ऑस्ट्रेलिया पुन्हा तय्यार, एमसीजीवरही इंग्लंडला चिरडण्यासाठी

अॅशेस मालिकेत इंग्लंडची राख झालीय तरीही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) सुरू होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीतही त्यांना चिरडण्यासाठी ऑस्ट्रेलिया पुन्हा सज्ज झाली आहे. विजयाची हॅटट्रिक साधत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा अॅशेस आपल्याकडेच राखल्यामुळे उर्वरित दोन्ही कसोटी औपचारिकता पूर्ण करणाऱ्या ठरणार आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ एमसीजीवर फिरकीशिवाय उतरणार आहे. त्यांनी चारही वेगवान गोलंदाजांची निवड केल्याचे हंगामी कर्णधार स्टीव्हन स्मिथने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे इंग्लंड आपली उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी जोरदार संघर्ष करण्यासाठी उतरणार आहे.

ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला असून मायकेल नेसर, ब्रेंडन डॉगेट आणि झाय रिचर्डसन यांच्यापैकी दोघे एमसीजीवर असतील. सलामीवीर उस्मान ख्वाजा पुन्हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर फॉर्मात असलेला अॅलेक्स केरी सहाव्या स्थानावर कायम राहील. खराब फॉर्ममुळे जोश इंगलिस, संधीची वाट पाहणारा ब्यू वेबस्टर आणि टॉड मर्फी हे अंतिम संघातून बाहेर असतील. एमसीजीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असल्यामुळे संघात फिरकीला स्थान मिळू शकले नाही. प्रत्येक मैदानानूसार रणनीती बदलावीच लागते, असेही स्मिथने स्पष्ट केले.

इंग्लंडकडून गेल्या 24 तासांतील वादांनंतरही बेन डकेटला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र निराशाजनक कामगिरीची किंमत ऑली पोपला चुकवावी लागली असून जेकब बेथेल त्याच्या जागी असेल. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर माघारी परतला असून गस अॅटकिन्सन संघात परतला आहे. तज्ञ फिरकीपटू शोएब बशीरसाठी संघात स्थान मिळू शकलेले नाही.

अंतिम संघ असा असेल

ऑस्ट्रेलिया ः ट्रव्हिस हेड, जेक वेदराल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), कॅमरुन ग्रीन, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलॅण्ड, ब्रेंडन डॉगेट, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन.

इंग्लंड ः झॅक क्रॉवली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), विल जॅक्स, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॉश टंग.