
आशिया कप स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने 20 षटकांत 7 बाद 160 धावा उभारल्या होत्या तर त्यांच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे ओमानचा संघ फक्त 67 धावांत गारद झाला.
पाकिस्तानकडून मोहम्मद हारिसने 44 चेंडूंत 67 धावा ठोकल्या तर फखर जमान 16 चेंडूंत 23 धावा काढत नाबाद राहिला. सईम अयूब शून्यावर माघारी परतला, तर फरहानने 28 धावा केल्या. ओमानकडून आमीर व फैजल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला.
ओमानचा डाव कोलमडला
161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानची सुरुवातच ढासळली. केवळ हम्माद मिर्झा (27 धावा) काहीसा प्रतिकार करू शकला. उर्वरित सात फलंदाज दहाच्या आत गारद झाले. अबरार अहमदने शकील अहमदला बाद करत ओमानच्या डावाचा शेवट केला. पाकिस्तानकडून सईम, सूफियान आणि फहीम यांनी प्रत्येकी 2 विकेट टिपले.