
हॉकीच्या मैदानावरील हिंदुस्थानची ताकद पुन्हा एकदा जगासमोर दिसू लागलीय. कझाकस्तानचा वरिष्ठ पुरुष हॉकी संघ आगामी आशियाई हॉकीच्या पात्रतेच्या तयारीसाठी हिंदुस्थानात दाखल झाला असून, सोनीपतच्या मैदानावर त्यांच्या रणतयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. 10 ते 21 मार्चदरम्यान हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाच्या उत्तर प्रादेशिक पेंद्रात होणारे हे प्रशिक्षण शिबीर आशियाई क्रीडा स्पर्धा पात्रता फेरी 2026 च्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानले जात आहे.
हिंदुस्थानातील उच्च दर्जाची हॉकी सुविधा, वेगवान खेळशैली आणि स्पर्धात्मक वातावरण, याचं आकर्षण आता परदेशी संघांनाही खेचत आहे. त्यामुळे कझाकस्तान संघासाठी हे शिबीर केवळ सराव नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याची मोठी संधी ठरणार आहे.
कझाकस्तानच्या प्रशिक्षक ओल्गा उरमानोवा यांनी हिंदुस्थानातील हॉकीचा स्तर खूपच उच्च आहे आणि इथला अनुभव आमच्यासाठी अमूल्य असल्याचे आधीच जाहीर केले आहे. राजगीरमधील आशिया कपनंतर कझाकस्तानची ही दुसरी भेट असून या वेळेस त्यांनी अधिक तयारी, अधिक आक्रमकता आणि अधिक आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. कझाकस्तानच्या आगमनामुळे हिंदुस्थान हे आता केवळ स्वतःसाठी नाही, तर जगासाठी हॉकीचं प्रशिक्षण पेंद्र बनत असल्याचे जाणवू लागले आहे आणि हीच खरी क्रीडा महासत्तेकडे वाटचाल आहे.

























































