सफर-ए-यूएई – पाकिस्तान वि. ओमान… स्वप्न की दिवास्वप्न!

>> संजय कऱ्हाडे

पाकिस्तान म्हटलं की वाटतं, चमचा-लिंबूच्या शर्यतीतसुद्धा सगळय़ांनी त्यांना हरवावं! आज आशिया कप स्पर्धेचा चौथा सामना अन् पाकिस्तानचा पहिला. तसाच तो ओमानचासुद्धा. काय होणार आज? ओमानचा संघ मला पहाटे पडलेल्या स्वप्नात खेळला तसा खेळून हरवणार का पाकिस्तानला?

या दोन संघांची आंतरराष्ट्रीय दर्जावर एकमेकांशी कधीच भेट झालेली नाहीये. आशिया कपमध्ये त्यांचा हा पहिलाच मुकाबला.

पाकिस्तानचा कप्तान सलमान अली हल्लीच सिंहासनावर बसलाय. त्याची मदार असेल फकर झमान, सलीम अयुब, साहिबजादा फरहानसारख्या फलंदाजांवर. कारण बऱ्याच  कारणांसाठी बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शदाब खान, इफ्तिकार आणि इमाद वसीम यांची पाक निवड समितीने गच्छंती केलीये. कुणाचा फॉर्म नाही, तर नव्यांना संधी देणं आवश्यक आहे अशी अनेक कारणं पुढे आली.  संघाच्या या निवडीवर जावेद मियांदाद आणि वसीम अक्रमासारख्या खेळाडूंनी टीका केलेली आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर अमुक-तमुक हॉटेलात अमुक-तमुक खेळाडू उसाचा रस पिताना दिसला म्हणून त्याला काढलं असे दाखलेही मिळू शकतील. अशा वेळी पाक बोर्ड अन् निवड समितीचा आक्षेप उसाच्या रसाला होता की आणखी कशाला, असा प्रश्न मला खूपदा पडलेला आहे.

सलमानला अबरार अहमद, फहीम अश्रफकडून चटपट धावांची आणि शाहीन आफ्रिदी, मोहम्मद ज्युनिअर आणि हॅरिस रौफकडून ओमानच्या फलंदाजांची फळी कापून काढण्याची अपेक्षा राहील. आणि फलंदाजांना चकवण्यासाठी मोहम्मद नवाझ आणि अबरार आहेतच.

ओमानचा कप्तान जतिंदर सिंग. दमदार फलंदाज. मूळचा पंजाबी. चौदा वर्षांचा असताना त्याचं कुटुंब ओमानला स्थायिक झालं. समय श्रीवास्तव भोपाळचा. तो क्रिकेट खेळण्याची संधी शोधत ओमानला गेला. पण लक्ष ठेवावं लागेल ते वीस वर्षांच्या आर्यन बिश्तकडे. मधल्या फळीचा हा आक्रमणवीर आहे. आणखी आहे 37 वर्षीय डावरा फिरकी गोलंदाज शकील अहमद.

अर्थात, दोन-चार खेळाडूंच्या जोरावर ओमानचा संघ पाकला आव्हान देऊ शकेल असं वाटत नाही.

पहाटे पडलेलं स्वप्न खरं ठरतं असं म्हणतात. पण आजचं स्वप्न मात्र  दिवास्वप्न ठरण्याची शक्यताच जास्त दिसतेय!