
लोकसभेच्या निवडणुकीत पक्ष फोडणार्या गद्दारांना गाडल्यानंतर येणार्या विधानसभा निवडणुकीत विश्वासघातकी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना चारीमुंड्या चित करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी प्रचंड ताकदीने विजयी होईल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशात संविधान धोक्यात आल्याने व एकहाती सत्ता मिळवत घटना बदलण्याचे भाजपचे षडयंत्र जनतेने उधळून लावले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व मित्र पक्षाला त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली. मित्रांचा विश्वासघात ही भाजपची रणनिती यापूर्वीही होती. 2019 च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार शिवसेनेच्या विरोधात उभे करुन शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडले. तीच रणनिती भाजपाने यापुढेही सुरु ठेवली. मित्र पक्षांचा विश्वासघात हि रणनिती त्यांची नेहमीचीच आहे त्याचा प्रत्यय येणार्या निवडणुकीत येईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जातीय दंगली भडकविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे काय, असे चित्र दिसून येत आहे. विशालगडपासून या दंगली सुरु झाल्या आहेत. आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीनंतर नऊ जातीय दंगली राज्यात झाल्या. भाजपाच्याच राज्यात हिंदू खतरे मे है असे म्हणून काही हिंदू संघटनांची आंदोलने होत आहेत. हे कशाचे द्योतक आहे असा सवालही त्यांनी केला. येणारी विधानसभा निवडणुक ही महाराष्ट्राच्या सन्मानाची आहे. रात्रीतून पक्ष फोडून गद्दारी करणार्यांना धडा शिकविण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे वन नेशन वन इलेक्शनचा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. मात्र महाराष्ट्र व झारखंड वगळून निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे ते बोलतात एक आणि करतात एक असा टोला त्यांनी मारला. संविधान धोक्यात आहे, ते त्यांना बदलायचे आहे, घटना बदलायची आहे, हे संकट अजून टळलेले नाही, त्यामुळे जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाच्या या धोक्यापासून सावध राहिले पाहिजे. नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. येणार्या काळात तो दिसून येईल, लोकसभेच्या निवडणुकीत चव्हाणांच्या प्रती जनतेने राग दाखवून नांदेडची जागा मविआला मोठ्या फरकाने मिळवून दिली. गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात त्यांना धडा शिकवत नांदेड उत्तरमध्ये 41 हजाराचे मताधिक्क्य मिळाले. त्यामुळे या जिल्ह्यात शिवसेनेला पूर्वीप्रमाणेच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करुन नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या किमान चार जागा या निवडणुकीत आम्ही जिंकून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख माधव पावडे, प्रमोद उर्फ बंडू खेडकर, बबनराव बारसे, जिल्हा संघटक नेताजी भोसले, एस.टी.कामगार सेनेचे प्रमुख सल्लागार प्रकाश मारावार यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.