गृहमंत्री हे काय चाललंय? शरीरसुखासाठी मुलीला पाठव, दहा हजार देतो! सहाय्यक उपनिरीक्षकाची कोठडीतील आरोपी महिलेकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस कोठडीत असलेल्या महिलेकडे ‘तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी पाठव, दहा हजार रुपये देतो’ अशी मागणी डय़ुटीवरील सहाय्यक उपनिरीक्षकाने केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात घडला असून या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून ‘गृहमंत्री राज्यात हे काय चाललंय,’ असा संतप्त सवाल विचारला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

राजेश जाधव असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले असून तिथे या अधिकाऱयाने अंगावरील खाकीला लाजिरवाणे कृत्य केले. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. याबाबत महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.

वर्दी घातली आहेस ना तू

याबाबत कळताच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी पोलीस स्टेशनमध्येच जाधव याला झापले. ‘वर्दी घातली आहेस ना तू. असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का,’ असे खडेबोल या अधिकाऱयांनी सुनावले. जाधव याच्यावर या अधिकाऱयांनी संतापाने हातही उगारला त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.

निलंबनाची कारवाई

राजेश जाधव याच्यावर याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.