सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडूंचे गोड बोल! हिंदुस्थानी संघाला खूश करण्याची लतीफची खेळी?

रविवारी दुबईत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी नेहमीप्रमाणे मैदानाबाहेरील खेळ सुरू झाले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने हिंदुस्थानी संघावर कौतुकाचे गोडगोड फटाके पह्डताना हिंदुस्थानचा संघ परिपूर्ण असल्याचे गुणगान गायले आहे.

सध्या सर्व पाकिस्तानी आपल्या वक्तव्याने उभय संघांमधील वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच मालिकेत लतीफ म्हणाला, हिंदुस्थान हा परिपूर्ण संघ आहे. अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन असे दमदार फलंदाज आहेत. हार्दिक पंडय़ा हा धोकादायक अष्टपैलू खेळाडू आहे. जसप्रीत बुमरा आपल्या अचूक घातक गोलंदाजीने सामना फिरवू शकतो.

हिंदुस्थानच्या संघावर कौतुकाचा वर्षाव

गेल्या दहा वर्षांत आयसीसी स्पर्धांतील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यांत 15 पैकी 12 वेळा हिंदुस्थानने विजय मिळवला आहे. पाकिस्तान नेहमीच भावनांना बळी पडतो, तर हिंदुस्थान परिस्थितीनुसार खेळतो. त्यामुळेच ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार लतीफने काढलेत.

तो एवढय़ावरच थांबला नाही तर हार्दिक पंडय़ाच्या क्षमतेचा विशेष उल्लेख करत म्हणाला, मधल्या फळीत हार्दिक कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतो. त्याने हे अनेकदा सिद्ध केले आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंची ही विधानं सामन्याआधीचा मानसिक डाव मानली जात आहेत. हिंदुस्थानी खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्यासाठी की दबाव कमी करण्यासाठी? कारण आतापर्यंत मैदानातल्या आकडेवारीत नेहमीच हिंदुस्थान वरचढ राहिला आहे.

रविवारी होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानी दिग्गजांचे हे गोड बोल म्हणजे दाताखाली चिमूटभर गूळ असं म्हणायला हरकत नाही!