
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवर कोणत्याही स्पॉन्सरचे नाव दिसणार नाही. ड्रीम -11 शी करार मोडल्यामुळे हिंदुस्थानी संघाला स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) हिंदुस्थानी संघाचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओत दिसलेल्या नव्या जर्सीवर कुठल्याही स्पॉन्सरचं नाव नाहीये.
टीम इंडियाच्या जर्सीवर डाव्या बाजूस ‘बीसीसीआय’चा लोगो असून, उजव्या बाजूला ‘डीपी वर्ल्ड एशिया कप 2025’ असे लिहिलेले आहे. डीपी वर्ल्ड ही आशिया चषक स्पर्धेची अधिपृत स्पॉन्सर कंपनी आहे. याशिवाय जर्सीवर फक्त ‘इंडिया’ असं नाव लिहिलं आहे.
सरकारने 22 ऑगस्टपासून ‘ऑनलाइन गेमिंग अॅक्ट-2025’ लागू केल्यानंतर ‘ड्रीम-11’ने बीसीसीआयबरोबरचा करार संपुष्टात आणला. त्यानंतर बीसीसीआयने 2 सप्टेंबर रोजी जर्सी स्पॉन्सरशिपसाठी टेंडर काढले. टेंडर खरेदी करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर असून बोली लावण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर निश्चित केली आहे. मात्र आशिया चषकाची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत असल्याने हिंदुस्थानी संघाला सुरुवातीचे सामने ‘स्पॉन्सरलेस’ जर्सीत खेळावे लागणार आहेत.
आशिया चषकाची सुरुवात 9 सप्टेंबरपासून
एशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. हिंदुस्थानी संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हायव्होल्टेज सामना रंगेल. 19 सप्टेंबरला टीम इंडिया ओमानविरुद्ध खेळणार आहे.
ड्रीम-11 आणि बीसीसीआयमधील करार रद्द
ड्रीम-11 आणि बीसीसीआय यांच्यातील करार रद्द करण्यात आला आहे. 2023 मध्ये ड्रीम-11 हिंदुस्थानी संघाचा जर्सी स्पॉन्सर बनला होता. तीन वर्षांसाठी असलेला हा करार नियोजित मुदतीच्या सहा महिने आधीच रद्द झाला. ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग अॅक्टमध्ये मोठा बदल केला आणि पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या अॅप्सवर बंदी घातली. यामुळे ड्रीम-11 ला मोठा धक्का बसला असून बीसीसीआय आता नव्या जर्सी स्पॉन्सरच्या शोधात आहे.