ऑस्ट्रेलियाची ‘मॅरेथॉन’ कसोटी, 14 आठवड्यांत 10 कसोटी खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2026-27 हंगामासाठी तब्बल आठ महिन्यांचा आणि 27 सामन्यांचा धडाकेबाज कार्यक्रम जाहीर केला आहे. 14 मैदानांवर रंगणाऱया या मालिकेची सुरुवात ऑगस्टमध्ये बांग्लादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार असून, मार्चमध्ये मेलबर्नवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक 150व्या वर्धापन दिनाची कसोटी खेळून ऑस्ट्रेलिया या थराराला समारोप देईल.

उत्पंठा बॉर्डरगावसकर ट्रॉफीची

जानेवारीत होणारी ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ ही हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिका अनेक ऑस्ट्रेलियन दिग्गजांसाठी ‘शेवटची मोठी परीक्षा’ मानली जात आहे. पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड आणि नॅथन लायन यांना अजूनही हिंदुस्थानमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. म्हणूनच हा दौरा निर्णायक ठरणार आहे.

14 आठवडय़ांत खेळाडूंच्या फिटनेसची कसोटी

डिसेंबर ते मार्च या अवघ्या 14 आठवडय़ांत 10 कसोटी सामन्यांचा खडतर कार्यक्रम ऑस्ट्रेलियाला खेळावा लागणार आहे. ऑगस्टमध्ये बांगलादेश दौऱयानंतर ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटींची मालिका तर त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध चार टेस्टची मालिका रंगणार आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडविरुद्ध इतकी मोठी कसोटी मालिका खेळेल.

गॅबाची विकेट, नव्या मैदानात सामना 

या वेळापत्रकात गॅबा मैदानाला वगळण्यात आले असून, त्याऐवजी मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी होणार आहे. डार्विनमध्ये 13-17 ऑगस्टला पहिला कसोटी रंगेल, तर पर्थ, अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे न्यूझीलंड मालिकेचे सामने होणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा हा ‘मॅरेथॉन’ हंगाम क्रिकेटविश्वाला थरार, संघर्ष आणि विक्रमांची मेजवानी देणार यात तीळमात्र शंका नाही.