खेळावर लक्ष द्या, बाकी सरकार पाहील! कपिल देव यांचा हिंदुस्थानी खेळाडूंना सल्ला

विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी आशिया कपमधील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे, फक्त खेळावर लक्ष केंद्रित करा, बाहेरील गोष्टींकडे लक्ष देऊ नका. बाहेरील गोष्टी सरकार पाहून घेईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबईत आमनेसामने येणार आहेत. या सामन्याला अवघ्या हिंदुस्थानातून विरोध होत असताना केंद्र सरकारने आगामी ऑलिम्पिक आयोजनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाविरुद्ध केवळ द्विपक्षीय सामने खेळण्यास विरोध दर्शवला आणि मात्र बहुराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ पाकविरुद्ध खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर कपिल देव म्हणाले,  हिंदुस्थानी संघ ताकदवान आहे. त्यांनी जिंकायलाच हवे. खेळाडूंनी केवळ आपल्या कामगिरीवर लक्ष द्यावे, बाकी सरकार आपले काम करेल. फक्त मैदानावर जा आणि जिंका.

टी-20 क्रिकेटचा जगज्जेत्या हिंदुस्थानने आपल्या आशिया कप मोहिमेची सुरुवात यूएईवर 9 विकेट्सच्या दणदणीत विजयासह केली आहे. पुढील सामना 14 सप्टेंबरला पाकविरुद्ध रंगणार आहे. त्याच सामन्याच्या दृष्टीने कपिल यांना छेडले असता ते म्हणाले,  टीम इंडिया एक सक्षम संघ आहे. काल त्यांनी सुंदर विजय मिळवला. हा विजय जेतेपदाच्या थाटातला होता. आता आशा आहे, ही ट्रॉफीही हिंदुस्थानच्याच नावावर होईल.