
राज्यातील घुसखोरी रोखण्यासाठी आसाम सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 18 वर्षांच्या वरील कोणत्याही व्यक्तीला नवे आधार कार्ड दिले जाणार नाही. हा निर्णय येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार असून त्यासंदर्भातील अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली. देशभरात सध्या आधार कार्ड नागरिकत्वाचा व रहिवासाचा पुरावा म्हणून वापरले जाते. सीमावर्ती राज्यांत याचा मोठय़ा प्रमाणावर दुरुपयोग होत असल्याचे आढळून आले आहे. आसाममधील बांगलादेशी घुसखोरांना हे कार्ड मिळू नये यासाठी सरकारने ही खबरदारी घेतली आहे, असे सरमा म्हणाले. आसाममध्ये सध्या बेकायदा स्थलांतरित नागरिकांना हुडकून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
नवा निर्णय काय सांगतो?
nवयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या कोणालाही यापुढे नवे आधार कार्ड मिळणार नाही.
nएससी, एसटी आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांना यातून काही प्रमाणात सूट असेल. त्यांना वर्षभरात आधार मिळवावे लागेल.
nराज्यातील ज्या रहिवाशांनी अजून आधार कार्डसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी सप्टेंबर हा शेवटचा महिना असेल.
n 30 सप्टेंबरनंतर केवळ अपवादात्मक परिस्थितीत आधार कार्ड दिले जाईल. मात्र त्यासाठी उपायुक्तांच्या कार्यालयाची मान्यता घ्यावी लागेल.