यांच्या सहभागाने व्हायला हवे.
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची पूर्ण मुभा असायला हवी. त्यांच्या प्रश्नांचे निरसन चर्चेद्वारे आणि शिक्षकांना अवगत असलेल्या ज्ञानाच्या आधारे व्हायला हवे. उच्च शिक्षणाचा विचार करता प्रामुख्याने तीन बाबींचा समावेश करणे जरुरीचे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केलेल्या या तीन बाबी म्हणजे उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता या होत. भारतामध्ये अद्यापही उच्च शिक्षणाची उपलब्धता हव्या तेवढय़ा प्रमाणात नाही. उच्च शिक्षणाकडे वळणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
ज्ञान प्रािढया ही अखंड चालणारी महत्त्वाची प्रािढया आहे. त्यात एकदा संपादन केलेलं ज्ञान हे अंतिम किंवा परिपूर्ण असू शकत नाही. ज्ञान म्हणजे केवळ माहिती संकलन नव्हे. विचारांना सक्षम पद्धतीनं आत्मसात करून त्याचा विनियोग सकारात्मक दृष्टिकोनातून करणं म्हणजे ज्ञान होय. माहितीचं ओझं कमी करून अधिक `आनंददायी व सहज शिक्षण’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी
शिक्षकांवर येते. काळाबरोबर येणारी नवी आव्हाने पेलताना त्यांच्याकडे केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिल्यास त्याचा अध्ययन-अध्यापन प्रािढयेत छान उपयोग करून घेता येईल.
























































